चर्चिलचा गोकुळमला धक्का

0
98

गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने गोकुळम केरळचा कडवा प्रतिकार मोडून काढत कोलकाता येथे सुरू असलेल्या आय लीग स्पर्धेत काल सोमवारी ३-२ असा विजय संपादन केला. या विजयासह चर्चिलने गुणतक्त्यात आपले पहिले स्थान अधिक भक्कम करताना आपली गुणसंख्या १० सामन्यांतून २२ केली. राऊंडग्लास पंजाबने नेरोकावर १-० असा निसटता विजय मिळवत रियल काश्मीरला तिसर्‍या स्थानावर ढकलले. पंजाबचे १० सामन्यांतून १८ तर काश्मीरचे तेवढ्याच सामन्यांतून १७ गुण आहेत. चर्चिलकडून लुका मासेन याने २ गोल केले. यामुळे फर्नांडो वारेला यांच्या चर्चिलला पूर्ण तीन गुण कमावता आले.

गोकुळम केरळने सामन्याची सुरुवात वेगवान करतानाच पहिल्या तीन मिनिटांतच दोन संधी निर्माण केल्या. परंतु, व्हिन्सी बार्रेटो व फिलिप अजा यांना गोल नोंदविता आला नाही. सातव्या मिनिटाला गोकुळमचा गोलरक्षक उबेद सीके याने अजा याला दूर अंतरावर चेंडू पास दिला परंतु, घानाच्या खेळाडूला चर्चिलचा गोलरक्षक शिल्टन पॉल याला हुलकावणी देणे शक्य झाले नाही. २६व्या मिनिटाला चर्चिलने गोलकोंडी फोडली. ब्राईस मिरांडा याने विनिल पुजारीच्या क्रॉसवर दाबा मिळवत चेंडू मासेनकडे सोपविला.

मासेनने कोणतीही चूक न करता चेंडूला जाळीची दिशा दाखवली. वानलाल दुआता याला अवैधरित्या पाडल्यामुळे ३०व्या मिनिटाला गोकुळमच्या व्हिन्सी बार्रेटोला थेट रेड कार्ड दाखवून रेफ्रींनी बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे गोकुळमला १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. मध्यंतरापर्यंत चर्चिलचा संघ १-० असा पुढे होता. ५३व्या मिनिटाला स्वयंगोलामुळे चर्चिलला २-० असे पुढे जाता आले. चर्चिलच्या किंग्सली फर्नांडिसने लगावलेला फटका गोकुळमच्या दीपक देवरानी याला लागून गोकुळमच्या गोलजाळीत विसावला.

फिलिप अजा याने ८०व्या मिनिटाला गोकुळमचा पहिला गोल करत पिछाडी १-२ अशी कमी केली. लुका मासेन याने ८७व्या मिनिटाला पेनल्टी सत्कारणी लावत चर्चिलला ३-१ असे पुढे नेले. भरपाई वेळेत गोकुळमच्या जितीन याने संघाचा दुसरा गोल केला. परंतु, गोकुळमला शेवटपर्यंत बरोबरी साधता आली नाही.