चला पर्यटनाला!

0
795

– वासुदेव कारंजकर

फिरण्याची आवड प्रत्येकाला असते, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आणि टूरवर जायचं म्हटलं की समोर बरेच प्रश्‍न उभे राहतात. पर्यटनस्थळांची माहिती, राहण्याची- फिरण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था… या सर्व विचारांनी माणूस घाबरून जातो व त्याची फिरण्याची इच्छा एक स्वप्नच बनून राहते. पण आता तशी काळजी करण्याचे कारण नाही. तुमची टूर तुम्ही अरेंज करू शकता. चला तर मग….

सर्व दृष्टींनी निसर्गसंपन्न अशा भारतात काय नाही? आपल्याकडे मैलोन्‌मैल पसरलेली वाळवंटे आहेत, उंच शिखरमाथ्यांचे पर्वत आहेत, समृद्ध समुद्रकिनारे आहेत. प्राण्यांचे वसतिस्थानं असलेली अभयारण्ये आहेत. विविधतेने नटलेली जंगलसंपदा आहे. हिरव्यागार लतावृक्षांनी नटलेल्या वनराई आहेत, प्राचीनतेचे प्रतीक असलेली मंदिरे आहेत, हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असलेली शिल्पकला आहे…. अशा ठिकाणी परदेशी पर्यटक तर मोहित होतातच, पण हल्ली भारतीय पर्यटकही दिसू लागले आहेत.
मुलांच्या परीक्षा संपल्या की मग त्यांचा तगादा सुरू होतो- कुठेतरी फिरायला जाऊ! कारण, आता सारखं-सारखं मामाच्या गावी त्यांना जायला नको वाटतं. नवीन प्रांत, तिथल्या विविधता त्यांना साद घालत असतात. त्याच त्याच रुटीनला पालक पण कंटाळलेले असतात. मग कुठेतरी जायची टूम निघते. बरोबर ग्रुप असेल तर मग दुधात साखर! तसंही आता घरबसल्या इंटरनेटवरून बुकिंग करून ट्रिप अरेंज करता येते. ते जमण्यासारखं असेल तर ठीक, नाहीतर सरळ एखादी टूर कंपनी गाठा. आजकाल बर्‍याच टूर कंपन्यांच्या जाहिराती सर्वत्र झळकत असतात, त्यांना ऍप्रोच व्हावं. हे सोप्पं. खाणं, पिणं, राहाणं, प्रवास सगळी सोय तेच पाहतात. आपण पैसे भरले की काम झालं! पण फक्त जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. आपण निवडलेल्या टूर कंपनीबद्दल, तिच्या आलेल्या अनुभवाबद्दल मित्रमंडळीत बोलून खात्री करून मगच ठरवा.

फिरण्याची आवड प्रत्येकाला असते, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आणि टूरवर जायचं म्हटलं की समोर बरेच प्रश्‍न उभे राहतात. पर्यटनस्थळांची माहिती, राहण्याची- फिरण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था… या सर्व विचारांनी माणूस घाबरून जातो व त्याची फिरण्याची इच्छा एक स्वप्नच बनून राहतं. पण आता तशी काळजी करण्याचे कारण नाही. तुमची टूर तुम्ही अरेंज करू शकता. ते काम आता अगदी सोपं झालेय.

