छत्री

0
192
  • मीना समुद्र

उन्हापासून गारवा आणि विश्रांतीसाठी झाडाबुडीच टेकायचं. तेव्हा असं हे झाड, त्याचा आकार हीच छत्रीमागची प्रेरणा असावी. घरांच्या छप्परांचा, मंदिरांच्या घुमटांचा आकार हा पाऊस गळून जाण्यासाठी खूप उपयोगी ठरतो, हे जाणून छत्री अशीच घुमटाकार केली असावी.

जून महिना संपत आला तशी पावसानं थोडी उसंत घेतली. त्याचा पहिला जोश आणि जोर कमी झाला आणि उन्हाच्या हसर्‍या कवडशांतून कधीमधीच तो सरसरत राहिला- स्वतःशीच एखादं गाणं गुणगुणावं तसा झिरमिरत राहिला. पोरंसोरं, कच्चीबच्ची ऑनलाईन शाळा आटोपली की मग अशा पावसात खेळा-बागडायला मोकळी झाली. साठलेल्या पाण्यात कागदी नावा सोडणे, ‘गार्‍या गार्‍या भिंगोर्‍या’ करत स्वतःभोवती गिरक्या घेणे, ‘काळ्याबाळ्या’ करत हात पसरून स्वतःभोवती गोल गोल फिरणे अशी त्यांची दंगामस्ती चालू झाली. मध्येच सर आली तर खदाखदा हसणं, झाडाखाली नाहीतर घरात पळणं आणि ‘काय रे सारखे चिखलाचे पाय घरात आणता’ असा आईचा ओरडा खाणं, तिच्याकडून भिजलेलं डोकं पुसून घेता घेता ‘आता सर्दी झाली तर मला सांगू नकोस. कडू काढा प्यावा लागेल’ असा तिचा दम खाणं हे सगळंच चालू झालं. पावसात भिजायला, चिखलात खेळायला किती मज्जा येते हे एवढी मोठी असून तिला कसं काय कळत नाही- असं काहीबाही त्यांच्या मनात येत राहिलं. पोरीसोरीही सरींशी झिम्माफुगडी घालायला, आभाळाकडे तोंड करून डोळे मिटून पाऊस झेलायला भारी उत्सुक झाल्या. आजोबाही छत्रीची काठी टेकीत कौतुकानं खेळ पाहायला दारात आले.

‘आभाळ वाजलं धडाड् धुम्, वारा सुटला सूं सूं सुम्’ अशी पावसाळ्यात शिकवलेली कविता त्यांच्या आपसुक ओठांवर आली. तेवढ्यात एक चिमुकली तिच्यासाठी खास आणलेली लालचुटूक छत्री उघडून बाहेर आली. तिच्या डोक्यावर फुलाफुलांची नक्षी आणि छत्रीवर एक ससुला बसलेला मोठ्या कानांचा. मग आणखी एकादोघांनी आपापल्या घरातल्या लहानमोठ्या छत्र्या आणल्या आणि समोर धरून खटका दाबून ताणल्या. तसं आपलं तारेचं कमळ फुललं आणि त्यावरची सुंदर नक्षी ताणलेल्या कापडावर उठून दिसू लागली तेव्हा कोणीतरी-
मेरा छाता मेरा छाता, तेज धूप से मुझे बचाता
जब भी आती बरखारानी, छाते से रूक जाता पानी
बरखा धूप सभी सह जाता, मेरा छाता मेरा छाता
बडे काम का मेरा छाता!
अशी कविता म्हणत हातातली छत्री उंचावली. ‘मुझे भीगने कभी न देता, चाहे खुद हो गीला छाता’- असं त्याचं गुणगान कुणीतरी केलं. ‘हम भी कुछ कम नहीं’- असं जणू दाखवत ‘पानी बरसा छम् छम् छम्, ऊपर छाता नीचे हम, छाता लेकर निकले हम, पैर फिसला गिर गये हम’ एका पिल्लाने साभिनय कविता म्हणत त्या ओल्या अंगणातच बसकण मारली आणि सगळ्यांना खूप हसू आले. ‘व्रिष्टी पडे टापुर टुपुर’ हे रवींद्रनाथांचं गाणं म्हणत एका घरातली तायडी पण त्यात सामील झाली; आणि आपल्या लगानग्या बहिणीच्या डोक्यावर तिनं छत्रीचं छत्र धरलं.

