गोव्यात रुग्ण वाढण्याचा धोका

0
88

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना देशभरात पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढत असल्याने वेळीच सावध होण्याची गरज आहे. राज्यात येणार्‍या देशी पर्यटकांकडून कुठल्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले आहेत.
देशातील काही राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. तथापि, गोवा सरकारने देशभरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येची गंभीर दखल घेतलेली नाही.

गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गोवा सरकारने वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येची दखल घेऊन वेळीच उपाययोजना हाती घेण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अन्यथा, गोव्यातसुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारने देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारांना सतर्कतेचा आदेश जारी केला आहे.
गोव्यात कोरोना रुग्ण वाढीचा तूर्त धोका नाही. देशातील इतर भागांतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा अभ्यास केल्यानंतर उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती.

लसीकरणाला प्रतिसाद नाही
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आरोग्य कर्मचार्‍यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आयोजित खास मोहिमेला योग्य प्रतिसाद लाभला नाही. राज्यात केवळ अकरा हजार आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेला महिना उलटला तरी, आठ हजार आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. राज्यातील फ्रंट लाइन कर्मचार्‍यांकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला योग्य प्रतिसाद मिळत नाही. आत्तापर्यत साडेचार हजार फ्रंट लाइन कर्मचार्‍यांनी कोरोना लस घेतली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.