गोव्यात कोरोनाचे ३१ रुग्ण

0
124

>> बुधवारी एक नवीन सापडला; ९ झाले बरे

कोरोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण काल राज्यात सापडला असल्याचे माहिती काल आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर व्यक्ती ही आपल्या कुटुंबियांना गोव्यात आणण्यासाठी मुंबईला गेली होती. त्याच्या कुटुंबियांपैकी अन्य कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे चाचणीत आढळून आल्याचे मोहनन म्हणाल्या.

कोरोनाचा संसर्ग झालेले एकूण ३९ रुग्ण राज्यात होते. त्यापैकी ९ रुग्ण बरे झाले आहेत. मात्र काल आणखी एका रुग्णाची भर पडल्याने रुग्णांची संख्या ३१ वर गेली असल्याची माहिती मोहनन यांनी दिली.

बुधवारी सापडलेल्या रुग्णाला उपचारासाठी मडगाव येथील कोविड इस्पितळात भरती करण्यात आले आहे. तर त्याच्या कुटुंबियांना विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे मोहनन म्हणाल्या.

बुधवारच्या विमान प्रवाशांची
संख्या अनुपलब्ध
बुधवारी गोव्यात ६ देशी विमानांचे आगमन झाले. मात्र, त्यातून किती लोक आले ती संख्या उपलब्ध होऊ शकली नसल्याचे त्या म्हणाल्या.राज्यातील विद्यालये तसेच रेस्टॉरन्ट आदी सुरू करण्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून त्याबाबत केंद्र सरकार कोणत्या सूचना करते त्याची राज्य सरकार वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या रस्ता मार्गाने रोज अंदाजे ३५० लोक राज्यात येत असतात. तर ज्या दिवशी दोन रेल्वे गाड्या येतात त्या दिवशी या गाड्यांतून येणार्‍या प्रवाशांची संख्या सरासरी ५०० ते ६०० या आसपास असते, अशी माहिती त्यानी दिली.

विमान प्रवाशांची संख्या
सांगणे अशक्य
विमानांची ठराविक संख्या नसते. त्यामुळे त्याद्वारे सरासरी किती लोक येतात हे सांगता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या. रोज येणार्‍या लोकांमध्ये कोविड-१९ ची चाचणी करून प्रमाणपत्र घेऊन येणार्‍या लोकांचा आंकडा अत्यल्प म्हणजे ४ ते ५ च्या आसपास असतो, असे त्या म्हणाल्या.

कोरोना चाचणीसाठी मुंबईतील
प्रयोग शाळेची मदत
कोरोना चाचणीसाठी आता मुंबईस्थित सब अर्बन डायोग्नॉस्टीक या वायरोलॉजी प्रयोगशाळेचीही मदत घेण्यात येत आहे. उघड्यावर थुंकल्याप्रकरणी आतापर्यंत १७७ जणांना दंड करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.