‘गोवा मुक्त होऊनही पारतंत्र्यात राहिलो…’

0
244

स्वातंत्र्यसेनानी स्व. श्री. मोहन रानडे यांनी २०१४ साली गोवा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला नवप्रभा कार्यालयाला सदीच्छा भेट दिली होती. तेव्हा गोवा मुक्तीनंतर पोर्तुगीज राजकीयदृष्ट्या योग्य वागले, परंतु भारत सरकारला आपल्या माणसांची सुटका करता आली नाही… अशी खंत त्यावेळी श्री. रानडे यांनी व्यक्त केली होती.

‘‘जेव्हा एखादा जेता युद्ध जिंकतो, तेव्हा पराभूत सैन्याला अटी घालतो आणि त्यांची पूर्तता करून घेत असतो. त्यामुळे जेव्हा भारतीय सैन्याने गोवा मुक्त केला, तेव्हा भारत सरकारला पोर्तुगिजांना अटी घालून माझी सहज मुक्तता करता आली असती, पण तसे घडले नाही. वास्तविक पोर्तुगिजांच्या पाच सहा बोटी भारतीय सैन्याच्या ताब्यात आल्या होत्या. पोर्तुगीज सैनिक राजबंदी बनले होते. पण मे १९६२ मध्ये त्यांची भारत सरकारने सुटका केल्याने ते पोर्तुगालला परतले, तरीही माझी सुटका मात्र झालीच नाही’’, अशी खंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री मोहन रानडे यांनी ‘नवप्रभा’पाशी व्यक्त केली होती.

श्री. रानडे यांनी २०१४ साली गोवा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला नवप्रभा कार्यालयाला सदीच्छा भेट दिली होती, तेव्हा ‘नवप्रभा’च्या संपादकीय सहकार्‍यांशी केलेल्या अनौपचारिक वार्तालापात ते बोलत होते. गोवा मुक्तीनंतर पोर्तुगीज राजकीयदृष्ट्या योग्य वागले, परंतु भारत सरकारला आपल्या माणसांची सुटका करता आली नाही अशी खंत यावेळी श्री. रानडे यांनी व्यक्त केली. तेल्यू मास्कारेन्हस यांचा दाखलाही त्यांनी यासंदर्भात दिला. त्यांना २४ वर्षांची शिक्षा फर्मावली गेली, पण भारत सरकारने वकीलही पुरवला नव्हता, असे श्री. रानडे यांनी सांगितले.

श्री. रानडे यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत –
परतलो तेव्हा सगळेच बदललेले
चौदा वर्षे पोर्तुगिजांची कैद भोगून नागरी प्रयत्नांमुळे सुटका होऊन गोव्यात परत आलो तेव्हा येथे सारेच बदलून गेले होते. येथे शिक्षणाच्या सोयी झाल्या होत्या. शाळांच्या पक्क्या इमारती उभ्या राहिल्या होत्या. पोर्तुगिजांच्या राजवटीत खाली मान घालून चालणारी माणसे आता ताठ मानेने चालू लागली होती. उच्च शिक्षणाच्या सोयी झाल्या होत्या. नव्या नोकर्‍या उपलब्ध झाल्या होत्या. खाणी जोरात सुरू झाल्या होत्या. श्रमाचे काम करण्यासाठी परप्रांतीय येऊ लागले होते. दीर्घकाळ पोर्तुगालमध्ये तुरुंगवासात काढल्याने मी गोव्यात परत आलो तेव्हा पोर्तुगीजच बोलायला लागलो होतो. पोर्तुगिजांना हातवारे करून बोलायची सवय असते. त्यांच्या सहवासात राहून मलाही हातवारे करून बोलायची सवय जडली होती. नऊ वर्षे मी पोर्तुगालमध्ये जणू पोर्तुगीज भाषेत जगलो. मला तेव्हा स्वप्नेही पोर्तुगीज भाषेत पडायची!