अगदी गोव्याबाहेर ट्रिपला जाणे शक्य नसेल तर गोव्यातही चार दिवस चेंज म्हणून जाऊन राहता येतील अशी काही ठिकाणं आहेत. पणजी, फोंड्यासारख्या शहरांत राहणार्‍यांनी नेत्रावळी, सुर्ल किंवा केप्याला वा अशाच कुठल्या तरी हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या, जवळ जुने मंदिर, नदी किंवा झर असलेल्या गावात जाऊन राहायला काय हरकत आहे? मुलांनाही चेंज म्हणून चार दिवस हुंदडायला मिळतील. सरकारनेही अशा ठिकाणी राहायची व्यवस्था उपलब्ध केली पाहिजे किंवा तिथल्या काही ग्रामस्थांना त्यांच्या घराला एक-दोन खोल्या वाढवायला उत्तेजन दिले पाहिजे, ज्यात आवश्यक त्या सोयी उपलब्ध असतील. कोकणातील किनारी भागात अशी पर्यटकांसाठी सोय आहे. यामुळे गोव्याच्या ग्रामीण संस्कृतीची मुलांना नव्याने ओळख होईल. त्यांचे निसर्गाच्या सान्निध्यात जाणे होईल. थोडक्यात, जी गोष्ट ‘स्पाइस फार्म’द्वारे परदेशी टुरिस्टांसाठी केली जाते, त्या प्रकारची स्थानिक पर्यटकांनाही आवडतील अशी सोयी असलेली ठिकाणे उपलब्ध होतील. सुट्टीत पुण्या-मुंबईला मुलांसाठी खेड्यातील निवासी शिबिरांच्या जाहिरातीचे पेव फुटते. गोव्याच्या वर्तमानपत्रात कोणी असे काही वाचलेले आठवत नाही.

उपलब्ध पैशांच्या सत्तर ते ऐंशी टक्के रकमेत बजेट बसत असेल तरच त्या ठिकाणी जायचे पक्के करावे. आमचा अनुभव असा आहे की, पैसे नवरा-बायको दोघांनीही विभागून बाळगावेत. खिशात किंवा पर्समध्ये थोडेच पैसे ठेवावेत. बाकी रक्कम, कार्डस् इत्यादी कपड्याच्या आतून गळ्यात घालायच्या कापडी पाउचमध्येच ठेवावीत. ‘वीणा वर्ल्ड’, ‘केसरी’, ‘एसओटीसी’ इत्यादी नामवंत प्रवाशी कंपन्या आपल्या सर्व ग्राहकांना असे पाऊच देतात. एखाद दुसरा मोजका दागिना, तोही अगदी आवश्यक असल्यास घालावा. ज्यांना अशा गोष्टी झोपताना वगैरे काढून ठेवायची सवय असते त्यांनी तर ही जोखीम मुळीच घेऊ नये. पुरुषांपेक्षा बायकांकडे पैसे जास्त सुरक्षित राहतात.

ट्रिपला जाण्यापूर्वी जायच्या ठिकाणचा, तिथे काय आहे त्याचा थोडाफार अभ्यास अवश्य करावा. लांबची टूर करणे शक्य नसल्यास जवळचेच ठिकाण निवडावे जिथे बरेच काही पाहाण्यासारखे असेल. त्यादृष्टीने औरंगाबादजवळची अजंठा-वेरूळची लेणी पाहाण्यासारखी आहेत. येथे रमणीय सृष्टिसौंदर्य असलेल्या एका प्रचंड नालाकृती डोंगरघळीमध्ये खडकात कोरलेली बुद्धकालीन लेणी आहेत. भगवान बुद्धाच्या जीवनावरचे विविध प्रसंग येथे भित्तीचित्रांच्या स्वरूपात पाहायला मिळतात. अजंठापेक्षा वेरूळची कैलासलेणी लहान, पण शिल्पात्मक वास्तुकलेचा अद्वितीय नमुनाच आहेत. शिवाय औरंगाबादमध्ये ‘बिवी का मकबरा’ ही ताजमहालाची प्रतिकृती आहे. इथली ऐतिहासिक ‘पाणचक्की’ बघण्यासारखी आहे.
आपल्या शेजारच्या राज्यात म्हणजे कर्नाटकात बरेच पाहाण्यासारखे आहे. त्याचे खरे सौंदर्य लपलेय ते तिथल्या शिल्पकलेत, जे आपल्याला हम्पी, होस्पेट, बदामी येथे बघायला मिळते. विजयनगरच्या साम्राज्याच्या समृद्धीच्या खाणाखुणा अजूनही तिथल्या शिल्पांवरून बघायला मिळतात. आदिलशहाच्या काळात बांधला गेलेला जगप्रसिद्ध गोलघुमट म्हणजे ‘व्हिस्परिंग डोंब’ पाहण्यासाठी परदेशी लोक गर्दी करतात. मुलुख मैदान ही तोफ तिथे पाहायला मिळते. शंभराच्या वर प्राचीन देवळांनी जिथला परिसर व्यापलाय ते ऐहोल गाव. जिथे नजर फिरवावी तिकडे देवळेच देवळे दिसतात. बदामी येथे प्राचीन लेण्यांचे दर्शन होते व खाली उतरल्यावर भूतनाथ तलावाचे विहंगम दर्शन घडते. बदामीचे शाकंभरीदेवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. हम्पी येथील भग्न अवशेष पाहिले की विजयनगरच्या त्या काळातल्या संपत्ती व संपन्नतेची कल्पना येते. कारण तिथल्या उघड्या बाजार चौकात हिरे माणके, सोने-नाणे यांची खरेदी-विक्री होत असे. बेळगावला जाऊन तेथून भाड्याने गाडी ठरवून तेथून विजापूर, तेथून खाली दक्षिणेला येत येत कुंडली संगम, ऐहोल, बदामी, हम्पी, होस्पेट, धारवाड आणि परत अशी चार दिवसांची छान टूर दोन फॅमिलीत मिळून करता येते.

उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी जायचं प्लॅनिंग असेल तर गोव्याहून जवळची म्हणजे पाचंगणी, महाबळेश्वर, माथेरान ही ठिकाणे आहेतच. जरा दूर जायचं असेल तर कर्नाटकातील कुर्ग हे निसर्गरम्य हिरवेगार असे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. वेलची आणि मसाल्याच्या झाडांची ओळख येथे होते. चहाचे मळे कॉफीबियांची पैदास पाहता येते. निसर्गाच्या कुशीतलं हे ठिकाण नक्कीच सगळ्यांना आवडेल असं आहे. त्यादृष्टीने केरळ हाही पर्याय चांगला आहे. गोव्यासारखीच हिरवाई, माडांची दाटी, तांबडी माती आणि येथे मासेही खायला मिळतात. केरळ हे आज मिनी मलेशियाच झाले आहे. गोव्याहून रेल्वेने जायला-यायला ते अगदी सोयीस्कर असे आहे.

लोणावळा, खंडाळा ही ठिकाणेही आपल्या टप्प्यात येणारी आहेत. तिथल्या गारव्यात फक्त निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत भटकायचं हाही एक वेगळा अनुभव. दक्षिण भारतातले कोडाईकनाल किंवा उटी ही थंड हवेची ठिकाणे गोव्याहून तशी जवळच आहेत. हैद्राबाद येथे असलेली ‘रामोजी फिल्मसिटी’ मुलांना आवडण्यासारखी आहे. म्हैसूरचे वृंदावन उद्यान पाहण्यासारखेच आहे. शिवाय म्हैसूर पॅलेस ही वास्तू रात्रीच्या विद्युत रोषणाईत पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे. पूर्वी जोग फॉल फार सुंदर दिसायचा. धरण बांधल्यानंतर पाणी अडवलं गेल्याने तो आता अगदी बारीक धारेच्या स्वरुपात पाहायला मिळतो. येथे जायचे तर ऑगस्टमध्येच. उन्हाळ्यात जोगला जाण्यात अर्थ नाही. मुरुडेश्वर गोकर्ण ही तशी एकदोन दिवसात पाहून येण्यासारखी ठिकाणे आहेत.

