गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

0
304
  • वैद्य स्वाती हे. अणवेकर
    म्हापसा

आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता स्वच्छ असा गोठा पुरवा व त्यांना चांगल्या ठिकाणी चरायला सोडा आणि त्यांच्या तब्येतीची नीट काळजी घ्या. हीच खरी गोसेवा होईल.

आजच्या लेखामध्ये आपण ए-२ जातीच्या गाई, त्यांचे स्वरूप तसेच भरपूर दूध देणार्‍या ए-२ गाई कोणत्या ते जाणून घेणार आहोत.
आपल्या आशियाई खंडातील बोस इंडिकस गाईना ए-२ जातीच्या गाई म्हणतात आणि त्यांच्यापासून मिळणारे दूध हे ए-२ दूध होय. थोडक्यात काय तर ह्या आपल्या भारतीय मूळच्या गाई व म्हशी दोन्ही ए-२ प्रकारात मोडतात. आपल्या भारतीय जातीच्या गाई ह्या प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि विदेशी ए-१ जातीच्या गाईंपेक्षा कमी दूध देतात. त्यात देखील ४-५ अशा जाती आहेत ज्या दुग्ध उत्पादनासाठी उपयुक्त आहेत, त्यांची नावे आपण इथे पाहूयात. इतर सर्व जाती ह्या फक्त शेतीसाठी उपयोगी ठरतात.
बरेचदा शेतकरी दुग्ध उत्पादनासाठी योग्य गाईंची निवड करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना दुधाचे उत्पादन कमी मिळते आणि ह्याचे खापर त्या बिचार्‍या गाईवर फोडले जाते. भारतीय जातीमधील खालील जाती ह्या दुग्ध उत्पादनासाठी उपयोगी आहेत.
१) साहिवाल :- ही प्रथम स्थानी असून ही दिवसाला १५-२० लीटर दूध देते. ऑस्ट्रेलीयन जिबू आणि ऑस्ट्रेलीयन साहिवाल ह्या दोन्ही ह्याच्या विकसित केलेल्या उच्च प्रतीच्या ए-२ जातीच्या संकरित गाई आहेत.
२) गीर ः- ही दिवसाला १२-१५ लीटर दूध देते.
आपल्या गीर गायीचा संकर ब्राझीलमधील जिबू सोबत करून त्यांनी ओंगल आणि ब्राह्मन नावाच्या श्रेष्ठ प्रजाती निर्माण केल्या आहेत.
३) लाल सिंधी – ही दिवसाला १२-१५ लीटर दूध देते. स्विस ब्राऊन, डॅनिश रेड, ऑस्ट्रेलियन सिंधी ह्या संकरित जाती आहेत.
४) राठी ः- हिचे दोन पोटभेद आहेत १) राठ – ही दुधासाठी वापरली जाते जी ६-८ लीटर दूध देते
२) राठी – हिचा उपयोग मेहनतीच्या कामासाठी केला जातो
हिच्या संकरित जाती १५-२० लीटर दूध देतात.
५) गंगातिरी – ही साधारणपणे ६-८ लीटर दूध देते तर ह्याच्या काही विकसित जाती १५-२० लीटर दूध देतात. ही जात आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
भारतीय गाईंची वैशिष्ट्ये :-
१) ह्या सक्रिय असतात
२) ह्यांच्यात रोगप्रतिरोधक व कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता उत्तम असते.
३) पाठीवरील वशिंड आणि गळ्याजवळ लोंबणारी त्वचा आणि सैल त्वचा ह्यामुळे त्वचेचे क्षेत्र अधिक असते. तसेच ह्याच्या त्वचेत घामाच्या ग्रंथी मोठ्या असतात व अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे गरम वातावरणात त्याच्या शरीरातून भरपूर घाम निघतो व शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते.
४) त्वचेतून निघणारा चिकट पदार्थ व ओली त्वचा व त्वचेवरील लहान लव हे कीटकांना त्वचेपासून लांब ठेवतात. काही जातींमध्ये त्वचेतून तेलीय पदार्थ निघतो जो त्यांचे पावसापासून संरक्षण करतो.
५) त्वचेवर प्रत्येक ठिकाणी असणार्‍या विशेष मासपेशींमुळे प्रत्येक ठिकाणी कंपन होते. त्यामुळे त्यांचे कीटक चावण्यापासून संरक्षण होते.
