गोमेकॉत केवळ प्रवासासाठी कोविड चाचणी नाही ः राणे

0
95

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि आरोग्य संचालनालयाला केवळ प्रवासासाठीची कोविड चाचणी न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

सरकारी यंत्रणा नागरिकांनी सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यरत आहे. गोवा सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोमेकॉ आणि आरोग्य खात्याकडून आरटी पीसीआर चाचणी केली जात आहे. गोव्यातून मुंबईत जाणार्‍यांनी आरटी-पीसीआर चाचणी दाखल्यासाठी खासगी प्रयोगशाळेतून चाचणी करून घ्यावी. प्रवासासाठी आवश्यक कोविड नकारात्मक दाखल्यासाठी सरकारी साधनसुविधेवर स्वॅब तपासणीचा अतिरिक्त ताण टाकू नये, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर विमान, रेल्वे प्रवाशांना कोविड चाचणी दाखल्याची सक्ती केली आहे. गोव्यातून अनेकजण मुंबईला जातात. राज्यात अनेकांनी कोविड नकारात्मक दाखल्यासाठी बांबोळी व इतर सरकारी इस्पितळात स्वॅब तपासणीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी इस्पितळात राज्यातील कोरोना रुग्ण निदानासाठी कोविड स्वॅबची चाचणी केली जात आहे. आता केवळ नकारात्मक दाखल्यासाठी कोविड तपासणी करणार्‍याची अनेकांनी गर्दी केल्याने कोविड प्रयोगशाळेवर अतिरिक्त ताण वाढण्याची शक्यता आहे.
ज्यांना मुंबईला जायचे आहे त्यांनी खासगी प्रयोगशाळेमधून आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी असे मंत्री राणे यांनी सांगितले.