या विश्वात सर्वश्रेष्ठ शिल्पकार कोण असेल तर तो निसर्ग. त्याने आपल्या सभोवताली इतक्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत की डोळे दिपून जातात. उदाहरणच द्यायचे झाले तर अहमदनगरजवळ असलेली ‘रांजणखळगी.’ इथल्या कुकडी नदीच्या दोन्ही काठावर बेसॉल्ट खडक आहेत. या खडकांत निसर्गाचा हा अद्भुतरम्य आविष्कार पाहायला मिळतो. इथे जे नदीच्या पात्रातील काळ्या दगडात चित्रविचित्र खड्डे तयार झालेत ते प्रवाहात वाहत आलेल्या गोलगोल गोट्यांमुळे. ते गोटे पाण्याच्या प्रवाहामुळे रगड्यासारखे गोल गोल फिरतात आणि मग असे शेकडो लहान-मोठे रगडे येथे तयार झालेले दिसतात. दगडात तयार झालेले आकार पाहून गंमत वाटते. रांजणगावच्या गणपतीपासून जवळच हे क्षेत्र आहे. तिथे किनारी मळगंगा नदीची दोन मंदिरे आहेत व यांना जोडणारा एक झुलता पूलही पाहायला मिळतो. पायी चालत हे पाहता येतात. तिथून जवळच चिंचणी नावाच्या गावाजवळ मोराचीवाडी म्हणून उद्यान आहे. तिथे एकाचवेळी असंख्य प्रमाणात मोर पाहता येतात. ते असेच उघड्यावर माळरानात फिरताना दिसतात. तिथे आता एक रिसोर्ट बांधले आहे. पर्यटकांना पाहता यावे म्हणून ठराविक वेळी मोरांसाठी खायला देतात तेव्हा एकाचवेळी खूप मोर तिथे येतात. पिसारा फुलवलेले मोर पाहून मनही अत्यानंदाने नाचू लागते. मन आणखीन प्रसन्न करण्यासाठी वाटेतल्या रांजणगावच्या गणपतीचेही दर्शन घेता येते. वाटेत बरीच हॉटेल्स आहेत, त्यामुळे खाण्याचा प्रश्न येत नाही. पण उन्हाळा असल्याने तब्येतीची काळजी घेतच प्रवास करावा. बरोबर भरपूर प्यायचे पाणी, गॉगल, कॅप, डोक्याला बांधायचा रुमाल असा सगळा जामानिमा करूनच प्रवासाला निघावं. तब्येत चांगली तर प्रवासाची मजा घेता येते. महत्त्वाचे म्हणजे कुठेही उघड्यावरचे पदार्थ आणि पाणी पूर्णपणे टाळावे. शिवाय पोटातल्या इन्फेक्शनवर घ्यायच्या गोळ्यांचा स्टॉक सतत जवळ ठेवावा.

थोड्या जास्त दिवसांच्या सुट्टीचा प्लान असेल तर राजस्थानातील माउंट अबू हे ठिकाण खास उन्हाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. माउंट अबू हे हिलस्टेशन असल्याने तिथे जाताना खूप मोठा घाट लागतो. डोंगर चढून, वळणा-वळणाच्या रस्त्याने गोलगोल फिरत जाऊन आपण वर माउंटअबूला पोहोचतो. अर्ध्या अंतरातच हवेतला बदल जाणवतो. छान गुलाबी थंडी जाणवू लागते. आरवली पर्वतातले हे सुप्रसिद्ध हिल स्टेशन. इथला सनसेट पॉईंटचा सूर्यास्त वेगळ्या रूपात सामोरा येतो. थंडी असल्याने हवेत दाट धुके पसरलेले असते. त्या जाड दुलईत आपलं अंग आत अलगदपणे ओढत झोपी जाणारे एखादे बालक हळूहळू डोकेही आत घेऊन पांघरुणात दिसेनासे होते तसा सूर्य क्षितिजावरच्या धुक्याच्या दुलईत शिरतो. महाराष्ट्रातील महाबळेश्वरला हिलस्टेशन म्हणून जे महत्त्व आहे तसेच माउंटअबूला राजस्थानात आहे. त्याशिवाय ते गुजरातच्या सीमारेषेजवळ असल्याने जास्त पर्यटक गुजरातकडून येतात. जणू काही हे राजस्थान आणि गुजरात या राज्यांचे सामाईक हिलस्टेशन आहे. या पर्वतावरचे सगळ्यात उंच शिखर म्हणजे गुरू शिखर. ते पाहण्यासाठी पायर्‍या सुरू होतात तिथपर्यंत जीपने जाता येते. पुढे चढावे लागते. वर पोचल्यावर श्रीदत्तात्रयाच्या मूर्तीचे दर्शन होते. माउंट अबू पर्वतावर, काळ्या पत्थराच्या या डोंगरावर दगडात नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या मोठमोठ्या पोकळ्या आहेत. या डोंगरावर काळ्या महाकाय दगडाचे दोन आकार कासव आणि बेडकासारखे दिसतात. त्यांना अनुक्रमे ‘टरटल’ नेक रॉक आणि ‘टोड’ रॉक अशी नावे आहेत.

