चोर्ला घाटातील अपघातात १ पर्यटक ठार; १३ जखमी

0
8

>> चालकाचा टेम्पो ट्रॅव्हलरवरील ताबा सुटल्याने स्वयंअपघात

चोर्ला घाटात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अपघात होत असून, काल टेम्पो ट्रॅव्हलरला झालेल्या स्वयंअपघातात एका पर्यटकाला आपले प्राण गमवावे लागले, तर १३ पर्यटक जखमी झाले. हे सर्व पर्यटक बागलकोट-कर्नाटक येथून चोर्ला घाटमार्गे पर्यटनासाठी गोव्यात येत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात पर्यटनासाठी कर्नाटकातील तीन टॅम्पो ट्रॅव्हलर्समधून पर्यटक येत होते. हे सर्व टेम्पो ट्रॅव्हलर चोर्ला घाटमार्गे काही पर्यटकांना घेऊन येत होते. चोर्ला घाटात पोहोचल्यानंतर त्यातील एका वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने स्वयंअपघात झाला. काल दुपारी अडीचच्या दरम्यान हा अपघात घडला. केए-५७-बी-७४७१ या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने स्वयंअपघात होऊन शिवानंद सज्जन (३८, रा. बागलकोट, कर्नाटक) यांचा मृत्यू झाला, तर वाहनातील अन्य १३ पर्यटक जखमी झाले. हे सर्वजण बागलकोट येथून गोव्यात येत होते. जखमींमध्ये वैभव सज्जन (५), नागप्पा नेरली (४९), श्रीरीष पोड्डा (३), सतीश पोड्डा (४१), पार्वती माट्टा (३२), सुरेश माट्टा (५२), लक्ष्मी मिरदा (२१) श्रीशील कट्टी (४७), गायत्री नड्डी (४०), महेश हंसमनी (३०), श्रीदेवी सत्तार (३३), शिवानंद तिली (३६) आणि महादेव सिंगची (२८) यांचा समावेश आहे.

या अपघाताची माहिती मिळताच लगेचच वाळपई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाळपई पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. तसेच त्यांनी रुग्णवाहिकेतून सर्व जखमी पर्यटकांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयइस्पितळात दाखल केले. या अपघातामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, चोर्ला घाटात सातत्याने अपघात घडत असून, हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. या मार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी होत आहे.