- सचिन मदगे
पोर्तुगिजांना नाईलाजाने आपल्या धर्माच्या आवडत्या धोरणास लगाम घालावा लागला. यासाठीचा पाया गोव्यात पहिल्यांदा घातला तो शिवाजी महाराजांनी. त्यासाठी गोव्याच्या भूमीत शिवरायांची शिवजयंती मोठ्या दिमाखात आणि थाटात साजरी झालीच पाहिजे.
पोर्तुगिजांनी सन १७६३ आणि १७८५ च्या दरम्यान सौंधेकर, पेशवे आणि सावंतवाडकरांकडून आजच्या गोव्यातील बारा तालुक्यांपैकी आठ तालुके- पेडणे, डिचोली, सत्तरी, धारबांदोडा, फोंडा, सांगे, केपे आणि काणकोण- ताब्यात घेऊन आजच्या गोवा राज्याचा नकाशा पूर्ण बनविला. वरील तालुक्यांना गोव्यात नवी काबिजाद असे पोर्तुगीज काळात म्हटले जाई. पोर्तुगिजांनी नवी काबिजाद ताब्यात घेताना सौंधेकर, पेशवे आणि सावंतवाडकरांकडे साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून हा प्रदेश जिंकून घेतला.
हा प्रदेश जिंकताना पोर्तुगिजांनी एक नवलाईची गोष्ट केली, ती म्हणजे, नव्या काबिजादीत एक जाहीरनामा मराठीतून काढून त्याचे जाहीरपणे प्रत्येक गावात वाचन दवंडी पिटवून केले. त्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, ‘पोर्तुगीज सरकार नव्या काबिजादीतील हिंदू लोकांच्या धर्माला आणि देवाला अजिबात उपद्रव करणार नाही.’ हा जाहीरनामा त्या काळात खरंच फार नवलाईच्या गोष्टीसारखा होता. ज्या पोर्तुगिजांनी सन १५१० आणि १५४३ या काळात तिसवाडी आणि बार्देश, सासष्टी आदिलशहाकडून जिंकून घेतली, त्या भागाला ‘जुनी काबिजाद’ असे म्हटले जाई. या भागांवर पोर्तुगिजांनी आपल्या धर्मांध वृत्तीचा हैदोस घालत येथील हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचा विद्ध्वंस केला. जुन्या काबिजादीत सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात एकही भारतीय संस्कृतीची खूण शिल्लक ठेवली नव्हती. जबरदस्तीने गावेच्या गावे धर्मांतरित करून टाकली. मंदिर फोडून त्यांतील मूर्तींची विटंबना केली. जे कोणी हिंदू जबरदस्तीने राहिले होते, त्यांच्यावर अनेक जाचक बंधने लादली होती. त्यामुळे अनेक गोवेकर आपली घरदारे, जमीन, संपत्तीचा त्याग करून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळात… जिकडे आश्रय मिळेल तिकडे निर्वासिताचे जिणे जगण्यास निघून गेले. अशा पोर्तुगिजांना अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र नव्या काबिजादीतील एकाही हिंदूला बाटविणार नाही किंवा मंदिरांना हात लावणार नाही असे येथील जनतेला जाहीर आश्वासन द्यावे लागले. पोर्तुगिजांचे धार्मिक धोरण जुन्या काबिजादीत मात्र पूर्वीसारखेच कडक होते. धर्मसमीक्षा न्यायालय, पाद्रीबुवांचा सरकारी कामकाजातील जबरदस्त पगडा, जसेच्या तसेच होते. तरीही नव्या काबिजादीत मात्र त्यांना स्वतःच्या आवडत्या, लाडक्या धार्मिक धोरणाला मुरड का घालावी लागली याचा शोध घेता त्याच्या उत्तराचे मूळ जाते ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावापाशी!
