गोमेकॉतील नोकर भरतीचे अर्ज ऑनलाईन मिळणार ः आरोग्यमंत्री

0
110

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नोकर भरतीसाठीचे अर्ज ऑन लाइन उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

गोमेकॉत सुमारे २९०० विविध पदांची भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीचे अर्ज गोमेकॉतील डीन कार्यालयात उपलब्ध करण्यात आले होते. नोकर भरती अर्ज मिळविण्यासाठी डीनच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी होत होती. या अर्जासाठी ५० रुपये शुल्क आकारले जात आहे. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या युवा वर्गाला रांगेत राहून अर्ज घ्यावे लागत होते. त्यामुळे गोमेकॉतील नोकर भरतीचे अर्ज ऑन लाइन पद्धतीने उपलब्ध करण्याची मागणी केली जात होती. ज्यांनी शुल्काचा भरणा करून अर्ज घेतले आहेत. त्यांना अर्जासाठी घेतलेल्या शुल्क परत दिले जाईल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

गोमेकॉतील नोकर भरतीचे अर्ज मिळविण्यासाठी युवा वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे आढळून आल्याने नोकर भरतीसंबंधीचे अर्ज ऑन लाइन पद्धतीने उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
नोकर भरतीच्या पदासाठी इच्छुक असलेल्या युवकांनी मंगळवारपासून ऑन लाइन पद्धतीने नोकरीचा अर्ज डाऊनलोड करावा. या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. भरलेले अर्ज डीन कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत.