चौथ्या टप्प्यात ६४% मतदान

0
139

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६ टक्के मतदानाची नोंद झाली. तर देशपातळीवर सरासरी ६४ टक्के मतदान झाले. तुरळक हिंसेचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. तर जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येणार्‍या कुलागाममध्ये अवघे १०.३ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्यात बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेतला. त्या अमिताभ बच्चन, जया बच्चन, आमीर खान, माधुरी दीक्षित, वरूण धवन, प्रियांका चोप्रा, करिना कपूर आदी कलाकारांचा समावेश होता.

हिंदीबहुल म्हणून ओळख असणार्‍या राजस्थान, उत्तर प्रदेश अनुक्रमे ६२ आणि ५३.१२ टक्के इतके मतदान झाले. तर मध्य प्रदेशातील सहा मतदारसंघांमध्ये ६५.८६ टक्के मतदान झाले. याशिवाय, महाराष्ट्र (१७ जागा) ५२ टक्के, ओडिशात (सहा जागा) ६४.०५ टक्के, बिहारमध्ये (पाच जागा) ५३.६७ टक्के आणि झारखंडच्या तीन जागांसाठी ६३.४२ टक्के इतके मतदान झाले.

दरम्यान, पश्‍चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात मतदान केंद्रात बळजबरीने घुसल्याने एफआयआर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदानावेळी सुप्रियो यांच्या गाडीवर हल्ला करून फोडण्यात आली.

एकूणच चौथ्या टप्प्याच्या मतदानावेळी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा अशा सर्वच ठिकाणी मतदारांचा उत्साह दिसून आला. उन्हाचा पारा वाढला असला तरी मतदारांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले. अनेक ठिकाणी वेळ संपतानाही मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र होते. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा लोकसभा मतदारसंघात तर रात्री १० वाजेपर्यंत मतदान सुरु होते.