ग्रामपंचायतींसाठी ७८.७० टक्के मतदान

0
20

>> उत्तर गोव्यात ८१.४५ टक्के, तर दक्षिण गोव्यात ७६.१३ टक्के; सत्तरी तालुक्यात सर्वाधिक, तर सासष्टीत सर्वांत कमी मतदान

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल ७८.७० टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यात ८१.४५ टक्के, तर दक्षिण गोव्यात ७६.१३ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक मतदान सत्तरी तालुक्यात ८९.३० टक्के आणि सर्वांत कमी मतदान सासष्टी तालुक्यात ६८.३३ टक्के नोंद झाले. ग्रामपंचायत निवडणुकीतील १४६३ प्रभागांतील ५०३२ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यात सीलबंद झाले असून, निकाल शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. ग्रामपंचायत मतदानाच्या काळात कुठल्याही मोठ्या अनुचित प्रकाराची नोंद झाली नाही. काही लहानसहान घटना वगळता राज्यभरात मतदान शांततेत पार पडले, अशी माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली.

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या १४६४ प्रभागात सकाळी ८ वाजता मतदानास प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासांत मतदारांमध्ये कमी उत्साह दिसून आला. त्यानंतरच्या पुढील दोन तासांत मतदार बाहेर पडले. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली. दुपारनंतर मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढून ती ७८.७० टक्क्यांवर पोहोचली.

उत्तर गोव्यातील कळंगुट ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभाग ९ मधील मतपत्रिकेवर चुका आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्या केंद्रावरील अधिकार्‍याने मतपत्रिकेत चूक असताना मतदान सुरूच ठेवल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. अखेर, या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर मतदान स्थगित करण्यात आले. ग्रामपंचायत पातळीवरील या निवडणुकीत प्रमुख राजकीय नेत्यांनी सहभाग घेतल्याने चुरस निर्माण झाल्याचे दिसून आले. या पंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवरील प्रस्थापित राजकारण्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

मतदानानंतर परतणार्‍या महिलेचा दुर्दैवी मृत्यू
शिरोडा-फोंडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करून घरी परतणार्‍या एका दांपत्याच्या धावत्या दुचाकी वाहनावर काल दुपारी वडाचे झाड पडले. या अपघातात व्यंकटेश नाईक यांची पत्नी अदिती नाईक (३९ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर व्यंकटेश नाईक (४७ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही त्वरित शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र अदिती नाईक यांचे उपचारादरम्याने निधन झाले.