गणेश चतुर्थीचा एसओपी लगोलग रद्द

0
37

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने काल गणेश चतुर्थी सणानिमित्त मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. मात्र जनतेमधून नाराजीचा सूर उमटल्याने सरकारने लगेचच हा एसओपी रद्द केला आहे. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीवरून हा एसओपी तयार करण्यात आला होता. मात्र जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर लगेचच सरकारने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. जारी केलेल्या एसओपीबाबत खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आपण असहमत असल्याचे म्हटले आहे.
सरकारने जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा सांगण्यासाठी पुरोहितांना (ब्राह्मण) घरी बोलावण्यावर बंदी घालण्यात आली होती. भाविकांना यू ट्यूब, फेसबूक आदी समाज माध्यमांचा वापर करून ऑनलाईन पद्धतीच्या पूजेचा अवलंब करण्याची सूचना केली होती. तसेच राज्यातील चित्रशाळांत गणेशमूर्ती आणण्यासाठी जाणार्‍या तसेच गणेश विसर्जनाच्यावेळीही भाविकांवर कित्येक निर्बंध घालण्यात आले होते. गणेश मूर्ती आणण्यासाठी केवळ दोन व्यक्तींना जाण्याची परवानगी होती. तर गणेश विसर्जनासाठीच्या वाहनांतून केवळ तीन जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली होती.
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कित्येक कडक निर्बंध घालण्यात आलेली ही आपली मार्गदर्शक तत्त्वे सरकारने लगेचच रद्द केली.
दरम्यान, सरकारने प्रथम जारी केलेल्या एसओपीमध्ये ज्या चित्रशाळांना शक्य आहे त्यांनी लोकांच्या घरी मूर्ती पाठवण्याची सोय करावी. बाजारात खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांचे दुकानदारांनी हात सॅनिटायझर करावेत तसेच त्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जावे. चित्रशाळांनीही तशी व्यवस्था करावी. सार्वजनिक गणेशोत्सवांना परवानगी देण्याची जबाबदारी स्थानिक पंचायती व नगरपालिकांनी घ्यावी. तसेच त्यांना कोविडसाठीच्या एसओपींचे पालन करण्याची अट घालावी, सजावट, देखावे आदींसाठी मर्यादा घालावी, तसेच त्यांना आरत्या, धार्मिक कार्यक्रम आदी ऑनलाईन पद्धतीने करण्याची अट घालावी, गर्दी असेल असे कार्यक्रम तसेच होर्डिंग्ज लावण्यावर बंदी घालावी. सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्यात यावा व त्याऐवजी रक्तदान शिबिरे व अन्य प्रकारचे आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजित केले जावेत. गृहविलगीकरणात असलेल्या लोकांनी चतुर्थीच्या काळात कुणाकडे जाऊ नये अथवा कुणालाही आपल्या घरी येऊ देऊ नये.
कंटेनमेंट झोनमधील लोकांना काय हवे काय नको याची जबाबदारी पंचांवर सोपवण्यात यावी. शक्य आहे त्या कुटुंबांनी आपल्या घराच्या परिसरात विसर्जन करावे. कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन यंदा प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातलेल्या अटींचे पालन करताना कमीत कमी फटाके लावावेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी असल्याने त्यापासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचा चतुर्थीच्यावेळी वापर करू नये. अशा नियमांचा समावेश होता.

मुख्यमंत्रीही असहमत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या एसओपीबाबत आपण व्यक्तिशः असहमत असल्याचे सांगितले. विशेष करून पुरोहितांना घरी येऊन पूजा सांगण्यास मनाई करण्यात आलेल्या मुद्द्यावर आपण सहमत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नवीन एसओपी सरकार जारी करणार नाही. परंतु नागरिकांनी कोविड महामारीचा प्रसार होऊ नये यासाठी या गणेशोत्सवाच्या काळात खबरदारी घ्यावी असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आहे.