चेन्नईचा सलग पाचवा विजय

0
141

>> हैदराबादवर ७ गड्यांनी मात

>> ऋतुराज, ड्यूप्लेसिसची विस्फोटक अर्धशतके

ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यूप्लेसिस यांनी शानदार अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी केलेल्या १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादवर ७ गडी व ९ चेंडू बाकी राखत मात करीत आयपीएलच्या १४व्या पर्वातील आपल्या सलग पाचव्या विजयाची नोंद केली. तर हैदराबादचा हा पाचवा पराभव ठरला.

आरसीबीविरुद्धचा आपला सलामीचा सामना गमावल्यानंतर धोनीच्या धुरंधरांनी शानदार उभारी मारताना पुढचे सलग पाचही सामने जिंकले. विजयांचे पंचक साजरे केल्याने ते १० गुणांसह पुन्हा अव्वल स्थानी पोहोचले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने काल जबरदस्त सुरुवात केली. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके नोंदविली. ऋतुराज गायकवाड आज आक्रमक दिसून आला. राशीद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झालेल्या ऋतुराजने १२ चौकारांसह ४४ चेंडूंत ७५ धावांचे योगदान दिले. ड्यूप्लेसिसने ६ चौकार व १ षटकार खेचत ३८ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. राशीदने त्याला पायचितचा शिकार बनवला. मोईन अली १५ धावा करून परतल्यानंतर रवींद्र जडेजा (नाबाद ७) आणि सुरेश रैना (नाबाद १७) यांनी विजयी सोपस्कार पूर्ण केले.
तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व ३ गड्यांच्या मोबदल्यात १७१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. कर्णधार डेव्ह़िड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोव सलामीला फलंदाजीसाठी आले. मात्र, बेअरस्टो चौथ्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर केवळ ७ धावा करुन बाद झाला. परंतु त्यानंतर कर्णधार वॉर्नरने संयमी फलंदाजी करताना मनीष पांडेच्या साथी १७ व्या षटकापर्यंत टिच्चून फलंदाजी करताना दुसर्‍या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. लुंगी एन्गिडि ही जोडी फोडली. त्याने आयपीएलमध्ये वैयक्तिक ५०वे अर्धशतक नोंदविणार्‍या वॉर्नरला रवींद्र जडेजाकरवी झेलबाद केले. आयपीएलमध्ये ५० अर्धशतके नोंदविणारा वॉर्नर हा पहिला फलंदाज बनला आहे. त्याच बरोबर त्याने आपल्या ५७ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या दरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचाही पल्ला गाठण्याचा पराक्रमही केला. वॉर्नरने ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांचे योगदान दिले. त्याच षटकात एन्गिडीने मनीषलाही परतीचा रस्ता दाखवला. मनीषने ४६ चेंडूत ५ चौकार व १ षटकारासह ६१ धावांची खेळी केली.

वॉर्नर आणि पांडे तंबूत परतल्यानंतर केन विलियम्सनने केदार जाधवच्या साथीत आपला धडाका दाखवत हैदराबादला २० षटकांत १७१ धावांपर्यंत पोहचवले. विल्यम्सनने १० चेंडूत नाबाद २६ धावा कुटल्या. तर केदार जाधव ४ चेंडूत १२ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने २ तर सॅम करनने १ बळी मिळविला.

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. रवींद्र जडेजा गो. लुंगी एन्गिडी ५७, जॉनी बेअरस्टोव झे. दीपक चहर गो. सॅम करन ७, मनीष पांडे झे. फाफ ड्यूप्लेसिस गो. लुंगी एन्गिडी ६१, केन विल्यमसन नाबाद २६, केदार जाधव नाबाद १२.
अवांतर ः ८. एकूण २० षटकांत ३ बाद १७१ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-२२ (जॉनी बेयरस्टोव, ३.२), २-१२८ (डेव्हिड वॉर्नर, १७.१), ३-१३४ (मनीष पांडे, १७.५)

गोलंदाजी ः दीपक चहर ३/०/२१/०, सॅम करन ४/०/३०/१, शार्दुल ठाकूर ४/०/४४/०, मोईन अली २/०/१६/०, लुंगी एन्गिडी ४/०/३५/२, रवींद्र जडेजा ३/०/२३/०.

चेन्नई सुपर किंग्ज ः ऋतुराज गायकवाड त्रिफळाचित गो. राशीद खान ७५, फाफ ड्यूप्लेसिस पायचित गो. राशीद खान ५६, मोईन अली झे. केदार जाधव गो. राशीद खान १५, रवींद्र जडेजा नाबाद ७, सुरेश रैना नाबाद १७.
अवांतर ः ३. एकूण १८.३ षटकांत ३ बाद १७३ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-१२९ (ऋतूराज गायकवाड, १२.६), २-१४८ (मोईन अली, १४.५), ३-१४८ (फाफ ड्यूप्लेसिस, १४.६).

गोलंदाजी ः संदीप शर्मा ३.३/०/२४/०, खलील अहमद ४/०/३६/०, सिद्धार्थ कौल ४/०/३२/०, जगदिशा सुचित ३/०/४५/०, राशीद खान ४/०/३६/३.

वॉर्नरचा पराक्रम
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत ५५ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ५७ धावांची संयमी खेळी केलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले. वॉर्नरचे हे आयपीएलमधील वैयक्तिक ५०वे अर्धशतक ठरले. अशी कामगिरी करणार तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या पाठोपाठ आता दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन ४३ अर्धशतकांवर आहे. तर आरसीबी कर्णधार विराट कोहली ४० अर्धशतकांसह या लिस्टमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. याशिवाय वॉर्नरने टी-२० क्रिकेटमध्येही १० हजार धावा पूर्ण केल्या. कालच्या आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान ४०वी धाव घेताच तो क्रिस गेलसह कीरॉन पोलार्ड आणि शोएब मलिक या फलंदाजांच्या एलिट यादीत सहभागी झाला. आपल्या अर्धशतकी खेळी आयपीएलमध्ये २०० षटकार ठोकणार्‍या फलंदाजांच्या क्लबमध्येही सामील झाला आहे.