बेतीच्या चौकीवरचा हल्ला
बेतीच्या पोलीस चौकीवरील हल्ल्यासाठी मला ही दीर्घ कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षा २६ वर्षांसाठीची होती. मी ती माझी सुटका होईस्तोवर म्हणजे १४ वर्षे भोगली. आमच्या आझाद गोमंतक दलाच्या स्वातंत्र्यसैनिकांना पोर्तुगिजांविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे हवी होती. त्यामुळे पोर्तुगिजांवर हल्ले चढवून त्यांचीच शस्त्रे लुटू असा विचार आम्ही केला होता. आधी दूरदूरच्या पोर्तुगिज चौक्यांना आम्ही लक्ष्य केले. बाणस्तारी, कळंगुट अशा ठिकाणच्या चौक्यांवर हल्ला चढवून तेथील शस्त्रे आम्ही लुटली. मग आम्ही ठरवले की आता काहीतरी मोठे काम केले पाहिजे. म्हणून आम्ही बेतीच्या चौकीवर हल्ला चढवायचे ठरवले. बेती हा तेव्हा गजबजलेला भाग होता. मांडवीवर पूल नव्हते. त्यामुळे बेतीमध्ये रहदारी प्रचंड असायची. अशा रहदारीच्या ठिकाणच्या चौकीवर स्वातंत्र्यसैनिक हल्ला चढवतील अशी पोर्तुगिजांना सुतराम शक्यता वाटत नव्हती. त्यामुळे त्यांनी तेथे पहारा वाढवला नव्हता. काटेरी कुंपण वगैरे घातलेले नव्हते. एके संध्याकाळी आम्ही अचानक तो हल्ला चढवला.

उजेड असताना हल्ला केला. आत चौकीत पाच पोलीस होते. त्यांना घाबरवण्यासाठी मी आधी हवेत गोळीबार केला. पहारेकर्‍याला लाथ मारली. आता शस्त्रे लुटण्यासाठी आत जाणे आवश्यक होते. मी आत गेलो. मला वाटले होते की माझे सहकारी त्या बाहेरच्या सैनिकाचा ताबा घेतील. पण तसे घडले नाही. त्याने झाडलेली गोळी माझ्या हाताला आणि फुफ्फुसाला लागली. रक्तस्राव सुरू झाला. त्याला ठार मारण्यात आले. शस्त्रास्त्रे घेऊन आम्ही बाहेर पडलो. पण रक्तस्रावामुळे मला चालता येईना. वीस – पंचवीस फुटांवर मी कोसळलो. माझ्या सहकार्‍यांना मला घेऊन पुढे जाणे शक्य नव्हते. कारण त्यांच्याकडे आधीच हत्यारांचे ओझे होते. माझे ओझे न्यायचे की शस्त्रांचे ओझे असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला. त्यांना मी सांगितले की माझे मी बघतो, तुम्ही निघून जा. त्यांनी पोंबुर्प्याच्या जंगलात आमचा तेव्हा तळ होता, तेथे पळ काढला. दरम्यान म्हापशाहून पोर्तुगिज पोलिसांची कुमक आली. फौजदार आला. त्याने मी जिवंत आहे की मेलोय हे पाहायला बायोनेट खुपसले. नंतर मला रायबंदरला इस्पितळात नेऊन गोळी काढली. मी तीन चार दिवस अत्यवस्थ स्थितीत होतो.

एकांतवासाचे दिवस
दुसर्‍या दिवशी मला जाग आली तर माझ्या पायात बेडी होती. ती खाटेला जखडलेली होती. वॉर्ड रिकामा केला गेला होता. पोर्तुगिज सैनिक पहार्‍यावर ठेवण्यात आले होते. दहा दिवसांनंतर माझे टाके काढले गेले. खुर्चीवरून मला न्यावे असे तेथील डॉक्टरांनी मोंतेरोला सांगितले, पण त्याने त्याला नकार दिला. मला चालत नेऊन कोठडीत डांबण्यात आले. तीन वर्षे त्या कोठडीत आणि नंतर दोन वर्षे दुसर्‍या कोठडीत अशी पाच वर्षे मी गोव्यात काढली. हा पूर्ण एकांतवास होता. मला कोणाशीही बोलू दिले जात नव्हते आणि कोणी माझ्याशी बोलत नव्हते. या काळात मी स्फूर्तीदायक कविता मोठमोठ्याने म्हणायची सवय स्वतःला लावून घेतली. कुसुमाग्रजांची गर्जा जयजयकार, सावरकरांच्या कविता, कवी यशवंतांची कविता अशा कविता मी म्हणत असे. पहार्‍यावरील कृष्णवर्णीय सैनिकाला वाटले की मी कोणाशी तरी बोलत आहे. त्याने विचारले की कोणाशी बोलतो आहेस? तेव्हा माझ्या लक्षात आले की मी माझ्याशीच बोलतो आहे. बोललो नाही तर मी वेडा होईन. एका जागी राहून माझे हात – पाय गोठतील अशी मला सतत भीती वाटे. त्यामुळे मी कोठडीतल्या कोठडीत सतत येरझार्‍या मारायचो. वाघ – सिंह पिंजर्‍यात असतात तेही असेच फिरत असतात. पण माझ्या पायांत बेड्या असायच्या. मी सबंध दिवसच्या दिवस चालायचो. चालताना मी किती मैल चाललो असेन याचा अंदाज बांधायचो.

