जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू

0
1

ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान काल रविवारी पहाटे 4 वाजता गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान 3 भाविकांचा मृत्यू झाला. 30 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे बसंती साहू (36), प्रेम कांती महंती (78) आणि प्रभात दास अशी आहेत. मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत.
रथ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली असताना हा अपघात झाला. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि लोक पडल्याने चिरडले गेले. ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली त्या ठिकाणी पुरेसे पोलीस किंवा सुरक्षा दल तैनात नव्हते असे सांगितले जात आहे. भगवान बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ आधीच श्रद्धाबली (अंतिम बिंदू) येथे पोहोचले होते.

मृतांना 25 लाखांची मदत
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी प्रत्येक मृत भाविकाच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली सविस्तर प्रशासकीय चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जिल्हाधिकारी आणि एसपींची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत.
भक्तांची माफी ः मुख्यमंत्री
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी चेंगराचेंगरीबद्दल भगवान जगन्नाथाच्या भक्तांची माफी मागितली. मुख्यमंत्री माझी यांनी मी आणि माझे सरकार सर्व जगन्नाथ भक्तांची माफी मागतो असे म्हटले आहे.