नाहीतरी ‘छत्री’ हा शब्द छत किंवा छत्र (झाकण, आच्छादन करणं, सुरक्षित राहणं, आधार देणं) यावरूनच तयार झाला असावा ना? आणि तिचा आकार- तो कशावरून घेतला असावा? ऊन-पावसासाठी माणसं टोपी, हॅट, इरली वापरतात; पण ते एकासाठीच उपयोगी. दोन-तीन जणांसाठी उपयोगी अशी मोठी छत्री मग काय पाहून बनवली असावी? पाऊस आला की झाडाखाली उभं राहायचं. उन्हापासून गारवा आणि विश्रांतीसाठी झाडाबुडीच टेकायचं. तेव्हा असं हे झाड, त्याचा आकार हीच छत्रीमागची प्रेरणा असावी. घरांच्या छप्परांचा, मंदिरांच्या घुमटांचा आकार हा पाऊस गळून जाण्यासाठी खूप उपयोगी ठरतो, हे जाणून छत्री अशीच घुमटाकार केली असावी. तिच्यावरून पाऊस निथळून जाण्यासाठी वेगळेच पाणी न झिरपणारे कापड वापरले. पूर्वी काळ्या रंगाच्या छत्र्या होत्या आणि त्याचा मधला दांडा लाकडी आणि मूठ वळलेली असे. उघड-मीट करण्यासाठी एक खटका असे. खटकन् खटका दाबून झटकन् उघडणारी छत्री म्हणजे काहीतरी जादुई गंमतच वाटते लहानग्यांना. त्यामुळे कुतूहलापोटी सारखी आपली उघडझाप करत राहतात. ‘छत्री मोडेल सारखी उघडमीट केल्यानं’ अशी मोठ्यांची ओरड असते. पूर्वी ‘छत्र्यांचे डॉक्टर आले’ अशी हाळी गल्लीबोळातून उठायची. आता मोक्याच्या जागी ते दुरुस्तीला बसतात. छत्र्या मिटता येतात त्यामुळे पूर्वी खुंटीला आणि आता खिळ्यांना किंवा हँगरला टांगून ठेवल्या जातात. उघडून ठेवलेल्या छत्रीखाली चिल्लीपिल्ली घर-घर करून खेळ मांडतात. अगदी बाहुलीचा सगळा संसार मग त्याखाली येतो. अशा उघड्या छत्रीखाली मनीची पिल्लंही जाऊन बसतात. मुठीच्या जागी हल्ली प्लॅस्टिक असते. त्यात जाड मऊ गोफ ओवलेला असतो. बहुतेक छत्र्यांचा आकार गोलाकारच असतो, पण आजकाल क्वचित आयताकृतीही मिळतात. बाळांसाठी मच्छरदाणी ही एक छत्रीच. हल्ली छत्र्यांचा दांडा असतो तो स्टीलचा. पावसाळा आला की छत्र्यांची दुकानं थाटलेली दिसतात. रेनकोट, मेणकापड, चप्पल ही खास पावसाळी खरेदी असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या महिलास्पेशल अशाही छत्र्या मिळतात. घडीच्या (त्याही १, २). पर्स, पिशवीत टाकायला सोयिस्कर आणि आटोपशीर. वेगवेगळे रंग, वेगवेगळं डिझाईन असलेल्या या छत्र्या. अंग आवरून-सावरून बसण्यासाठी एक पट्टी आणि बटण किंवा वेलक्रो आणि वर सुंदर वेष्टनही. तारेच्या टोकाला टपोरे मणी, गोलाकाराच्या कडेला लेस छत्रीची शोभा वाढवतात. पूर्वी राजेरजवाड्यांवर छत्रंचामरं ढाळली जायची. अबदागीर असायचा. ही छत्री अत्यंत मानाची, आदरास पात्र अशी. शिवाजी महाराज ‘छत्रपती’ झाले म्हणजे फक्त त्यांच्यावर ती मूल्यवान छत्री धरली असा अर्थ होत नाही, तर स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि लोकरक्षणासाठी जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक म्हणून ते छत्र त्यांच्यावर धरले गेले. एकदा खिद्रापूरच्या मंदिरात गेलो असताना श्रीशंकराचार्यांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांच्यावर छत्री धरली होती. हे आदराचे आणि सन्मानाचे तसेच महानतेबद्दलच्या विनम्र पूज्यभावाचे प्रतीकच होते. ऊन-पावसापासून, पक्ष्यांच्या विष्ठेपासून रक्षणासाठी डोंगरमाथी मोकळजागी उभारलेल्या काही पुतळ्यांवर ही छत्र वा छत्री असते. हाताच्या पंजाएवढ्याच आकाराच्या छत्र्या एका प्रदर्शनात पाहिल्या. इंद्रधनूचे रंग ल्यालेल्या त्या सुबक छत्र्या ‘शो-पीस’ म्हणून शोकेस किंवा टेबलावर ठेवायच्या म्हणे! रंगीत जाड कागदाच्या घड्या घालून केलेल्या छत्र्याही अशाच सुंदर शो-पीस म्हणून छान दिसतात. इथं-तिथं खोचून ठेवल्या की टपोर्‍या आकाराची रंगीत फुलंच फुलं उमलल्याचा भास व्हावा. छत्रीचा आकार सुंदरच. लहान मुलीचे घेरदार फ्रॉक त्या गिरक्या घेताना छत्रीसारखेच फुलतात. ‘अमरेला कट’ हा खास शिवणात वापरला जाणारा प्रकार आहे.
वार्‍या-पावसाने छत्र्या उलट्या होऊन रस्त्यात फट्‌फजिती होण्याचे आणि चिंब भिजण्याचे प्रकार होतात, म्हणून ‘आमच्या दणकट काळ्या छत्र्याच बर्‍या’ असं मोठे लोक म्हणतात. वास्कोच्या सप्ताहात पूर्वी धो-धो पावसात मध्यरात्री छत्र्या घेऊन उभी राहून गाणं ऐकणारी माणसं आणि काळ्या छत्र्यांचा तो सागर पाहून खूप नवल वाटलं होतं मला नवखेपणी. त्यांच्या मनातला तो ओलाचिंब भक्तिभाव छत्रीच जपे. तो ‘नीली छतरीवाला’ त्यांना भरभरून आशीर्वाद न देता तरच नवल! माझे सासरे माझ्या मुलांना एक गोष्ट सांगत. तिचा शेवट ‘कहानी पे पत्थर और सुननेवालों के सर पे सोने का छत्तर’ असं म्हणून मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत. खूप वर्षांपूर्वी आमचे ते आणि आई, बाबा, काका, मामा अशी अनेकांची छत्रे गेली. त्या-त्या वेळी उघडे, अनाथ वाटले; पण पुढच्या पिढीसाठी आपणही छत्र झाले पाहिजे ही जाणीवही जागी झाली.