छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काल मोठा हल्ला केला. त्यात जवानांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला नक्षलवाद्यांनी स्फोटकांनी उडवले. या हल्ल्यात 8 जवान आणि एक चालक असे एकूण 9 जण शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी याठिकाणी अगोदरच भूसुरुंग पेरले होते. या भूसुरुंगाच्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच नक्षलवाद्यांनी तत्काळ त्याचा स्फोट केल्याची माहिती समोर आली आहे.
विजापूर जिल्ह्यातील बेद्रे-कुटू मार्गावर हा स्फोट झाला. नक्षलविरोधी मोहिमेतून परतत असलेले किमान 15 जवान या वाहनात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात आठ जवान आणि चालकासह एकूण नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत काही जवान जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या इस्पितळात दाखल केले आहे. या घटनेनंतर या परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली.