गांजा लागवडीस मान्यता देण्याचा कोणताही निर्णय नाही ः मुख्यमंत्री

0
124

सरकारने गांजा लागवडीला मान्यता देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. एखाद्या प्रस्तावाची फाईल तयार करण्यात आली म्हणजे त्याला मान्यता दिली असा त्याचा अर्थ होत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. राज्यात गांजा लागवड करण्यास मान्यता देणारा कथित प्रस्ताव चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात गांजा लागवडीला मान्यता देणार्‍या एका प्रस्तावाची फाईल सरकारी पातळीवर फिरत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. गांजा लागवड करण्यास मान्यता देणार्‍या कथित प्रस्तावाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, राज्यात गांजा लागवड करण्यास मान्यता देणार्‍या प्रस्तावाची फाईल तयार केली म्हणजे गांजा लागवडीला मान्यता दिली असा अर्थ होत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नावर बोलताना काल दिले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून सरकारी पातळीवर गांजा लागवडीला मान्यता देणारी फाईल तयार करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा सरदेसाई यांनी केला.
गोवा राज्य हे विकृतीचे केंद्र तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सर्व विरोधकांनी एकजुटीने या विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. गांजा लागवडीवर कुणाचे नियंत्रण राहणार आहे का? असा प्रश्‍न सरदेसाई यांनी उपस्थित केला.