गेल्या आठ दिवसांत २७७२ रुग्ण

0
163

>> चोवीस तासांत ५८२ कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू

राज्यात नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ सुरूच आहे. दरदिवशीच्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या सहाशेच्याजवळ जाऊन पोहोचली असून चोवीस तासांत नवे ५८२ बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच, काल आणखी दोन रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या ३३३१ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८४२ झाली आहे. राज्यात मागील आठ दिवसांत नव्या २७७२ रुग्णांची नोंद झाली असून १२ जणांचा बळी गेला आहे.

पणजी, मडगाव, पर्वरी, कांदोळी, फोंंडा, म्हापसा, वास्को, कुठ्ठाळी, शिवोली आदी भागात रूग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. मडगाव आणि पर्वरीतील सध्याच्या रुग्णांच्या संख्येने तीनशेचा आकडा पार केला आहे. मडगावात रुग्णसंख्या ३४८ तर पर्वरीतील रुग्णसंख्या ३२६ झाली आहे. पणजीतील रूग्णसंख्या तीनशेच्याजवळ येऊन ठेपली असून सध्याची रुग्णसंख्या २९१ एवढी आहे. फोंडा येथील रुग्णसंख्या २४२ आणि कांदोळीतील रुग्णसंख्या २४० एवढी आहे. म्हापसा येथे १७९ रुग्ण, वास्कोत १७० रुग्ण, कुठ्ठाळी येथे १६२ रुग्ण, शिवोली येथे ११६ रुग्ण आणि कासावली येथे १११ रुग्ण, खोर्ली येथे ११० रुग्ण आहेत.

बार्देश तालुक्यात ९७० रुग्ण
बार्देश तालुक्यात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. बार्देश तालुक्यात सर्वाधिक ९७० कोरोना रुग्ण आहेत. तर, तिसवाडी ४९२ रुग्ण, सासष्टीत ५५६ रुग्ण, मुरगाव ४४३ रुग्ण आहेत. राज्याच्या इतर भागातसुद्धा कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

एप्रिलमध्ये १२ बळी
एप्रिल महिन्याच्या आठ दिवसात आत्तापर्यंत १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये मागील चोवीस तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात म्हापसा येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्ण आणि आसगाव येथील ६३ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ८११ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आणखी १०७ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ५६ हजार ६३८ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१४ टक्के एवढे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २८६ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. चोवीस तासांत ३२०६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ८.७९ टक्के नमुने बाधित आढळून आले आहेत.
बरे होण्याचे प्रमाण घटले
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९३.१४ एवढी खाली आली आहे. मागील ७ मार्चला रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.३१ टक्के एवढी झाली होती. त्यावेळी नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होते. एप्रिलमध्ये रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारी घट तर नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
मेळाव्यांवर निर्बंध
उत्तर गोवा न्यायदंडाधिकार्‍यांनी सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि इतर प्रकारच्या मेळाव्यांवर निर्बंध लागू केले आहेत.
यासंबंधीचा आदेश काल जारी करण्यात आला. ज्या सभागृहाची क्षमता १०० असेल, त्यांना केवळ ५० टक्के किंवा ५० व्यक्तींना प्रवेश देता येईल. ज्या सभागृहाची क्षमता जास्त आहे. त्यांना जास्तीत जास्त १०० लोकांना प्रवेश देता येईल. खुल्या जागेतील मेळाव्यासाठी २०० लोकांची मर्यादा घालण्यात आली आहे.

देशभरात गुरूवारी १.१५ लाख बाधित
नवी दिल्ली ः आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल गुरूवारी चोवीस तासांत देशभरात १ लाख १५ हजार ७३६ इतके रुग्ण सापडले. त्यामुळे आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत दुसर्‍यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे. तसेच दिवसातील बळींची संख्या ६३० नोंदवली गेली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचा दरही घटला असून तो ९२.११ टक्के झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ झाली आहे. तसेच देशात आजवर कोरोनामुळे १ लाख ६६ हजार १७७ बळी गेले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ५६,३३०, तमिळनाडू १२,८०४, कर्नाटक १२,६९६, दिल्ली ११,११३, पश्चिाम बंगाल १०,३५५, उत्तर प्रदेश ८९२४, आंध्र प्रदेश ७२५१, पंजाब ७२१६ याप्रमाणे मृतांची संख्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लशीचा दुसरा डोस
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एम्स रुग्णालयात कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. पंतप्रधानांनी ट्विट करत ही माहिती दिली. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचे यावेळी मोदी म्हणाले. जर तुम्ही कोरोना लशीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या असे आवाहनही त्यांनी केले. मोदींनी यापूर्वी पहिला डोस १ मार्च रोजी घेतला होता. लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यावेळी मोदींनी पहिला डोस घेतला होता. त्यानंतर लसीकरणाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाली होती.

११ ते १४ एप्रिलपर्यंत राज्यात लस महोत्सव
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात येत्या रविवार दि. ११ ते बुधवार दि. १४ एप्रिलपर्यंत कोरोना लस महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले. या काळात कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून पंचायत स्तरावर ४५ वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांसाठी लसीकरणाची सोय करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी परीक्षांबाबतही फेरविचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.