शहराच्या जवळ ‘प्रजापिता ब्रह्मकुमारी’ आश्रम आहे. हा आश्रम भाविकांच्या येण्याने सदैव गजबजलेला असतो. अंदाजे साठ वर्षांपूर्वी या आश्रमाची येथे निर्मिती झाली. तेव्हापासून ते एक श्रद्धास्थान बनले आहे. आत गेल्यावर पाहण्यासारखे बरेच आहे. तो सबंध परिसर सुंदर बाग-बगिचा, कारंजी यांनी सुशोभित केला आहे. रंगबिरंगी मूर्ती, चित्रे मांडून ठेवली आहेत. हा परिसर पाहायला वेळही बराच लागतो. अतिशय स्वच्छ, नीटनेटका असा हा आश्रम पाहताना प्रसन्न वाटते. मन शांत, पवित्र झाल्यासारखे वाटते.

खाली उतरल्यावर गावात ‘नाकी’ लेक आहे. लेकमधले बोटिंग हा एक मुलांसाठीचा आकर्षक विषय. खरेदीसाठी खूप मोठा बाजार आहे. इथली जैन मंदिरे इतकी सुंदर आहेत की ती पाहताना आपण थक्क होऊन जातो. जाईची पांढरी नाजूक फुले संगमरवरी दगडात कोरलेली पाहून देशीविदेशी पर्यटक तोंडात बोटे घालतात. लहानांबरोबर मोठ्यांनाही आवडेल असंच हे डेस्टिनेशन आहे.

मध्य प्रदेशातलं पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण. हे बरचसं पाचंगणीसारखं आहे. एक छोटंसं हिलस्टेशन आहे. इथे निसर्गाने आपल्या सौंदर्याची लयलूट केलीय. सातपुडा पर्वतशृंखलेतला हा एक मेरुमणी. ठिकठिकाणी कोसळणारे छोटे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. दाट वनराईने लपेटलेलं पंचमढी एक सुंदर ठिकाण आहे. हायकिंग- ट्रेकिंग करणार्‍यांसाठी इथली शिखरे साद घालत असतात. येथे पांडव लेणी पाहायला मिळतात. फार काही उंच व मोठ्या आकाराची नाहीत, पण वरून पंचमढी गावाचं दर्शन होतं. आत जाताना सुंदर बाग आहे. येथे पांडव वनवासात असताना राहिले होते असे सांगतात.

पाषाण खंडातून एक गुहा, जी पवित्र मानली जाते, याच्या शिखरांचा आकार शंकराच्या जटांसारखा असल्याने त्याचे नाव ‘जटाशंकर’ पडलेय. भगवान महादेव राक्षसराजा भस्मासुरपासून रक्षण व्हावे म्हणून येथे येऊन लपले, गुप्त झाले अशी आख्यायिका आहे. छोटा महादेव येथे शंकराची मूर्ती, पिंडी आहे व येथे कड्यावरून पडणार्‍या पाण्याचे प्रवाह शिवाच्या जटांसारखे वाटतात.

