गोव्याची मध्य प्रदेशवर सात गोलांची बरसात

0
106

>> संतोष करंडक पश्‍चिम विभागीय पात्रता स्पर्धा

संतोष करंडक पश्‍चिम विभागीय पात्रता स्पर्धेत काल बुधवारी गोव्याने मध्य प्रदेशवर सात गोलांची बरसात करताना ७-१ असा धमाकेदार विजय मिळविला. गोवा फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली होत असेलेली ही स्पर्धा धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे.
यजमान गोव्याकडून देवेंद्र मुरगावकर, सॅम्युअल कॉस्ता, ज्योकिम अब्रांचिस, लेस्ली रिबेलो, स्टेन्डली फर्नांडिस यांनी प्रत्येकी एक तर बदली खेळाडू ऍरन सिल्वाने दोन गोलांची नोंद केली. दुसर्‍या सत्रात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या साहील राजक याने मध्य प्रदेशकडून गोल केला. गोव्याने या सामन्यासाठी सुरुवातीच्या एकादशमध्ये दोन बदल केले. जेसन डिमेलोच्या जागी मेलरॉय फर्नांडिसने गोलरक्षकाची भूमिका बजावली तर लेस्ली रिबालोने स्टेन्डली याची जागा घेतली.

गोव्याने पहिल्या सत्रात वेगवान पासेसवर भर देताना प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवली. या खेळामुळे मध्य प्रदेशला चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. काही संधी वाया गेल्यानंतर गोव्याने लेस्ली रिबेलोकरवी पहिला गोल केला. रिभव सरदेसाई याने बॉक्सच्या कोपर्‍यावर दिलेल्या अचूक पासचा फायदा उठवताना लेस्लीने गोव्याला १-० असे आघाडीवर नेले. या यशस्वी प्रयत्नापूर्वी रिभवचा प्रयत्न मध्य प्रदेशचा गोलरक्षक मोहम्मद फयीझ याने उधळून लावला होता. पाहुण्या संघाच्या गोलरक्षकाने देवेंद्र, चैतन कोमरपंत व ज्योकिम यांचे पहिल्या सत्रातील प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही. यानंतर चैतन याने रिभवच्या पासवर केलेला गोलप्रयत्न बाजूच्या नेटला चाटून बाहेर गेला. पहिल्या सामन्याप्रमाणे अब्रांचिसने काल आक्रमकता दाखवली नाही. धेंपोच्या या खेळाडूने दुसर्‍या खेळाडूंना चेंडू पुरवण्यावर अधिक भर दिला. २१व्या मिनिटाला देवेंद्र मुरगावकरने गोव्याचा दुसरा गोल केला. चैतनचा प्रयत्न फयीझ याला नीट अडविता न आल्याने मिळालेल्या चेंडूवर ताबा राखत देवेंद्रने चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवली. जायबंदी लेस्ली याच्या जागी आलेल्या स्टेन्डली फर्नांडिस (४४वे मिनिट) याने काही वेळातच ज्योकिमच्या पासवर ताबा राखताना गोव्याचा तिसरा गोल केला. मध्यंतरालाही वेळ असताा देवेंद्रने चेतनला पास दिला. चेतनने मध्य प्रदेशच्या बचावपटूंना हुलकावणी देत ज्योकिमकडे चेंडू सोपविला. परंतु, जास्त जोर लावल्याने त्याचा फटका दिशाहीन ठरला. मध्यंतरापर्यंत गोवा संघ ३-० असा आघाडीवर होता. दुसर्‍या सत्रात गोव्याने अनेक संधी वाया घालविल्या. सॅम्युअल कॉस्ताने उजव्या पायाने जोरदार फटका लगावून गोव्याचा चौथा गोल लगावला.

बचावफळीतील गोंधळामुळे मध्य प्रदेशच्या साहील रजक याला गोल नोंदविता आला. यानंतर गोव्याचा कर्णधार ज्योकिमने (५५वे मिनिट) सामन्यातील आपला पहिला गोल केला. देवेंद्र -ज्योकिम यांनी मध्य प्रदेशच्या विस्कळित बचावफळीचा ठिकर्‍या उडवताना प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याचवेळी ज्योकिमने गोलजाळीचा वेध घेतला. ज्योकिमने लगावलेला फटका गोलरक्षकाच्या हाताला चाटून गोलजाळीत गेला. ऍरोन सिल्वा याला अवैधरित्या पाडल्यामुळे गोव्याला पेनल्टी लाभली. या पेनल्टीवर ऍरोनने (८०वे मिनिट) संघाचा सहावा व स्वतःचा पहिला गोल केला. यानंतर काही मिनिटांतच ऍरोनने (८५वे मिनिट) देवेंद्रच्या पासवर गोव्याचा सातवा गोल लगावला.

दादरा नगर हवेली विजयी
पहिल्या सत्रात गोलशून्य राहिल्यानंतर दादरा व नगर हवेलीने राजस्थानचा ४-० असा पराभव केला. जयेश कुमार, गजेंद्र मीना, त्रिलोक सिंग व संजय लांबा यांनी विजयी संघाकडून गोल केले.