गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा

0
211
  • प्रा. रमेश पुरुषोत्तम सप्रे

आपल्या संस्कृतीतील देव-देवता-दैवतं ही चित्रं- मूर्तीरूपात काळाच्या ओघात नंतर आली. आधी शब्दस्वरूपात ती सुंदर रुपकं नि हृद्य प्रतीकं होती. आपली मूळ ओळच पहा ना- ‘मनाचे श्‍लोक’ मधली- ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा|’

आजोबा नातवाला ‘मनाचे स्लोक’ पाठ करायला शिकवत होते. आजींना बोबड्या उच्चारात श्‍लोक म्हणणार्‍या आपल्या नातवाचं कौतुक वाटत होतं. सूनबाईंनी आग्रहानं आपल्या मुलाचं नाव ‘श्‍लोक’ ठेवलं होतं. पण कोणतीही स्पर्धा किंवा परीक्षा नसताना आपला श्‍लोक ‘मनाचे श्‍लोक’ पाठ करतोय हे तिला विशेष पसंत नव्हतं. पटतही नव्हतं. बाबांच्या डोक्यात मात्र ‘मनाचे श्‍लोक’मधील पहिली ओळ ऐकताना वेगळाच प्रकाश पडला होता. तसं पाहिलं तर ती ओळ त्यांनी ‘य’ वेळा ऐकली होती. ‘र’ वेळा वाचली होती आणि ‘ल’ वेळा म्हटली होती. पण आज मात्र ती प्रथमच त्यांच्या कानातून मनात उतरली होती. म्हणतात ना हृदयस्पर्शी अन् मस्तकदंशी, अशी ती ओळ कुठंतरी आत आत घुसली होती- ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा.’ त्यांना विनोबांच्या ‘विचार पोथी’ या छोटेखानी पुस्तकातला तो विचार आठवला. ‘गणेश तोच गुणेश.’ विनोबांच्या खास शैलीतलं वाक्य नव्हतं, विधानही नव्हतं; ते होतं एक अर्थगर्भ सूत्र.

‘अतिपरिचयात् अवज्ञा’ या न्यायानं अनेकदा नित्यपठणात असलेल्या पाठ गोष्टींच्या अर्थाकडे आपलं क्वचितच लक्ष जातं. याचं घरातलं (म्हणजे टीव्ही-मोबाईलपूर्वीच्या घरातलं आणि हो इंग्रजी माध्यम पाळण्यापासून सुरू होण्याच्या पूर्वीच्या घरातलं) उदाहरण म्हणजे ‘शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदा’ या नित्य प्रार्थनेचं. या अप्रतिम सायंप्रार्थनेच्या अर्थावर ना आजोबांनी चिंतन केलं होतं, ना बाबांनी कधी विचार केला होता. आजी-आईकडून घरकामाच्या धबडग्यात असला विचारबिचार करण्याची शक्यताच नव्हती. असो. हे झालं घरातलं उदाहरण. दारातलं उदाहरण म्हणजे आपलं राष्ट्रगीत. हे कोणत्या भाषेत आहे इथपासून यातील प्रत्येक शब्दाच्या अर्थापर्यंत आनंदीआनंद असतो.

आरंभीचेच शब्द काय सांगतात- ‘जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता!’ हा भाग्यविधाता कोण? एखादी व्यक्ती की शक्ती? व्यक्ती म्हणजे कोण देशाचा प्रमुख की एखादा लोकनेता की आणखी दुसरा कोणीतरी? ‘राष्ट्रगीत’ जर सर्वांचं, सर्व काळासाठी, प्रसंगांसाठी असेल तर याच्यावर चिंतन करून, निदान विचारमंथन करून ते जनताजनार्दनापर्यंत पोचवलं पाहिजे.
एक विचारदृष्टी अशी असू शकते. ‘जनगण’ म्हणजे लोकांचे गट, समुदाय. यात सर्व धर्मपंथ, जातीजमाती, भाषा, संस्कृती असलेले लोक आले. लोकशाहीला ‘गणतंत्र’ असा शब्द वापरला जातोच ना? म्हणजे आपल्या देशात- इंडिया दॅट इज भारत नव्हे- तर फक्त ‘भारत’ देशात असलेल्या सर्व जनगणांचा नायक तो गणेश असं मानायला काय हरकत आहे? आणि ‘जनगणमनाचा’ नायक तो गुणेश!