पाताळेश्वर इथे जाताना दोनशे पायर्‍या उतरून खाली जावे लागते. जाताना दगडामध्ये तयार झालेले विविध आकार दिसून येतात. कुठे गणेश तर कुठे हनुमान इत्यादी. आपणही मग कल्पना करू लागतो, नावे, आकार शोधू लागतो. आत एका घळीत शिवाची पिंड आहे. त्यावर निसर्गातल्या शुधोद्काचा सतत अभिषेक होत असतो. हे ‘गुप्त महादेव’ ठिकाण. गुप्त झालेले महादेव एका दुसर्‍या ठिकाणी प्रगट झाले त्या ठिकाणाला ‘प्रगट महादेव’ म्हणतात. इथल्या मूर्तीपर्यंत जाणे मोठ्या जिकिरीचे काम. कारण दोन मोठ्याल्या शिळा व त्यांमधून तुम्हाला जावे लागते. तेही सरळ जाता येत नाही, आडवे आडवे जावे लागते. आतला माणूस बाहेर येईपर्यंत बाहेरचा माणूस आत जाऊ शकत नाही. इथे जाड्या माणसाना नो एन्ट्री! जेमतेम नऊ-दहा इंच रुंदीच्या घळीतून पन्नास- साठ मीटर आत जावे लागते. जावे तिथे शंकराच्या भक्तीने भारलेले असे हे मध्य प्रदेशातले पंचमढी. इथल्या गव्हरमेंट टुरिझम रिसॉर्टच्या राहायच्या खोल्या खूप छान अन् निसर्गरम्य परिसरात आहेत.

एखाद्या हिंदी सिनेमात शुभ्र बर्फाळ पार्श्वभूमीवरचे गाणे किंवा सीन पाहिला की मनात अशा ठिकाणी जाण्याची इच्छा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. बर्फ म्हणजे धम्माल! बर्फाळ प्रदेशापासून कोसो दूर असलेले आपण. आपला संबंध फक्त फ्रीजमधल्या बर्फाशी येत असतो. अशा बर्फात खेळायला मिळालं तर काय बरं होईल असं कडकडीत उन्हाळ्यात वाटणं स्वाभाविक आहे. मग अशी ठिकाणे असलेल्या भागांचा शोध घेतला जातो. दूर जाणे शक्य नसेल तर कोल्हापूर व हैद्राबाद इथे कृत्रिमरीत्या स्नो फॉल घडवून आणला जातो. तिथे इंडोअर बर्फात खेळण्यासाठी स्टेडियम बनविली आहेत.

उकाड्याने जीव हैराण झालेला नि अंगांग घामाने निथळत असताना समोर गारेगार बर्फाचा गोळेवाला दिसावा तसं उन्हाळी पर्यटन म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती उत्तरांचल, हिमालयातली ठिकाणे. या प्रदेशात आपण उन्हाळ्यातच जाऊ शकतो. कारण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथल्या थंडी-वार्‍याला आपण तोंड देऊ शकत नाही. उन्हाळ्यात मात्र हा परिसर हिरवाईने नटलेला असतो. हवामानही सुखद असते. उत्तरेकडील हिमाच्छादित शिखरे आणि धुक्यात हरवलेल्या वाटा, हिरवाई नेसलेल्या दर्‍याखोर्‍या, नितळ पाण्याचे वाहते निर्झर, सुचीपर्णी वृक्षांची बने असे सारे पाहायला मिळते. सिमला, कुलू-मनाली, नैनिताल ही सगळी प्रेक्षणीय स्थळे येथेच पाहायला मिळतात. शिवाय याच्या आजूबाजूने असलेली प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे मनीकरण, कसौली, कुफ्री इथे घोड्यावरून रपेट करता येते. बर्फावर स्कीईंग करता येते. सर्वांसाठी हा अनुभव नवीन असतो. शिवाय डलहौसी, मसुरी, खजीयार, रानीखेत ही स्थळेही पाहाण्यासारखी आहेत. त्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचं तरी आऊटिंग होईल. ट्रेनच्या तिकिटाचा प्रश्न जरा बिकट असतो. बाकी विमानाने जाणार असल्यास वेळही वाचतो, प्रवासाचा कंटाळाही येत नाही. हा पर्याय जरा खर्चिक व जास्त दिवसांचा असल्याने तशी ट्रिप जरा आधीच बुक करावी, आयत्यावेळी प्लॅन करून चालत नाही.

