>> वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून उपाययोजना; चिरेखाणी, नाले, धबधब्यांत न उतरण्याचा लोकांना सल्ला
राज्यातील वापरात नसलेल्या चिऱ्यांच्या खाणींत दरवर्षी माणसे बुडून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडू लागल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने आता ह्या चिरेखाणींभोवती कुंपण उभारण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, रविवारी भटवाडी-नानोडा येथील चिरेखाणीत मोहित कश्यप हा 17 वर्षीय मुलगा बुडून मृत्यू पावला होता, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.
ज्या चिऱ्यांच्या खाणी कायदेशीर आहेत, त्या खाणींच्या मालकांना चिरे काढून झाल्यानंतर खाणींभोवती कुंपण उभारण्याची अट खाण खात्याने घातलेली आहे. त्यामुळे ह्या कायदेशीर खाणींभोवती चिरे काढून झाल्यानंतर संबंधित कुंपण घालत असतात. मात्र, जे लोक बेकादेशीररित्या चिरे काढत असतात, ते चिरे काढून झाल्यानंतर खाणींभोवती कुंपण उभारत नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काल पावसाळ्यासाठीची सज्जता व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन याविषयीची एक संयुक्त बैठक नौदल, तटरक्षक दल, रेल्वे, तसेच विविध सरकारी खात्यांबरोबर घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी जा; मात्र ह्या धबधब्यांत पोहण्यासाठी जाऊ नका, अस सल्लाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. राज्यात कित्येक ठिकाणी धबधबे असून, तेथे सुरक्षेची व्यवस्था करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ह्या धबधब्यांत पोहण्यासाठी उतरणे धोक्याचे असल्याचे सूचना फलक लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बुडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या व खासगी संस्थांच्या पाणबुड्यांची मदत घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
स्मार्ट सिटीचे 95 टक्के काम पूर्ण
पणजी स्मार्ट सिटीचे 90 ते 95 टक्के एवढे काम पूर्ण झाल्याची माहिती काल मुख्यमंत्र्यानी दिली. यासंबंधी पणजी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स हे येत्या एक-दोन दिवसांत पणजी महापालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना घेऊन या कामाची संयुक्त पाहणी करणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
शाळा 4 जूनलाच सुरू होणार
4 जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असली तरी राज्यातील विद्यालये 4 जूनपासूनच सुरू होणार असल्याचा पुनरुच्चार काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. मतमोजणीच्या दिवशी शाळा सुरू करण्यात येतील का, असे पत्रकारांनी विचारले असता शाळांचा संबंध मतमोजणीशी जोडू नका. शाळा 4 जून रोजीच सुरू होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.