गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त पणजीत निसर्गोपचार शिबिर

0
119

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा (स्वायत्त) संस्था, प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त येत्या ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१९ दरम्यान पणजी येथे कला अकादमीच्या आवारात भव्य निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वास्थ्य अवलंबन ते स्वावलंबन या शीर्षकाखालील शिबिरात महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची शिकवण, प्राकृतिक तथा नैसर्गिक उपचारासंबंधी त्यांचा आग्रह या संबंधी प्रचार व प्रसार केला जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचे महासंचालक आर. एन. मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
यावेळी राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा (स्वायत्त) संस्था पुणे येथील संचालक डॉ. के. सत्य लक्ष्मी, पत्र सूचना कार्यालय, पणजीच्या एरर्मिलींदा डायस, प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणेचे सह संचालक संतोष अजमेरा यांची उपस्थिती होती.

या शिबिराचे उद्घाटन ३० सप्टेंबरला संध्याकाळी ४ वाजता राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात केंद्र सरकारने १०० दिवसांमध्ये घेतलेले जनकल्याणकारी निर्णय आणि महात्मा गांधी यांचा जीवनपट उलगडणारे बहुमाध्यमी आणि बहुआयामी चित्रप्रदर्शन आणि त्यांची प्राकृतिक चिकित्सा विषयी तळमळ यांचे उद्बोधन या प्रदर्शनाव्दारे गोवेकरांना निश्चितच होणार आहे, असेही मिश्रा यांनी सांगितले.

विविध स्पर्धांचे आयोजन
या निमित्ताने स्थानिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, तसेच बचत गट, अंगणवाडी, युवक व युवती व इतर नागरिकांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला, पाककृती, फळ व भाज्या कलाकृती, मानवी साखळी, सायकल फेरी इत्यादी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.

२५ कि. मी. सायकल फेरी
गांधीजींचे विचार आणि निसर्गोपचाराचा प्रचार करण्यासाठी सायकल फेरीचे आयोजन १ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आले आहे. यात ६० सायकल स्वार सहभागी होणार असून पणजी शहरात एकूण २५ किलोमीटर त्यांची फेरी होणार असून तसेच जनतेमध्ये निसर्गोपचार व शांततेचा संदेश देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
बदलत्या जीवन शैलीमुळे आजाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विविध आजारांवर निसर्गोपचाराच्या माध्यमातून उपचार केले जाऊ शकतात. लोकामध्ये निसर्गोपचाराबाबत जागृती नसल्याचे आढळून आले आहे. लोकांना निसर्गोपचाराकडे आकर्षित करण्यासाठी जागृती केली जात आहे, असे डॉ. सत्य लक्षी यांनी सांगितले.