गोमेकॉतील ओपीडीत तपासणीसाठी पूर्वनोंदणी सक्तीची ः डॉ. बांदेकर

0
180

>> रुग्णांची गर्दी होत असल्याने निर्णय

महाविद्यालयातील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची गर्दी होत असल्याने ओपीडीमध्ये तपासणीसाठी पूर्वनोंदणी सक्तीची करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे डीन प्रा. डॉ. शिवानंद बांदेकर यांनी काल दिली.

मंगळवारपासून जीएमसीच्या सर्व विभागातील ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. ओपीडी सुरू करण्यात आल्याने रुग्णांची तपासणीसाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करण्यासाठी ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणार्‍यांना पूर्वनोंदणी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपासणीसाठी येणारे नागरिक दूरध्वनीच्या माध्यमातून (०८३२-२४९५३३१ किंवा २४९५३०१) ओपीडीसाठी पूर्वनोंदणी करू शकतात. ही नोंदणीची सुविधा चोवीस तास उपलब्ध करण्यात आली आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

इस्पितळाच्या नोंदणी कक्षातून रुग्ण आपले ओपीडी तपासणीचे टोकन तपासणीच्या दिवशी घेऊ शकतात. तापाच्या रुग्णासाठी ओपीडी क्र. ३० सुरू करण्यात आली आहे. इस्पितळामध्ये येणार्‍या रुग्ण व नागरिकांना मास्कची सक्ती आणि सामाजिक अंतर राखण्याची सूचना करण्यात येत आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.