सोळावे शतक पोर्तुगिजांच्या सत्तेचा सुवर्णकाळ होता. शूर, धाडसी, दर्यावर्दींच्या जोरावर जगाच्या समुद्रावर पोर्तुगिजांनी वर्चस्व मिळविले. संपूर्ण जगाच्या समुद्रसत्तेचे पोर्तुगीज स्वतःला बादशहा समजत. या शूर, धाडसी दर्यावर्दींच्या पराक्रमाला खूळ लागले ते कडवट, धर्मनिष्ठ सत्तेचे. रोमन कॅथलिक पंथाचे कट्टर अनुयायी असलेल्या पोर्तुगीज राजाची, रोमन कॅथलिकांचे सर्वोच्च धर्मगुरू पोपवर अत्यंत प्रामाणिक निष्ठा. पोप जे काही फतवे काढतील ते पोर्तुगाल आणि स्पेनच्या राजाला शिरसावंद्य असत. त्यातूनच जर राजा रोमन कॅथलिक असेल तर सर्व प्रजाही रोमन कॅथलिकच असावी असा दंडक पोप महाशयांनी बनविला. त्यानुसार पोर्तुगीज राजा हा कॅथलिक रोमन असल्यामुळे पोर्तुगीज राजांची जगात जिकडे कुठे सत्ता असेल तिथली प्रजाही रोमन कॅथलिकच असावी; इतर सर्व धर्म एकतर पाखंडी किंवा सैतानी आहेत असे मानून त्यांना प्रजा म्हणून कोणतेही अधिकार देण्यात येत नसत. पोपचा आदेश शिरसावंद्य मानून पोर्तुगिजांनी जुन्या काबिजादीवर आपला धार्मिक अत्याचाराचा वरवंटा फिरवत येथील भारतीय संस्कृती चिरडून टाकली.
गोव्यातील हिंदूंना आता कोणी वाली नव्हता. जे काही लोक आपला धर्म वाचवून राहिले होते त्यांच्यावर जाचक बंधने होती. अशा जुलूम-अत्याचाराच्या एका शतकाच्या अंधार्या रात्रीचा काळ सोसत गोव्यातील जनतेने आपला काळ घालवला. भारतातील कोणत्याच राजकीय सत्तेला पोर्तुगिजांच्या धार्मिक जुलुमाविषयी सोयरसुतक नव्हते. पोर्तुगिजांना पहिला जाब धार्मिक आणि राजकीय कारणासाठी बार्देशवर आक्रमण करून विचारला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. बार्देशमधील शिक्षक हिंदूंना दोन महिन्यांच्या मुदतीत एकतर धर्मांतर तरी करा किंवा बार्देस सोडून पोर्तुगीज हद्दीबाहेर निर्वासित व्हा असा हुकूम पोर्तुगीज गव्हर्नर कोंद दी साव्हेसेंची यानी काढला होता. याशिवाय शिवाजी महाराजांच्या राज्यातील पेडणे, डिचोली, कुडाळ येथील मुजोर वतनदार पोर्तुगिजांच्या आश्रयाला राहून स्वराज्याची लुटालूट करत होते. या दोन्ही कारणांसाठी पोर्तुगिजांवर शिवाजी महाराजांनी बार्देशवर आक्रमण करत त्याची लूट केली. शिवाजी महाराजांच्या दहशतीला घाबरून पोर्तुगीज सैनिक लढाईला सुरुवात होताच कोलवाळ-थिवीच्या किल्ल्यातून पसार झाले. पण पोर्तुगिजांचे धर्मनिष्ठ आणि राजाहून राजनिष्ठ सैनिक म्हणजे पाद्रीबुवा मात्र बंदुकी घेऊन लढाईस उभे राहिले. हे पोर्तुगिजांचे पाद्री म्हणजे फिरंग्यांचे भट. हे उत्तम नेमबाज म्हणून मराठा सैनिकांमध्ये प्रसिद्ध होते. या चार फिरंगी भटांचा शिवाजी महाराजांनी समाचार घेत त्यांस स्वर्गलोकीचा रस्ता दाखवला. पोर्तुगिजांना धार्मिक आणि राजकीय कारणासाठी जाब विचारणारा पहिला भारतीय राजा इतिहासात दिसतो तो म्हणजे शिवाजीराजा.
बार्देस मोहिमेनंतर लगेच दुसर्या वर्षी नोव्हेंबर १६६८ मध्ये शिवाजी राजांनी गुप्तहेर सैनिकांमार्फत अचानक जुन्या गोव्यावर आक्रमण करून पोर्तुगिजांना कायमचे गोव्यातून हाकलून द्यायच्या मोहिमेची तयारी सुरू केली, परंतु काहीतरी गफलतीमुळे गोव्यात पोर्तुगीज राजधानीत शिरलेले शिवरायांचे मावळे पकडले गेले. वाटेत वेंगुर्ला येथे शिवरायांना आपली मोहीम फसल्याचे कळले. वेंगुर्ल्याहून महाराज तडक डिचोलीला आले. तेथे त्यांनी एका मोठ्या कार्यक्रमाची तयारी केली होती. तो कार्यक्रम होता सप्तकोटेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणाचा. गोव्याच्या कदंब राजाच्या कुलदैवताचे वैभवसंपन्न मंदिर दिवाडी बेटावर होते. पोर्तुगिजांनी आपल्या धर्मांध धोरणाचा पहिला घाव कदंब राजाच्या कुलदैवतावर घालत शिवलिंग उखडून विहिरीच्या काठावर ठेवून त्याची विटंबना चालवली होती. डिचोलीच्या नारायणराव सूर्यराव सरदेसाई यांनी रात्री गुपचूप दिवाडी बेटावर आपले सैनिक पाठवून शिवलिंग उचलून आणून डिचोली तालु्क्याच्या हद्दीत हिंदळे गावात नारळाच्या चुडताच्या झोपडीत स्थापन केलेे. कदंब राजाच्या कुलदैवताला, अर्थात गोव्याच्या राजदैवताला शिवरायांनी राजाश्रय देऊन मंदिराचे पुनर्निर्माण केले.
