गोवा बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द

0
137

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

राज्यातील गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल रात्री उशिरा जाहीर केला. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने परीक्षा होणार की नाही, याविषयी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या मनात सुरू असलेली धाकधूक संपली. बारावीची परीक्षा रद्द केली असली, तरी निकाल योग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार जाहीर केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी भरपूर चर्चा केल्यानंतर बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. तसेच, बारावीच्या परीक्षेच्या निर्णयाबाबत पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यातील गोंधळाचे वातावरण दूर करण्यासाठी हा निर्णय लवकर जाहीर करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे. बारावीच्या परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, ज्येष्ठ शिक्षक व इतरांशी विचारविनिमय केला करण्यात आला, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

बैठकीत अधिकार्‍यांशी चर्चा
केंद्र सरकारने मंगळवारी सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे गोवा सरकारकडून बारावीच्या परीक्षेबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बुधवारी सकाळी गोवा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेवर विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी गोवा बोर्डाचे अध्यक्ष, शिक्षण खात्याचे अधिकारी, उच्च शिक्षण खात्याचे अधिकारी, तांत्रिक शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांशी मुख्यमंत्र्यांनी विविध पर्यायांवर चर्चा केली.

दोन पर्यायांवर विचारविनिमय
राज्य सरकारसमोर सुरुवातीला बारावीची परीक्षेबाबत काही पर्याय विचाराधीन होते. बारावीच्या परीक्षेसाठी दोन पर्यायांवर विचारविनिमय सुरू होता. त्यात बारावीची परीक्षा रद्द करणे किंवा जे विद्यार्थी बारावीची परीक्षा देऊ इच्छितात, त्यांना परीक्षेची संधी देणे आणि परीक्षेला न बसणार्‍या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारावर तयार करणे, अशा पर्यायावर विचार केला जात होता.

हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बुधवारी सकाळी घेतलेल्या खास बैठकीत देशातील इतर राज्यांनी बारावीच्या परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. राज्यातील सुमारे १९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार येऊन पोहोचले.

दिगंबर कामत यांच्याकडून स्वागत
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देऊन बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी स्वागत केले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शैक्षणिक वार्षिक कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी कामत यांनी केली आहे.

दिगंबर कामत यांच्याकडून स्वागत
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देऊन बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी स्वागत केले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शैक्षणिक वार्षिक कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी कामत यांनी केली आहे.

दहावीच्या धर्तीवर बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर निकाल जाहीर करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याच धर्तीवर लवरकच बारावी परीक्षेच्या निकालासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणातील बारावीच्या परीक्षा रद्द
नवी दिल्ली : देशभरातील सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता अनेक राज्यांनी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि हरियाणातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तेथील सरकारांनी घेतला. देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बारावी परीक्षेसंदर्भातील निर्णय राज्य सरकार येत्या एक-दोन दिवसात जाहीर करणार आहे.