घरटी एक सरकारी नोकरी, तोवर बेकारी भत्ता

0
41

>> ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांची घोषणा

>> खासगी क्षेत्रातील ८० टक्के नोकर्‍या स्थानिकांना राखीव

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आम आदमी पक्षाचे सरकार गोव्यात सत्तेत आल्यास प्रत्येक घरातील किमान एका तरुणाला सरकारी नोकरी आणि खाजगी क्षेत्रातील ८० टक्के नोकर्‍या स्थानिकांसाठी राखीव ठेवण्यासाठी खास कायद्याची तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिले. गोव्याच्या दौर्‍यावर आलेले आम आदमी पक्षाचे निमंत्रक केजरीवाल यांनी काल म्हापसा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हे आश्‍वासन दिले. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी यावेळी विविध आठ घोषणा केल्या. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे आपचे संयोजक राहुल म्हांब्रे, माजी मंत्री महादेव नाईक, प्रतिमा कुतिन्हो, सिसिल रॉड्रिग्स, वाल्मिकी नाईक, वेंजी व्हिएगस व इतर व्यासपीठावर हजर होते.

पुढे बोलताना केजरीवाल यांनी, आपची सत्ता गोव्यात आल्यास खाण आणि पर्यटन व्यवसाय पूर्ववत होईपर्यंत या व्यवसायावर अवलंबित कुटुंबियांना प्रत्येकी दरमहा ५ हजार रुपये भत्ता देणार असल्याची घोषणा केली. तसेच आप सत्तेवर येताच कायद्यात आवश्यक बदल करून खासगी क्षेत्रात ८० टक्के नोकर्‍या या स्थानिकांना आरक्षित करण्यात येतील अशीही महत्त्वाची घोषणा केली.

पुढे बोलताना केजरीवाल यांनी, गोव्यात पैशांची कमतरता नसून केवळ लोकांसाठी काहीतरी करण्याचा प्रामाणिक हेतू हवा. आम्ही घोषणा करीत आहोत, पण पैसे कुठून आणणार असे प्रश्न विचारले जातात. मात्र, दिल्लीत आम्ही अशक्य दिसणारी गोष्ट सत्यात उतरविल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे आपचे सरकार येताच आम्ही भ्रष्टाचाराला लगाम लावणार, जेणेकरून सर्व गोष्टी आपोआप जागेवर पडतील, असेही केजरीवाल म्हणाले.

सध्या गोव्यात बेरोजगाराची प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे युवक अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे रोजगार गेले व अनेकांवर उपासमारीची वेळ आली. याची दखल घेत आपने गोमंतकीयांसाठी विस्तृत योजना बनविली असून त्या अनुषंगाने आम्ही या नवीन घोषणा करीत आहोत. आम्ही सत्तेवर येताच लोकांना दिलेला शब्द पाळणार असल्याचेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.

गोव्यात नवीन शाळा, इस्पितळे, गाव दखावाने उघडण्यात येतील. आणि घरपोच सरकारी सुविधा उपलब्ध केल्या जातील. राज्यात अनेक नवीन उपक्रम राबविण्याची आमची तयारी असून येणार्‍या काळात आप सत्तेत आल्यानंतर ते करून दाखवेल असा विश्‍वास यावेळी केजरीवाल यांनी व्यक्त केला.

केजरीवाल यांच्या घोषणा
> कुटुंबातील किमान एकाला रोजगार
> रोजगार मिळेपर्यंत तरुणाला ३००० रुपये भत्ता
> खाण अवलंबित कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये
> गोव्यात कौशल्य विद्यापीठ उभारणार
> सरकारी नोकरी ही गुणवत्ता यादीवरच मिळेल
> खासगी क्षेत्रात ८० टक्के नोकर्‍या स्थानिकांसाठी आरक्षित
> सरकारी सुविधा घरपोच उपलब्ध करणार