राज्यातील पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग राखीवतेचे काम पूर्ण झालेले नाही. पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग राखीवतेचे काम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य प्रकारे करून घेण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकीच्या तारखेबाबत अंतिम निर्णय सोमवारी घेतला जाणार आहे, अशी माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिली.
राज्य निवडणूक आयोगाकडे पंचायत प्रभाग फेररचना आणि प्रभाग राखीवतेचे काम देण्यात आले आहे. राज्यातील १८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना जारी करण्यात आली आहे. आता, प्रभाग राखीवता तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रभाग राखीवता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न झाल्यास प्रभाग राखीवतेला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. त्यासाठी प्रभाग राखीवतेबाबत सरकारी पातळीवर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी प्रभाग राखीवतेच्या विषयावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.