>> फोंडा आणि साखळी पालिका निवडणूक रणसंग्राम; विश्वनाथ दळवी, विद्या पुनाळेकर, प्रवीण ब्लेगन, रियाझ खान विजयी
फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात कोण असणार, याचे चित्र काल स्पष्ट झाले. फोंडा पालिकेच्या 13 प्रभागांतून 43 उमेदवार, तर साखळी पालिकेच्या 10 प्रभागांतून 31 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. फोंडा आणि साखळी पालिकेत प्रत्येकी 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फोंडा पालिकेत माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी आणि माजी नगरसेविका विद्या पुनाळेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर साखळी पालिकेत टुगेदर फॉर साखळी गटाचे प्रवीण ब्लेगन आणि भाजपचे रियाझ खान बिनविरोध निवडून आले आहेत. दोन्ही नगरपालिकांमध्ये एकूण 74 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, एकूण 30 जणांनी माघार घेतली.
मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपचे फोंडा गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर फोंडा पालिकेच्या प्रभाग 7 मधून भारत पुरोहित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विश्वनाथ दळवी हे सलग तिसऱ्यांदा पालिकेवर निवडून आले.
भाजपच्या अधिकृत उमेदवाराची माघार
फोंडा पालिकेच्या प्रभाग 13 मधून माजी नगरसेविका विद्या पुनाळेकर या बिनविरोध निवडून आल्या. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवार दर्शना नाईक यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. पुनाळेकर यांना सदानंद शेट तानावडे यांनी पक्षात प्रवेश दिला.
चुरशीच्या लढती अपेक्षित
फोंडा पालिकेच्या प्रभाग 2, 9 आणि 15 या तीन प्रभागांत चुरशीची दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग 5, 8, 10, 11 आणि 14 या पाच प्रभागांत तिरंगी लढत होणार आहे, तर प्रभाग 1, 3, 5, 6 आणि 12 या पाच प्रभागांत बहुरंगी लढत होईल.
सात जणांचे अर्ज मागे
फोंड्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काल मागे घेतले. प्रभाग 6 मधून सायमन आगियार, तोषिता कुंडईकर, प्रभाग 7 मधून भारत पुरोहित, प्रभाग 9 मधून निशांत आर्सेकर, प्रभाग 13 मधून दर्शना नाईक , प्रभाग 14 मधून अजय मामलेकर व निधी मामलेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये समावेश आहे.
रवी नाईकांच्या पुत्रांसमोर आव्हान
फोंडा पालिकेच्या निवडणुकीत कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक हे प्रभाग 1 मधून आणि रितेश नाईक प्रभाग 5 मधून निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही प्रभागात विरोधकांनी त्यांच्या पुत्रांसमोर आव्हान उभे केले आहे.
एक दांपत्य निवडणुकीच्या आखाड्यात
फोंड्यात विद्यमान नगरसेविका गीताली तळावलीकर आणि राजेश तळावलीकर हे दांपत्य निवडणूक रिंगणात असून, राजेश तळावलीकर हे प्रभाग 2, तर गीताली तळावलीकर प्रभाग 15 मधून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
रायझिंग फोंडाचे 12 उमेदवार रिंगणात
केतन भाटीकर यांच्या नेतृत्वाखाली रायझिंग फोंडा पॅनलचे एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या रायझिंग फोंडा पॅनेलच्या एक उमेदवार विद्या पुनाळेकर यांना भाजपने बिनविरोध निवडून आणून त्यांना आपल्या गटात घेतले आहे.
तीन माजी नगराध्यक्षांच्या
कन्याही नशीब आजमावणार
तीन माजी नगराध्यक्षांनी आपल्या कन्यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांची कन्या प्रतीक्षा नाईक प्रभाग 8 मधून, माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांची कन्या संपदा नाईक प्रभाग 15 मधून आणि माजी नगराध्यक्ष शैलेंद्र शिंक्रे यांची कन्या शुभलक्ष्मी शिंक्रे प्रभाग 11 मधून निवडणूक लढवणार आहे.
अन् ‘त्या’ उमेदवारास रडू कोसळले
भाजपच्या प्रभाग 13 मधील उमेदवार दर्शना नाईक यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आल्यानंतर त्यांना अक्षरश: रडू कोसळले. त्या रडतच निर्वाचन अधिकाऱ्यांकडे गेल्या आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पत्रकारांनी संवाद साधतानाही त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.
