गोमंतकाशी समरस झालेले माधव गडकरी

0
104
माधव गडकरींचे संध्यापर्वात घेतलेले छायाचित्र (छायाः दादू मांद्रेकर)

– वामन प्रभू (ज्येष्ठ पत्रकार) ‘गोमन्तक’ची किंमत फक्त दहा पैसे होती, त्या काळात माधवराव गडकरी यांच्या ‘गोमन्तक’च्या टीममध्ये माझा प्रवेश झाला. राखीव खेळाडू वा प्रशिक्षणार्थी म्हणून खुद्द गडकरी यांनीच माझी निवड केली होती. दिवस आणि वर्ष सांगायचे झाल्यास २७ ऑक्टोबर १९६९. साडेचार दशकांचा काळ आता उलटला आहे. ज्यांनी मला पत्रकारितेच्या या अथांग दर्यात पोहायला शिकवले, त्या माधवराव गडकरी यांच्या आठवणींचा डोंगरच माझ्यापुढे शझ उभा आहे. पत्रकारितेच्या प्रवासात या आठवणी चघळतच मी काम करीत आलो आहे. पंचेचाळीस वर्षांचा हा प्रवास तसा थोडा-थोडका निश्‍चितच नाही. माधवराव गडकरींचा परीसस्पर्श ज्यांना झाला त्यांतील मी एक. गोमन्तकमध्ये माधवराव गडकरी यांच्या हाताखाली मी सात वर्षे पत्रकारिता केली आणि त्याच भक्कम पायावर आज मी उभा आहे. गडकरींच्या टीममध्ये मी दाखल झालो त्यावेळी गोमन्तकचे कार्यालय चिंचोळे येथेच होते. म्हटले तर तो अपघातच होता. अपघातानेच मी पत्रकार झालो. हे तर मी नाकारूही शकत नाही. केवळ नोकरी हेच लक्ष्य होते. एका खासगी आस्थापनातील २०० रुपये पगाराच्या नोकरीवर मालकाने चतुर्थीच्या वेळी पगार न दिल्याने मी पाणी सोडले होते आणि नव्या नोकरीच्या शोधात असताना ‘गोमन्तक’मध्ये तसाच अपघाताने पोहोचलो. नव्या नोकरीच्या शोधात असताना रायबंदरला आमच्या शेजारीच रहायला आलेले क्रांतीवीर मोहन रानडे यांनी माधवरावांकडेे माझ्यासाठी शब्द टाकला. मोहन रानडे यांची त्याच सुमारास पोर्तुगालच्या तुरुंगातून सुटका झाली होती आणि ते रायबंदरला आमच्या शेजारीच रहायला आल्याने ओळख झाली होती. रानडेकाकांनी सांगितल्याप्रमाणे माधवराव गडकरी यांच्या भेटीसाठी गेलो. २५ ऑक्टोबर १९६९ चा तो शनिवारचा दिवस मला अजून आठवतो. मी वीसेक वर्षांचा असेन. अंगकाठी बेताचीच. पत्रकारिता, पत्रकार या शब्दांशी तसा दुरान्वयेही संबंध आलेला नव्हता. एका खासगी आस्थापनात तीनेक वर्षे कारकुनी आकडेमोड एवढाच काय तो अनुभव पदरी होता. तत्कालीन वर्तमानपत्रे म्हणजे नवहिन्द टाइम्स, गोमन्तकची ओळख ही शेवटच्या पानापुरतीच मर्यादित होती. खेळाचे वृत्त न चुकता वाचायचो आणि त्याचाही फायदा मला उशिरा का होईना झाला. माधवराव गडकरी यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेलो तेव्हा साहजिकच प्रचंड दडपण होते. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे नोकरी ही महत्त्वाची होती. कारकून म्हणून गोमन्तकमध्ये चिकटवतील एवढी मर्यादित अपेक्षा बाळगूनच साहेबांच्या पुढे उभा राहिलो. प्रथमदर्शनीच थोडी भीतीही वाटली, पण माझी अंगकाठी पाहून, ‘अरे वारंवार आजारी वगैरे पडत नाहीस ना?’ या प्रश्नानेच साहेबांनी सुरुवात केली. माझे सुवाच्य हस्ताक्षर कामी आले आणि त्याच आधारावर माझी नोकरीही निश्चित झाली. सोमवारपासून कामावर रुजू होण्यास त्यांनी सांगितले. त्याचा झालेला आनंद शब्दांत सांगता येणार नाही. पगार ठरला रुपये दीडशे आणि गोमन्तक टीममध्ये मी सांगितल्याप्रमाणे सोमवारी दाखल झालो. आणखी बत्तीस दिवसांनी या गोष्टीला पंचेचाळीस वर्षें पूर्ण होतील. माधवराव गडकरी यांची त्यावेळी घेतलेली भेट आजही जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी राहते. ‘समाचार भारती’ या वृत्तसंस्थेच्या बातम्या सुवाच्य अक्षरात लिहून उपसंपादकांकडे पुढील सोपस्कारासाठी देणे ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. कंपोझिटरांना सुवाच्य अक्षरातील ‘कॉपी’ मिळणे त्याकाळी आवश्यक होते आणि ती तर माझी जमेची बाजू असल्याने त्याचा जसा फायदा मला झाला तसा काही प्रमाणात तोटाही झाला. सगळ्यांनाच माझ्या हस्ताक्षरातील कॉपी हवी होती. त्यातून मला शिकायला मिळाले ही गोष्ट वेगळी. गडकरींच्या टीममध्ये त्यावेळी सहसंपादक त्र्यं. कृ. तर्टे, राजा पुरोहित, सुधाकर गोडबोले, विजय सावंत, गजानन खेडेकर, मधुकर भोसले, हरिश्‍चंद्र नागवेकर अशी दिग्गज मंडळी होती. या दिग्गजांमध्ये मला हरवल्यासारखे वाटणे साहजिकच होते, पण गडकर्‍यांसह सगळ्यांचेच मार्गदर्शन, धीर, प्रोत्साहन मिळत गेल्याने पत्रकारितेचे धडे बर्‍यापैकी गिरवू शकलो. गोमन्तकमध्ये रुजू झाल्यानंतर पाच-सहा महिन्यातच सांतइनेज येथील सध्याच्या इमारतीत कार्यालयाचे स्थलांतर झाले. गडकरींच्या नेतृत्वाखाली अंकाच्या एकूण दर्जात बराच फरक पडू लागला. अत्याधुनिक ऑफसेट मशिनवर छपाई होऊ लागली. माधवराव गडकरी म्हणजे मूर्तीमंत उत्साह आणि तारुण्याची सळसळ, याचा प्रत्यय गोमन्तकच्या स्थलांतराच्या वेळी आला. गोमन्तकचा दर्जा मुंबईच्या लोकसत्ता – महाराष्ट्र टाइम्सप्रमाणे असावा यासाठी त्यांची खटपट होती आणि आम्हा सहकार्‍यांवर त्यांचा पूर्ण विश्‍वास. हे सर्वसामान्यांचे दैनिक व्हावे असे त्यांना वाटत होते आणि त्यासाठी प्रत्येकाचे योगदान त्यांना अपेक्षित होते आणि त्यातूनच आम्ही सारे घडत गेलो. आपले दैनिक सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोचावे हीच जिद्द बाळगून गडकरी कार्यरत होते. नव्या इमारतीत गोमन्तक दाखल झाल्यानंतर संपादकीय विभागातही बदल झाले. वामन राधाकृष्ण, शरद कारखानीस, श्रीकांत कासकर, प्रभाकर वसगडेकर, देविदास कर्पे, चंदू कासकर अशी काही नावे घेता येतील. माधवराव गडकरींना फक्त दैनिकच लोकप्रिय करायचे नव्हते तर गोमन्तकशी नाते जोडलेले सगळेच लोकप्रिय व्हावेत यावर त्यांचा कटाक्ष होता. छायाचित्रकार अंबाजी कामत यांना आजही बरेच जुने वाचक ‘छाया अंबाजी कामत’ या नावाने ओळखतात. आपल्या सहकार्‍याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी गडकरी कोणत्याही टोकाला जायला तयार असत. आणि त्याचा अनुभव आम्हा सहकार्‍यांना वेळोवेळी येत असे. माधवराव गडकरी यांचा कामाचा व्याप खूपच मोठा होता. झपाटल्यागत काम करताना इतरांकडूनही तशाच कामाची अपेक्षा ते करीत असत. आता त्यात वावगे असे काहीच नव्हते.
