गोष्ट ‘दिव्या’ची!

0
157

– सिद्धेश वि. गावस (फोंडा)

एरवी दिव्याच्या जागी कुणी दुसरी मुलगी असती तर तिनं कधीच त्याला घटस्फोट दिला असता. इथं दिव्याला तिच्या सासरच्यांनी त्रास दिला तरीसुद्धा त्याच्याबरोबर संसार करायला ती तयार झाली!!

दिव्या आज खूप आनंदात होती कारण तिला आज मुलगा बघायला येणार होता. ठरल्याप्रमाणे त्या मुलाने दिव्याला पाहिलं व लग्नासाठी होकार दिला. तसं दिव्यानेसुद्धा मुलगा पसंत आहे म्हणून होकार दिला. दिव्या तशी चांगली शिकलेली होती. जेव्हा तिला सांगितलं की तुझा होणारा नवरा कर्णबधीर आहे तेव्हा तिनं नकार देण्याऐवजी होकार दिला. काही दिवसांनी तिचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं.

सुरवातीला दिव्याला आपल्या नवर्‍याशी जुळवून घ्यायला त्रास झाला. पण हळुहळू ते जमायला लागलं. ती आता आपल्या नवर्‍याला चांगल्या रीतीने समजून घ्यायला लागली. पण घरच्यांच्या मनात काही वेगळेच होते. तिचा नवरासुद्धा तिला समजून घ्यायला लागला हे पाहून घरातील बाकीच्या मंडळींनी तिला टोमणे मारायला सुरुवात केली. तिचा नवरा कर्णबधीर असल्याकारणाने त्याला ते काही समजेना. तिने जर आपल्या नवर्‍याला घरातील मंडळींबद्दल सांगायचा प्रयत्न केला तर ते त्याला खरं वाटत नव्हतं. जेव्हा घरातील मंडळींना कळलं की दिव्याला आपण दिलेल्या त्रासाबद्दल सर्वकाही ती आपल्या नवर्‍याला सांगते, तेव्हा त्यांनी तिच्या नवर्‍यालाच दिव्याबद्दल वाईट सांगून तिच्याबद्दल त्याच्या मनात द्वेश निर्माण केला. साहजिकच एवढी वर्षे घरातील माणसांबरोबर राहून तो घरातील माणसांचंच ऐकणार. बिचारी दिव्या आता एकटी पडली व एक दिवस ती आपल्या आईच्या घरी गेली, पाठीमागून घरातील मंडळींनी तिने दागिने चोरून नेल्याचा आरोप तिच्यावर केला. तिच्या भावाने तिच्या घरच्यांची समजूत काढून हा वाद मिटवला. पण घरातील मंडळींनी ठरवलं होतं की काही करून दिव्याला घर सोडून जाण्यास भाग पाडायचंच.

एक दिवस घरात लहान मुलाचा वाढदिवस होता. त्या दिवशी तिचा नवरा थोडी दारू पिऊन आला. तेव्हा ते दिव्याला आवडले नाही. ती त्याच्यावर चिडली. दारू पिऊन आला असल्याने त्याला बरोबर चालता येत नव्हते. म्हणून तिने त्याचा शर्ट धरून अंथरुणावर त्याला झोपवलं. हेच निमित्त धरून घरातील मंडळींनी तिच्या नवर्‍याचे कान भरले… ‘तुझी बायको तुला मारते, तू घरी नसतोस तेव्हा तुझ्या आईला बोलते. तू तिला सोडून दे. तू तिला नाही सोडलीस तर तुझी आई जिवंत राहणार नाही.’ हे ऐकून तो घाबरला व तिला सोडायला तयार झाला. पण दिव्या त्याला सोडायला तयार नव्हती. शेवटी त्यांचं भांडण पोलीस चौैकीवर गेलं. तिचा नवरा पोलिसांना सांगू लागला की ती मला नको. पोलिसांना कळेना तो काय बोलतो ते! पोलिसांनीसुद्धा त्याला आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तिच्या नवर्‍याची भाषा समजण्यासाठी तज्ञ माणूस बोलावून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कळलं की तिच्या नवर्‍याला दिव्याबद्दल काहीच तक्रार नाही म्हणून. पण घरातील माणसांमुळे ती जशी सांगतात तसा वागू लागला. पण का? …
लग्नाच्या अगोदर घरातील सर्व कामं तो करत असे जसे कपडे धुणे, वाळत घालणे, भांडी घासणे वगैरे… आणि लग्न झाल्यावर ही कामे करायची त्याने बंद केली म्हणून! पण जर त्याच्याकडून घरातील सगळी कामंच करून घ्यायची होती तर त्याचं लग्न का केलं? करायचं म्हणून केलं का त्याचं लग्न? मग त्यात त्या दिव्याचा काय दोष? आज आपण समाजाकडे या अपेक्षेने बघतो की त्या मुलाला योग्य न्याय मिळावा म्हणून. पण इथे चित्र वेगळंच होतं आणि अशा मुलांना योग्य प्रशिक्षण दिलं तर तीसुद्धा चांगले काम करून स्वतःच्या पायांवर उभी राहू शकतात. शेवटी सर्व तक्रारी दूर करून ती दोघं नव्याने संसार करायला तयार झालीत.
एरवी दिव्याच्या जागी कुणी दुसरी मुलगी असती तर तिनं कधीच त्याला घटस्फोट दिला असता. इथं दिव्याला तिच्या सासरच्यांनी त्रास दिला तरीसुद्धा त्याच्याबरोबर संसार करायला ती तयार झाली!!