गोव्यात पोर्तुगिजांच्या सीमेशेजारी शिवाजी महाराजांची सत्ता झाल्यापासून पोर्तुगिजांची सर्व प्रकारची मक्तेदारी मोडून पडली. शिवाजी महाराजांनी सन १६५७ साली स्वतःचे नौदल सिंधुसागरात उभारून पोर्तुगिजांची समुद्रसत्तेवरील मत्तेदारीही मोडून टाकली. सन १६७५ मध्ये फोंड्यासह कारवार, अंकोलापर्यंत हिंदवी स्वराज्याची सीमा वाढली. सन १६७९ साली पोर्तुगिजांनी किल्ला बांधला. शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यात पोर्तुगिजांशी मोठा संघर्ष करत गोव्यातील पोर्तुगीज सत्तेचा माज आणि कणाच मोडून टाकला. संभाजी महाराजांच्या मोहिमेनंतर पोर्तुगिजांनी परत कधीही उघडपणे स्वराज्यावर आक्रमण केले नाही.
शाहू छत्रपतींच्या आज्ञेवरून चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगिजांना वसई भागात मोठ्या रक्तरंजित संघर्षाने उखडून टाकले. गोव्यातही पोर्तुगिजांना जबर तडाखा दिला. गोव्यात पोर्तुगिजांनी पेशव्यांचे सरदार नरगुंदकर भावे यांना बत्तीस हजार अर्सुफ्या लाच देऊन आपली इज्जत वाचवली. वसई मोहिमेनंतर मोहिमेच्या विजयासंदर्भात जी पत्रे उपलब्ध आहेत त्या सर्वांचा सूर एकच होता की हिंदू धर्म किंवा महाराष्ट्रधर्माच्या रक्षणासाठीच छत्रपती शाहूंच्या पुण्य प्रतापाने विजय मिळाला आहे. वसई मोहीम १७३९ मध्ये झाली. या मोहिमेनंतर पोर्तुगिजांची अवस्था अधिकच बिकट झाली. येथून पुढे गोव्यातील राज्य टिकवायचे असेल तर पूर्वीचे आपले धर्माचे धोरण आता चालू शकणार नाही याची खात्री पोर्तुगिजांना पटली. त्यामुळे पानीपतनंतर १७६३ मध्ये पोर्तुगिजांनी सावंतवाडकर, सौंधेकर, पेशवे यांच्यातील कमकुवतपणाचा फायदा घेत गोव्यातील आपल्या राज्याच्या सीमा वाढवल्या, पण तिथे आपले धर्मांध धोरण अजिबात राबवले नाही. पोर्तुगिजांनी नवी काबिजादी ताब्यात घेतल्यानंतर फोंडा महालातील कवळे देवस्थानाच्या जमिनीसंदर्भात अफरातफर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिल्लीहून महादजी शिंदे यांनी कवळे देवस्थानच्याबाबतीत पोर्तुगिजांना जाब विचारला. जीवबादादा केरकर, लखबादादा लाड, सदाशिव सुखटणकरांसारखे मातब्बर गोमंतकीय उत्तर हिंदुस्तानात महादजींच्या कारभारात होते. या सर्वांचा पोर्तुगिजांवर भारी दबाव होता. त्यामुळे पोर्तुगिजांना नाईलाजाने आपल्या धर्माच्या आवडत्या धोरणास लगाम घालावा लागला. यासाठीचा पाया गोव्यात पहिल्यांदा घातला तो शिवाजी महाराजांनी. त्यासाठी गोव्याच्या भूमीत शिवरायांची शिवजयंती मोठ्या दिमाखात आणि थाटात साजरी झालीच पाहिजे.