हल्ली देशी किंवा विदेशी दोन्ही ठिकाणच्या पर्यटनस्थळांना बरे दिवस आलेत असे म्हणायला हरकत नाही. कारण तिथे दिसून येत असलेली पर्यटकांची खचाखच गर्दी. धकाधकी व धावपळीच्या जीवनप्रणालीमुळे वैतागलेला, शिणलेला जीव चार दिवस निवांतपणा, चेंज मिळावा म्हणून बाहेर पडताना दिसतो. चार दिवस नेहमीच्या जीवनापासून लांब, निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. शिवाय अशा ट्रिपमधून कुटुंबातल्या व्यक्तींचा निकटचा सहवास लाभतो. मोकळेपणी गप्पाटप्पा, हास्यविनोद होतात. मुलांनाही जरा मोकळेपणे दंगामस्ती करता येते. परीक्षांचं ओझं उतरलेलं असतं. शरीर आणि मन थकलेलं असतं. अशा वेळी समर व्हेकेशनमध्ये फिरायला जाणं हा चांगला पर्याय आहे. आपल्या खिशातल्या पैशाची ऊब आणि हाती असलेली सुट्टीची उपलब्धता विचारात घेऊन टूर प्लॅन केली पाहिजे. आपल्या कुटुंबाला मॅच होईल असं एखादं ओळखीतलं कुटुंब सोबत असेल तर उत्तमच! तसे टूरने गेल्याने ओळखी होतातच. ग्रुपही तयार होतात. अशावेळी उपयोगी पडणारा म्हणजे नवीन जोक्सचा संग्रह (प्रिंटआउट). पत्त्याचा कॅट, जादू येत असल्यास त्याचे साहित्य इत्यादी गोष्टीही जवळ बाळगाव्यात. या गोष्टीना जास्त जागा लागत नाही आणि त्या वेळ आल्यावर खूप उपयोगी पडतात.

प्रत्येक प्रवास म्हणजे एका नवीन अनुभवाची पडलेली भर असते. फार प्राचीनकाळी समुद्र ओलांडून परदेशी जाणं हे पाप मानलं जायचं. पण नंतर लोक देवदेव करायला तीर्थयात्रा करायला जायचे. पण त्याकाळी परिस्थिती अवघड असल्याने तो माणूस परत येईल की नाही याची शाश्वतीही नसायची. पण आता परिस्थिती बदललीय. जास्तीत जास्त लोक सुट्टी घालवण्यासाठी देशात तर कुणी देशाबाहेर जाताना दिसतात. प्रवास करण्याने आणल्या जाणिवा विस्तारित होतात. आपले आयुष्य समृद्धीकडे नेणारा भ्रमंती किंवा फिरणं हा एक राजमार्ग आहे. निसर्गाच्या अनेकविध रंगांचे डोळेभरून दर्शन घेताना तृप्त वाटतं. तोच सूर्य, तोच चंद्र, तीच धरा आणि तेच आकाश, पण प्रत्येक ठिकाणची त्यांची सौंदर्याची व्याख्या बदलायला लागते इतकी विविधता आहे. विविध माणसांचे विविध अनुभव घ्यायला मिळतात. त्यातूनच अनुभवसंपन्न निखळ असा आनंद मिळतो. दरवेळी तो चांगला असेलच असे नाही. क्वचित एखाद वेळेस तो कायमचा लक्षात राहील असा वाईटही असू शकतो. पण तरीही आयुष्याच्या डायरीत एका नव्या पानाची भर पडत असते. म्हणूनच प्रत्येकाने जमेल तसा जमेल तेव्हा प्रवास केला पाहिजे.