६) ह्यांची शेपटी लांब असते व शेपटीच्या मुळापासून ती हलते व सर्व शरीरभर पोहोचते.
७) मजबूत व जवळ असणारे खूर ह्यामुळे खुरामध्ये जखमा कमी होतात व हे ओबडधोबड व दगडधोंडे असणार्‍या रस्त्यातून सहज चालू व पळू शकतात.
८) भारतीय जातीच्या गाई समजूतदार असून त्या बुद्धिमान असतात. त्यामुळे त्या स्वच्छ जागेवरच बसतात.
९) त्यांच्या स्तनाचे अग्रभाग बंद असतात त्यामुळे स्तनांना सूज येणे व संसर्ग होणे ह्याचे प्रमाण अगदी नगण्य असते.
१०) ह्याचे गर्भाशयमुख बंद असते त्यामुळे त्यांना गर्भाशयात संक्रमण होत नाही.
११) थोडक्यात ह्यांना स्वास्थ्य समस्या कमी असतात व त्या असल्याच तर त्या स्थानीय वनस्पती औषधांनी बर्‍या होतात.
१२) ह्यांना कमी प्रमाणात व कमी गुणवत्ता असणारा आहार पुरतो जसे सुका किंवा हिरवा चारा आणि झाडांची पाने हा त्यांचा सामान्य आहार आहे.
१३) ह्यांच्या शरीरात अदृश्य स्वरूपात सूर्यकेतू नदी असते जी त्यांच्या वाशिन्डा पासून ते शेपटी जवळील हाडापर्यंत असते ज्यामुळे हिच्यामध्ये बरेच आजार बरे करण्याची अलौकिक क्षमता असते.
१४) तसेच हिला कामधेनू म्हणतात ते उगीच नाही, हिचे दूध, गोमूत्र आणि शेण ह्या सगळ्यांमध्ये औषधी गुणधर्म आढळून आले आहेत.
थोडक्यात काय तर आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. असे असतानादेखील हल्ली आपण पाहतो विशेषतः छोट्या शहरांत ह्याच गाईंची बरीच हेळसांड केली जाते. मुख्यतः आपल्याला बर्‍याच गाई, वासरे व बैल हे रस्त्यावर मधोमध घोळक्याने बसलेले दिसतात. हे दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला आढळून येते आणि आपण ह्या निष्पाप प्राण्यांना त्याबद्दल दोष देतो. खरे तर चूक त्यांचे पालन करणार्‍या त्यांच्या मालकाची असते जे त्यांना नीट गोठा पुरवत नाहीत. त्यामुळे त्यांना रस्त्यावर राहण्याची पाळी येते आणि त्याचा त्रास रस्त्यावरील रहदारीला होतो आणि ह्या मुक्या प्राण्यांनादेखील बरेचदा वाहन अपघातात आपले प्राण गमवावे लागतात.
तसेच त्यांना योग्य जागी चरायला न सोडल्याने ह्या गाई रस्त्यावरील कचरा कुंडीत असणारे प्लॅस्टिक व नासके अन्न खाऊन आपले पोट भरतात. मग अशा गाईंना पोटाचे विकार होऊन त्या आजारी पडतात. मग त्यांचे दूधतरी आपल्या आरोग्यासाठी उपयोगी कसे असेल. कारण गाईंची काळजी आपण घेतली तरच त्या आपल्याला चांगले दूध देतील व आपल्या आरोग्याची काळजी घेतील.
बरेचदा अशा गाईना विषबाधा होते. त्यांच्या खुरांना त्वचेवर, स्तनांना जखमा होतात. त्यांचे पोट बिघडल्याने त्यांचे शेणाचे स्वरूप देखील विकृत व दुर्गंधीत असे होते आणि असे आढळून आले आहे की बरेच गोपालक ह्याबद्दल अनभिज्ञ असतात व त्यामुळे बरेचदा त्या मुक्या प्राण्याला आपले प्राण देखील गमवावे लागतात.
म्हणून ह्या लेखामार्फत मी सर्व गोपालकांना व दुग्ध व्यावसायिकांना विनंती करते की आपल्या अमूल्य ठेवा असणार्‍या गाई ह्या बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता त्यांना स्वच्छ असा गोठा पुरवा व त्यांना चांगल्या ठिकाणी चरायला सोडा आणि त्याच्या तब्येतीची नीट काळजी घ्या. हीच खरी गोसेवा होईल.
(क्रमशः)