गौतम, अमित, राजू गोव्याकडून खेळणार

0
86

सी.एम. गौतम, अमित वर्मा व सुनील राजू हे कर्नाटकचे त्रिकूट यंदाच्या मोसमात गोवा रणजी संघाकडून खेळणार आहे. २००८ साली कर्नाटककडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला गौतम २०१७-१८ मोसमापर्यंत संघाचा अविभाज्य घटक होता. परंतु, या मोसमात संघर्ष करावा लागल्यानंतर त्याला मागील मोसमात डच्चू देण्यात आला होता. गौतमने ९४ प्रथमश्रेणी सामने खेळताना ४१.३६च्या सरासरीने ४७१६ धावा केल्या आहेत. यात २४ अर्धशतके व १० शतकांचा समावेश आहे. गोव्याकडून मागील मोसमात खेळलेला कर्नाटकचा अन्य एक खेळाडू अमित वर्मा यंदाच्या मोसमातही खेळणार आहे. कर्नाटकचेच दोड्डा गणेश गोवा संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार असल्यानेच आपण गोव्याकडून खेळण्याचे मान्य केल्याचे गौतम याने सांगितले आहे. भारताकडून १९ वर्षांखालील क्रिकेट खेळलेला कर्नाटकचा अजून एक खेळाडू सुनील नारायण राजू तिसरा पाहुणा खेळाडू म्हणून खेळणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे राजू याने २०१२ साली आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. मागील वर्षी गोव्याला एलिट विभागात नऊ पैकी सात सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदाच्या मोसमात गोव्याला प्लेट विभागात खेळावे लागणार आहे. प्लेट गटात बिहार, पुदुचेरी, मेघालय, सिक्कीम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश व मिझोरम यांच्याशी गोव्याला खेळावे लागणार आहे.