गणेशोत्सवात ६५० मेगावॅट विजेची उपलब्धता ः सुदिन

0
14

राज्यात श्रीगणेश चतुर्थीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ६५० मेगावॅट वीज उपलब्ध केली जाणार आहे. नागरिकांनी जबाबदारीने विजेचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केले.

राज्यात चतुर्थीच्या काळात सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यावर भर दिला जात असून ६५० मेगावॅट वीज उपलब्ध केली जाणार आहे. बर्‍याच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विद्युत रोशणाई केली जाते. त्यामुळे वीज यंत्रणांवर ताण येऊन काहीवेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. नागरिकांनी जास्त प्रमाणात विद्युत रोशणाई करू नये, असे आवाहन वीजमंत्री ढवळीकर यांनी केले आहे.

वीजखात्याच्या सर्व विभागांना नादुरूस्त पथदीपांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक वीज साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्रीगणेश चतुर्थीपूर्वी पथदीपाची दुरुस्ती केली जाणार आहे. पथदीपांबाबत तक्रारींची गंभीर दखल घेतली जाणार आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

पावसाळ्यात केवळ गोव्यात नव्हे तर इतर राज्यातसुद्धा वीज समस्या भेडसावत असते. गोव्यात पावसाळ्यातसुद्धा सुरळीत वीजपुरवठा होतो. गोवा हे एकमेव राज्य वीजपुरवठ्यामध्ये अग्रेसर आहे, असेही वीजमंत्री ढवळीकर यांनी सांगितले.