गुजरातमध्ये तीन टन हेरॉईन जप्त, दोघांना अटक

0
29

गुजरातमधील मुंद्रा बंदरातून सुमारे तीन टन हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास १९ हजार कोटी रुपये आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमध्ये ठेवलेले हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले आहे. हे हेरॉईन अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच या कारवाईत दोन जणांना अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

एका कंटेनरमध्ये जवळपास २ हजार किलो हेरॉईन आणि दुसर्‍या कंटेनरमध्ये १ हजार किलो हेरॉईनची खेप अफगाणिस्तानातून आली होती. हे कंटेनर इराणमधील एका बंदरातून गुजरातला पाठवण्यात आले होते. माहिती मिळाल्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी येथे शोध मोहीम राबवण्यात आली. त्याच दरम्यान मुंद्रा बंदरावर हे हेरॉईन जप्त करण्यात आले. या हेरॉईनची किंमत १९,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या हेरॉईन तस्करीच्या प्रकरणात अफगाण नागरिक कथितपणे सहभागी असल्याचेही तपासात उघड झाले आहे.