साखळी पालिका निवडणुकीत चार प्रभागांत थेट लढत
>> 23 जणांनी घेतली माघार; 31 उमेदवार रिंगणात
साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतल्याने भाजपचे रियाज खान हे प्रभाग 8 मधून, तर प्रभाग 5 मधून टुगेदर फॉर साखळी गटाचे प्रवीण ब्लेगन हे बिनविरोध निवडून आले. दोघांनाही निर्वाचन अधिकारी रोहन कासकर आणि राजाराम परब यांनी विजयी प्रमाणपत्रे दिली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत काल 23 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 31 उमेदवार रिंगणात असून, चार ठिकाणी दुरंगी लढत होणार आहेत. प्रभाग 3, 9, 10, 11 या चार प्रभागांत दुरंगी लढत होणार आहे. भाजप व टुगेदर फॉर साखळी गट यांच्या उमेदवारांत थेट लढत होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बिनविरोध निवडून आलेले रियाज खान यांचे अभिनंदन केले. तसेच प्रवीण ब्लेगन यांचेही त्यांनी अभिनंदन करताना साखळीच्या विकासाला सर्वांनीच साथ द्यावी, असे आवाहन केले. भाजप पॅनल पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, आमचा विजय निश्चित असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
साखळी नगरपालिका निवडणूक ः उमेदवारांची अंतिम यादी
प्रभाग क्रमांक – 1, एकूण उमेदवार – 4
उमेदवारांची नावे – 1. संतोष रामा हरवळकर, 2. गितेश गुरुदास माडकर, 3. कुंदा लक्ष्मीकांत माडकर, 4. यशवंत श्रीकांत माडकर
प्रभाग क्रमांक – 2 (महिला), एकूण उमेदवार – 5
उमेदवारांची नावे – 1. ज्योती संतोष गोसावी, 2. नूरजाँ अल्ताफ खान,
- प्रसादिनी गुरुदास कुडणेकर, 4. निकिता नामदेव नाईक,
- ईशा धर्मेश सगलानी
प्रभाग क्रमांक -3, एकूण उमेदवार – 2
उमेदवारांची नावे – 1. सुनीता विद्यादत्त वेरेकर, 2. सिद्धी संदेश पोरोब
प्रभाग क्रमांक – 4, एकूण उमेदवार – 3
उमेदवारांची नावे – 1. रश्मी दिलीप देसाई, 2. ओंकार दिलीप फुलारी, - धर्मेश प्रभुदास सगलानी
प्रभाग क्रमांक – 5
बिनविरोध – प्रवीण द्वारकानाथ ब्लॅगन
प्रभाग क्रमांक – 6 (महिला), एकूण उमेदवार – 4
उमेदवारांची नावे – 1. डॉ. सरोज प्रकाश देसाई, 2. मारियाकुट्टी शफी हसन, 3. विनंती विनायक पार्सेकर, 4. संचिता सचिन सालेलकर
प्रभाग क्रमांक – 7, एकूण उमेदवार – 4
उमेदवारांची नावे – 1. ब्रह्मानंद रघुनाथ देसाई, 2. विनोद रामनाथ पेडणेकर, 3. राजेंद्र काशिनाथ पोसनाईक, 4. संपतराव भास्करराव प्रभुदेसाई
प्रभाग क्रमांक – 8
बिनविरोध – रियास हमीद खान
प्रभाग क्रमांक – 9, एकूण उमेदवार -2
उमेदवारांची नावे – 1. भाग्यश्री प्रवीण ब्लॅगन, 2. आनंद बाबनी काणेकर
प्रभाग क्रमांक – 10 (ओबीसी), एकूण उमेदवार – 2
उमेदवारांची नावे – 1. राजेंद्र रमेश आमशेकर, 2. दयानंद पुंडलिक बोरयेकर
प्रभाग क्रमांक – 11 (ओबीसी महिला), एकूण उमेदवार – 2
उमेदवारांची नावे – 1. रश्मी राजेंद्र घाडी, 2. दीपा नीलेश जल्मी
प्रभाग क्रमांक – 12 (महिला), एकूण उमेदवार – 3
उमेदवारांची नावे – 1. अंजना अरूण कामत, 2. अश्विनी नीलेश कामत, 3. प्रज्वला मिलिंद नाईक
एकूण उमेदवार – 31