पोर्तुगालला रवानगी
मग एक दिवस २२ ऑगस्ट १९६० रोजी मला पोर्तुगालच्या तुरुंगात पाठवले गेले. २३ ऑगस्टला त्यावर्षी चतुर्थी होती. आम्हा कैद्यांना आहार देण्याचे कंत्राट ज्याच्याकडे होते, त्याला कैद्यांविषयी ममत्व वाटे. तो दरवर्षी चतुर्थीला आम्हाला शिरा द्यायचा. त्या शिर्‍याची आम्ही वर्षभर वाट पाहायचो. २३ च्या पहाटे चार वाजता मला मारबडव करून उठवण्यात आले. न्हाणीघरात जायला सांगण्यात आले. एक पेटारा आणून ठेवलेला होता. पाच सहा पोलीस होते. बेड्या होत्या. माझे सामान त्या पेटार्‍यात आणून टाकले गेले. कुठे नेत आहेत हे मला सांगितले गेले नव्हते. पण गाडी रायबंदरकडे जाण्याऐवजी वास्कोच्या दिशेने निघाली, तेव्हा माझ्या लक्षात आले की गोव्याबाहेर नेण्यात येत आहे, कारण मोंतेरो मला सतत धमकवायचा की तुला आफ्रिकेला पाठवू. तिथे काम करायला लावू.
एका मालवाहू बोटीतून मला पोर्तुगालकडे नेण्यात आले. त्या बोटीवरही माझ्यासाठी पत्र्याची कोठडी करण्यात आली होती. ४३ दिवसांचा प्रवास करून पाच ऑक्टोबर १९६० रोजी मला पोर्तुगालच्या किनार्‍यावर उतरवले गेले. तेथेही ‘स्वागता’ साठी पोर्तुगीज पोलीस होते. माझी अक्षरशः धिंड काढली गेली. दुसर्‍या दिवशी लिस्बनला नेण्यात आले.

गोवा मुक्तीचा तो क्षण
त्या कारागृहात असतानाच एक दिवस गोवा मुक्तीचा तो ऐतिहासिक क्षण आला. पण मला त्याची काहीही कल्पना नव्हती. तो माझ्या केस कापणीचा दिवस होता. मला केस कापायला न्हाव्याकडे नेण्यात आले. मी त्याला नेहमीप्रमाणे ‘बॉं दिय’ म्हणून अभिवादन केले, तर त्याने प्रतिसादच दिला नाही. एक शब्द न बोलता त्याने केस कापले. एरवी तो माझ्याशी गप्पा मारत माझ्याकडून काही माहिती मिळते का हे पाहात असे. त्यामुळे हे त्याचे वागणे मला वेगळे वाटले. पण तीन दिवसांनंतर म्हणजे २१ तारखेला तिथल्या वर्तमानपत्रात गोवा मुक्तीची बातमी आम्हाला समजली. सात कैद्यांसाठीच्या कोठडीत पंधरा पंधरा कैदी कोंबलेले असायचे. वर्तमानपत्रात बातमी वाचल्यावर त्यांनी मला मिठ्या मारून माझे अभिनंदन वगैरे केले. गोवा मुक्ती हा पोर्तुगिज सैन्याला मोठा हादरा होता. १८३२ च्या वसईच्या लढाईनंतर पोर्तुगीज सैन्याला हरणे माहीतच नव्हते. आपली सेना अजिंक्य आहे असेच ते मानायचे. पाशवी बळावर आपली सत्ता सदैव टिकेल असे त्यांना वाटे. त्या समजुतीला भारतीय सैन्याच्या कामगिरीने मोठा हादरा बसला. गोवा मुक्तीचा जसा मला आनंद झाला तसाच माझ्यासोबत असलेल्या आफ्रिकी देशांतील कैद्यांनाही झाला. आपल्यालाही लवकरच लोकशाही हक्क मिळतील, आपण मुक्त होऊ अशी आशा त्यांना वाटली. गोवा मुक्तीची ती बातमी आम्ही सिगारेट ओढून साजरी केली कारण आमच्यापाशी तेव्हा तेवढेच होते. सोळा कैद्यांजवळ चार सिगारेटी मिळाल्या. त्याचे झुरके घेत आम्ही गोवा मुक्तीचा आनंद साजरा केला!