गरोदर स्त्रियांच्या थायरॉइडच्या समस्या!

0
358

– संकलन ः नीला भोजराज

थायरॉइडच्या आजाराबद्दल खूप समज आणि गैरसमज समाजात आहेत. थायरॉइड ग्रंथी तयार करीत असणार्‍या थायरॉक्सीन ह्या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्याने होणारे ‘गर्भावर परिणाम’ याची आम्हा स्त्रिरोगतज्ज्ञांना जास्त काळजी वाटते. म्हणून….

सुबुद्ध, सुदृढ नागरीक जन्माला यावे आणि ह्या भारतमातेचा सतत उत्कर्ष होत रहावा असे कार्य योगाच्या प्रचार-प्रसाराद्वारे तसेच आयुर्वेदाचा प्रचार करून शतकानुशतके संत करीत आहेत.

थायरॉइडचे मुख्य कार्य म्हणजे शरीरातील प्रत्येक पेशीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करणे. गरोदरपणातील थायरॉइडचा आजार माझ्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे. कारण मातेचे आरोग्य पोटात वाढणार्‍या गर्भाचा विकास ह्या दोन्हींवर थायरॉइडच्या आजाराचा परिणाम होतो. खूप वेळा त्रास न दिसल्याने, न समजल्याने आणि त्यामुळे योग्य औषधोपचार न केल्याने कमी बुद्ध्यांक असलेले बाळ जन्माला येते.
थायरॉइडच्या आजाराबद्दल खूप समज आणि गैरसमज समाजात आहेत. थायरॉइड ग्रंथी तयार करीत असणार्‍या थायरॉक्सीन ह्या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्याने होणारे ‘गर्भावर परिणाम’ याची आम्हा स्त्रिरोगतज्ज्ञांना जास्त काळजी वाटते. कारण…
* या आजाराचे प्रमाण जास्त आहे.
* तपासणी, उपचार आणि सामाजिक मानसिकता यात एकसूत्रीपणा नाही.
* फार काळजीचे कारण नाही असे लोकांना वाटते.
* थायरॉइडचे प्रमाण मोजण्याचा महत्त्वाचा आधार टीएसएच याची तपासणी आणि त्याचे किती प्रमाण गर्भारपणात असावे याची माहिती कित्येकांना नाही.
* ताबडतोब त्याचे वाईट परिणाम दिसत नाहीत त्यामुळे नंतर काय होणार? ह्याचा विचार बरेच जण करीत नाही.
* हायपर थायरॉइड म्हणजे थायरॉक्सीनचे प्रमाण जास्त होऊन त्याचे आईवर आणि गर्भावर होणारे परिणाम. ह्या आजाराचे प्रमाण कमी आहे.
* हायपोथायरॉइडीझम म्हणजे थायरॉइड ग्रंथीची थायरॉक्सीन तयार करण्याची क्षमता कमी होणे. या आजाराचे प्रमाण बरेच आहे.

आईवर होणारे परिणाम…

– लठ्ठपणा वाढणे
– गर्भधारणा न होणे
– वारंवार गर्भपात होणे
– कमी दिवसाचे बाळंतपण होणे
– रक्तदाब वाढून त्याचे परिणाम होणे

बाळावर होणारे परिणाम…

– बाळाच्या मेंदूची व्यवस्थित वाढ न होणे
– कमी दिवसाचे आणि कमी वजनाचे बाळ जन्माला येणे.
– जन्माला आल्यावर काविळीचे प्रमाण जास्त होणे.
– एकूणच कमी बुद्धयांक असलेले बाळ जन्माला येणे

आपण हे टाळू शकतो का?

* १००% हो!
त्यासाठी काय करायला हवे?
माझ्या मते सगळ्यांनी आपल्या घरातील मुलीची, सुनेची, बाळंतपणाची तयारी करण्याअगोदर सुदृढ गरोदरावस्थेची तयारी करावी. कारण सुदृढ माता सुदृढ बालकाला जन्म देते. बाळ हवं आहे तर याचं नियोजन करायला हवं. कारण हायपोथायरॉइडीझमचे प्रमाण मुलींमध्ये बरेच आढळून येते आणि जेव्हा गर्भवती तपासायला येतात तेव्हा गर्भ जवळजवळ दोन महिन्यांचा झाला असतो. जवळजवळ अडीच टक्के मुलींमध्ये हायपोथायरॉइडीझमचे प्रमाण आढळून आले आहे. याच्याचबरोबर थायरॉक्सीनचे प्रमाणही कमी आढळून येते, ५ ते ११ टक्केपर्यंत!
* थायरॉइड हार्मोन कमी होण्यामागे स्वतःचीच प्रतिकारशक्ती आपल्या या ग्रंथीच्या विरुद्ध काम करते, असेही काही स्त्रियांमध्ये आढळून येते. या सर्वांचा परिणाम मातेवर आणि बाळावर होतो.
* गरोदरपणातील पहिले तीन महिने गर्भासाठी फारच महत्त्वाचे असतात. ह्या पहिल्या बारा आठवड्यात गर्भ स्वतःचे थायरॉइड हार्मोन तयार करू शकत नाही. म्हणून हा गर्भ मातेच्या थायरॉइड ग्रंथीवर अवलंबून असतो. ह्या बारा आठवड्यात गर्भाचा विकास झपाट्याने होतो. प्रत्येक अवयव आणि विविध संस्था ह्या वेगवेगळ्या तयार होत असतात. ह्यालाच ऑरगॅनोजेनेसिस म्हणतात. मेंदूची ही वाढ ह्यावेळी जास्त होते. हे सर्व वरीलप्रमाणे सांगितल्यागत थायरॉइड हार्मोनमुळे होते.
पहिल्या तीन महिन्यात जर थायरॉइड ग्रंथीतून टी३ व टी४ या संप्रेरकांचा स्राव कमी झाला व त्यामुळे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन टीएसएच- वाढले असेल तर त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो. बारा ते चौदा आठवड्यानंतर बाळाची ग्रंथी कार्य सुरू करते तेव्हा तो स्वतःचे थायरॉइड हार्मोन तयार करू शकतो. आई तेव्हा दिसा.यला चांगली असते पण टीएसएच वाढलेले असते. या आजाराची ही एक सुप्त अवस्था असते. पण याचे वाईट परिणाम गर्भावर होऊ शकतात. आम्ही दरवेळेस सर्व डॉक्टर मंडळींनासुद्धा आमच्या चर्चासत्रात हायपोथायरॉइडीझमचा रुग्ण प्रारंभीच ओळखून लवकर उपचार करावा हे बिंबवीत असतो.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे गरोदर अवस्थेत तयार होणारी काही संप्रेरके जसे एचसीजी हेसुद्धा थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात मदत करते आणि ज्या स्त्रियांचा थायरॉइड रिझर्व कमी आहे अशा स्त्रियांमध्ये त्याचे परिणाम दिसून येतात.

उपचार ः

* हे सगळे जर टाळायचे असेल तर प्रत्येक गर्भवतीची टीएसएचची चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
* अखिल भारतीय स्त्रीरोग संघटनेने ठरवून दिल्याप्रमाणे प्रत्येक गर्भवतीने टीएसएच हे करूनच घ्यावे. अर्थात कारण समजवून सांगितले तर कोणीच याला नाही म्हणणार नाही.
* जर थायरॉइडचा आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.
* गरोदरपणात थायरॉक्सीनची मात्रा ही वाढते.
शेवटी आपण असेच गृहीत धरू की प्रत्येक स्त्रीने टीएसएच हे केलेच पाहिजे कारण हायपोथायरॉइडीझमचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे.
* गरोदर अवस्थेत पुष्कळदा हायपोथायरॉइडीझमचे प्रमाण एरवी नॉर्मल स्त्रियांमध्ये असते तसे दिसते पण ते अयोग्य असू शकते. सुप्त अवस्थेचा रोगाचा विचारही प्रत्येकाने करावा.
वंध्यत्व, गर्भपात, गर्भावस्थेत ब्लडप्रेशर वाढणे, गर्भावस्थेतील रक्तस्राव ह्या सर्व गोष्टी मातेच्या जिवाला धोका निर्माण करतात. हे सर्व आपण टाळू शकतो.
* कमी बुद्ध्यांकाचे बाळ जन्माला येऊ नये ह्याची काळजी आपण घेऊ शकतो.
* थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत करण्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ल्याबरोबरच काही आसने आणि मुद्रा करण्यासाठी मार्गदर्शन योग्य गुरुकडून घ्यावे.
* योग आणि योगजीवनशैली यामुळे विविध ग्रंथीचे कार्य आपण सुरळीत करू शकतो. याची प्रचिती घ्यावी.