चर्चिल ब्रदर्सला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

0
119

आय लीग व चर्चिल ब्रदर्स क्लबचे म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकून घेण्यासाठी राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी सांगितले. युवा खेळाडूंचे भवितव्य, क्लबचा संपन्न इतिहास व देशाच्या फुटबॉलसाठी त्यांनी दिलेले योगदान नजरेसमोर ठेवून पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली.

क्लबचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव, मुख्य कार्यकारी अधिकारी वालंका आलेमाव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मागील चार दशकापासून फुटबॉलने गोव्याला व देशाला खूप काही दिले आहे. फुटबॉल हा गोव्याचा प्राण आहे. गोव्याच्या चर्चिल ब्रदर्ससह देशातील काही अन्य क्लबांनी भारतीय फुटबॉलच्या कोसळत्या डोलार्‍याला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाची केलेली मागणी रास्त असून राज्य सरकारच्या वतीने सर्व मदत केेली जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.

धेंपो, साळगावकर व स्पोर्टिंग क्लब दी गोवा यांनी आय लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर चर्चिल ब्रदर्स हा या स्पर्धेत खेळणारा एकमेव गोमंतकीय संघ राहिला आहे. आय लीग (२००८-०९), (२०१२-११३), ड्युरंड कप (२००७, २००९, २०११), फेडरेशन कप (२०१३-१४) या स्पर्धा चर्चिलने जिंकल्या आहेत. एफसी कप सारख्य प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी क्लबला मिळाली होती. त्यामुळे क्लबची कामगिरी लक्षात घेणे अपेक्षित असल्याचे वालंका आलेमाव यांनी क्लबची बाजू मांडताना म्हटले आहे.

संपूर्ण देशातील फुटबॉल खेळाडूंना व्यासपीठ देण्याचे काम चर्चिल ब्रदर्सने केले आहे. आय लीग या स्पर्धेचा प्रथम दर्जा हटविल्यास देशातील फुटबॉलचे प्रचंड नुकसान होणार आहे. आयएसएलमध्ये क्लब-फ्रेंचायझीच्या उन्नती किंवा अवनतीची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेला ‘लीग’ म्हणणे योग्य ठरणार नाही तसेच यामध्ये प्रवेश करण्याची कोणतीही संधी इतर क्लबांना नाही. आयपीएलप्रमाणेच केवळ आर्थिक हित लक्षात घेऊन या स्पर्धेची रचना करण्यात आली असून यामुळे ‘ती’ प्रथम दर्जाची स्पर्धा होऊच शकत नाही. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे फुटबॉलच्या विस्तार व विकासासाठी निश्‍चित धोरण नसल्यानेच गोव्यातील इतर क्लबांनी आय लीगमधून काढता पाय घेतल्याचे वालंका यांनी सांगत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले.

‘फुटबॉल हा गोमंतकीयांना जोडणारा समान धागा आहे. भारतीय फुटबॉलला गोव्याने अनेक दिग्गज दिले आहेत. गोव्यातील आघाडींच्या क्लबांपैकी एक असलेल्या चर्चिल ब्रदर्स एफसीचे गार्‍हाणे ऐकण्याचे विनंती मी पंतप्रधानांना करतो.’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत