चाकरमान्यांचा परतीचा प्रवास महागला

0
32

>> खासगी बसगाड्यांच्या तिकिट दरात वाढ; मुंबई, पुण्यात जाणार्‍यांना भुर्दंड

गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातून परराज्यात जाणार्‍या खासगी बसगाड्यांच्या तिकिट दरात प्रचंड वाढ झाली असून, गोव्यातून मुंबई, पुणे, बंगळुरू, तसेच अन्य मोठ्या शहरात जाणार्‍या खासगी बसगाड्यांच्या तिकिटांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे गोव्यातून अन्य राज्यांतील महानगरांत जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

ज्या खासगी बसगाड्यांचे दर ६०० ते ८०० च्या आसपास होते, त्या बसेसचे दर आता २००० रुपयांपेक्षा वर गेल्याने अन्य राज्यांतील महानगरांत जाणार्‍या प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यातील मोठ्या बस कंपन्यांकडून अशा प्रकारे प्रवाशांची लूट चालू असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याच्या तक्रारी प्रवाशी करताना दिसत आहेत. गोव्यात आलेल्या पर्यटकांबरोबरच चतुर्थीसाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनाही या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या तिकिट दरांचा फटका बसला आहे. मुंबई, बेंगळुरु, पुणे, कोल्हापूर व अन्य विविध शहरांतून चाकरमानी तसेच या शहरात उच्च शिक्षण घेणारे गोमंतकीय विद्यार्थी मोठ्या संख्येने चतुर्थीनिमित्त गावी परतले होते. आता चतुर्थी संपल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातून पुन्हा परराज्यातील महानगरांत परताना त्यांना दुप्पट ते तिप्पट दरात बसगाड्यांची तिकिटे खरेदी करावी लागत असल्याने हे प्रवाशी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

चाकरमान्यांच्या एका कुटुंबातील पाच जणांना मुंबईला जायचे असेल, तर त्यांना तिकिटांसाठी सुमारे १०५०० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच एकाच कुटुंबातील एवढ्याच सदस्यांना पुण्यात जायचे असेल, तर त्यांना अंदाजे ७५०० रुपये मोजावे लागत आहेत.

चतुर्थीच्या गर्दीची संधी साधून या खासगी बस कंपन्या प्रवाशांना लुटू लागलेल्या असताना कुणीही या खासगी बस कंपन्यांना जाब विचारत नसल्याचे पाहून आश्‍चर्य वाटत असल्याचे मत मुंबईकडे निघालेल्या एका चाकरमान्याने दै. ‘नवप्रभा’शी बोलताना व्यक्त केले. या बस कंपन्या अशा प्रकारे तिकिटांचे दर दुप्पट तिप्पट कशा काय वाढवू शकतात, कायद्याने असे दर वाढवण्यास मान्यता आहे का, असा सवालही सदर प्रवाशाने केला.

प्रत्येक सणाच्यावेळी तसेच नववर्षाला अशा प्रकारे खासगी बसगाड्यांच्या तिकिटांचे दर असे अव्वाच्या सव्वा वाढवण्यात येतात हे थांबायला हवे, असे मत आणखी एका प्रवाशाने व्यक्त केले. गोवा सरकारने या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी या प्रवाशांनी केली.

गोव्यातून मुंबईला जाणार्‍या स्लीपर कोचच्या तिकिट दरात बस कंपन्यांनी मोठी वाढ केलेली असून, ८०० रुपयांच्या तिकिटांचे दर २१०० रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. गोव्यातून पुणे शहरात जाणार्‍या स्लीपर कोचचे दर ७०० ते ८०० रुपयांवरून तब्बल १७०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. गोव्यातून बंगळुरू येथे जाण्यासाठी जवळपास १५०० ते १७०० रुपयांपर्यंत दर वाढवण्यात आले आहेत.