चीन थांबवणार पाकिस्तानमधील प्रकल्प

0
39

>> चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा विस्तार थांबवला

चीनने त्यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला 60 अब्ज डॉलर्सचा चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाचा विस्तार थांबवला आहे. तसेच चीनने पाकिस्तानमधील ऊर्जा, जल व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी संबंधित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासही नकार दिला आहे. गिल्गिट-बाल्टिस्तान, खैबर-पख्तुनख्वा आणि पीओकेसह किनारपट्टी भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी गुंतवणूक करण्यापासून चीननेही माघार घेतली आहे.

याबाबत बोलताना चीनने पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि आर्थिक आणि राजकीय स्थैर्य यावर समाधानी झाल्यानंतरच नवीन प्रकल्पात गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानची अस्थिरता आणि गरिबीसोबतच चीनचे खूप मोठे कर्ज असल्याचेही मानले जाते. अशा परिस्थितीत चिनी गुंतवणूकदारांची कर्जफेड होईल की नाही, याबाबतचा विश्वास नाही. चीन व्यतिरिक्त, पाकिस्तानने सौदी अरेबिया आणि यूएईकडूनदेखील कर्ज घेतले आहे.

त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या ज्या भागातून हा कॉरिडॉर जातो तेथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कमकुवत आहे. कॉरिडॉरचा बहुतांश भाग बलुचिस्तानमधून जातो, परंतु तेथे सुरक्षा आणि राजकीय अस्थिरता कायम आहे. पाकिस्तानातील बलुच लिबरेशन आर्मी ही चीनसाठी धोका असल्याचे चीनचे मत आहे. त्याचबरोबर अल कायदा आणि इसिसने चीनच्या कॉरिडॉर प्रकल्पालाही लक्ष्य केले आहे. पाकिस्तानचे राजकीय पक्ष आणि लष्कर यांच्यातील संघर्षही हा प्रकल्प अडचणीत आणत आहे. अनेक छोट्या प्रादेशिक पक्षांनी प्रकल्पाच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. या प्रकल्पाबाबत राज्य सरकारे आणि खुद्द पाकिस्तान सरकार दोघेही सहमत नाहीत. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्पावर काम करणारे चिनी अभियंते आणि कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना धोका असल्याचे चीनचे म्हणणे आहे.
इकॉनॉमिक कॉरिडॉर ही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याची सुरुवात 2013 मध्ये झाली. यामध्ये पाकिस्तानमधील ग्वादर ते चीनमधील काशगरपर्यंत 50 अब्ज डॉलर खर्च करून एक आर्थिक कॉरिडॉर बनवला जात आहे.