मध्यंतरी त्यांचा पी.ए. म्हणूनही काही काळ मी काम केले, पण ते काम मला मानवत नाही हे लक्षात येताच त्यांनी मला पुन्हा डेस्कवर आणले. माधवराव गडकरी यांचा पी.ए. म्हणून दोन-तीन महिने काम करताना त्यांचा अफाट लोकसंपर्कही कळून येत होता. आम्हा सहकार्‍यांचीही ओळख ते अभिमानाने करून देत असत.
क्रीडाविषयक बातम्यांना त्यावेळी अंकात स्थान मिळणे मुश्कीलच होते. चार पानी अंकात आजच्याप्रमाणे एक-दोन पाने क्रीडाविषयक बातम्यांसाठी देणे आवश्यक होते. पण शेवटच्या पानावर क्रीडाविषयक वृत्त असावे यावर त्यांचा कटाक्ष होता. महाराष्ट्र टाइम्समध्ये असतानाही गडकरी यांनी ‘स्पोर्टस् पेज’ला प्राधान्य दिले. माझ्या खेळाप्रती असलेल्या आवडीमुळे खेळाचे सदर सजवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. एवढेच नव्हे तर त्या काळात कसोटी क्रिकेट, ग्रां.प्री. बॅडमिंटन स्पर्धांच्या कव्हरेजसाठी मुंबई-पुण्याला त्यांच्यामुळेच मी जाऊ शकलो. माझ्यासारख्या अनेकांना गडकर्‍यांनी लिहिते केले. मुंबई-बंगलोरला खेळले जाणारे कसोटी क्रिकेट सामने वा अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे कव्हरेज करण्यास गडकर्‍यांनी मला कधीही नकार दिला नाही.
माधवराव गडकरी यांनी मुंबई सकाळच्या संपादकपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्याच दिवशी माझ्यासारख्या कनिष्ठ सहकार्‍याला खेळावरचा अग्रलेख लिहिण्याची संधी दिली. सोळा नोव्हेंबर १९७६ची ही गोष्ट. मुंबईत वानखेडे मैदानावर भारत-न्यूझीलंडमधील पहिला कसोटी क्रिकेट सामना ज्या दिवशी संपला, त्याच दिवशी माधवराव गडकरी मुंबई सकाळमध्ये रुजू झाले होते. वानखेडे स्टेडियमवर त्याच दिवशी भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयावर मुंबई सकाळमध्ये अग्रलेख असावा असे त्यांना वाटणे साहजिक होते आणि त्यांनी माझ्यावर ती जबाबदारी विश्‍वासाने सोपवली. आपल्या सहकार्‍यांवर पूर्ण विश्‍वास हीच त्यांची कामाची पद्धत होती आणि त्यातूनच त्यांनी पत्रकारांची फौज उभी केली.
माधवराव गडकरी यांनी गोव्याचा निरोप घेतल्यानंतरही आमचे संबंध जुळलेले होते. त्यांच्या शेवटच्या भेटीत गोमंतक मराठी अकादमीच्या कार्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेली खंत गोव्याशी असलेले त्यांचे ऋणानुबंध स्पष्ट करीत होती. गोमंतकीय जीवनाशी संपूर्णपणे समरस झालेले ते व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला वैचारिक बैठक माधवराव गडकरी यांनीच दिली. गोव्यात माधवराव हे गोवेकरांहून अधिक गोवेकर झालेले आम्ही सर्वांनी पाहिले. आपल्या कर्तृत्वाचे सर्वच श्रेय गोमंतकीय जनतेला ते देत असत. विचारासाठी झपाटणार्‍या या थोर पत्रकाराला प्रणाम!