दुर्दैवानं गणेश हे एका विशिष्ट धर्माचं दैवत मानलं गेलं. इतकं की अगदी लहान मुलांच्या अंकलिपीच्या म्हणजे संख्या आणि अक्षरं यांची ओळख करून बाळबोध पुस्तिकात किंवा भिंतीवर टांगण्याच्या तक्त्यातही ‘ग’ गणेशातला जाऊन ‘ग’ गवतातला आला. (हिंदीत गवत शब्द नसल्यानं ‘ग’ गड्यातला म्हणजे गाढवातला असं शिकवलं जाऊ लागलं.) हा विनोद नसून ही आपली दारुण नि करुण परिस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे. असो.
आपल्या संस्कृतीतील देव-देवता-दैवतं ही चित्रं- मूर्तीरूपात काळाच्या ओघात नंतर आली. आधी शब्दस्वरूपात ती सुंदर रुपकं नि हृद्य प्रतीकं होती. आपली मूळ ओळच पहा ना- ‘मनाचे श्‍लोक’ मधली- ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा|’
‘भारत हा कृषिप्रधान देश आहे’ हे वाक्य पाठ्यपुस्तकातलं. ‘भारत हा कोणत्या प्रकारचा देश आहे?’ असा १ गुणाचा (मार्काचा) प्रश्‍न विचारला की झालं काम. पण याचा अर्थ, परंपरेनं हजारो वर्षं आपला देश हा कृषिवलांचा म्हणजे शेतकर्‍यांचा देश आहे. कृषी म्हणजे शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. शेती ही अजूनही पावसावर अवलंबून आहे. म्हणजे मानवाच्या नियंत्रणाबाहेरची, शक्तीबाहेरची गोष्ट आहे. यासाठी एका देवतेची स्थापना (निर्मिती) झाली जी आकारानं ओबडधोबड होती. निसर्गात स्वयंभू सापडणारी होती. तिच्यावर छिन्नी हातोडीनं फार संस्कार, कलाकुसर करावी लागणार नव्हती. अशा देवाला सामान्य जनगणांचा ईश (देव) मानून त्याची पूजा होऊ लागली. (आपल्या प्रसिद्ध अष्टविनायकातील स्वयंभू मूर्ती डोळ्यासमोर आणू या.)
साहजिकच अशा गणेशाला ‘दूर्वा’ म्हणजे गवत- तेही नडणी करताना म्हणजे पिकाभोवती वाढलेले तण म्हणजे गवत म्हणून काढलेले. पुढे त्यांना दूर्वांचं माहात्म्य दिलं गेलं. त्यानुसार स्तोत्रं, कहाण्या, व्रतं, पूजा, उत्सव यांची निर्मिती झाली. मुख्य म्हणजे या देवाचं वाहन बनलं मूषक म्हणजे उंदीर. जो शेतकर्‍यांचा म्हणजे त्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेल्या धान्याचा नेहमीचा शत्रू क्रमांक एक! त्याच्यावर स्वार होणारा म्हणजे नियंत्रण ठेवणारा देव बनला गणेश. अगदी साधासुदा जनगणांचा देव. शिवाय बहुसंख्य लोकांच्या मनात वसून राहिलेला, लोकमानसावर अधिराज्य गाजवणारा देव बनला-
‘जनगणमनअधिनायक’! अर्थातच याच्यापासून अभय नि वरदान (शक्ती- कष्ट, प्रयत्न, प्रयोग करण्याची प्रेरणा) मिळवून सार्‍या देशाचं चित्र संपन्नता, समृद्धी यांनी शोभिवंत बनवलं- याचंच वर्णन आपल्या राष्ट्रगानात आहे.

सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्
शस्यश्यामलाम्… मातरम्… वंदे मातरम्!
अर्थातच जनगणमनाचा अधिनायक गणेश बनला भारतभाग्यविधाता! म्हणूनच गणेश हा असंख्य भारतीयांच्या प्रेरणेचं, शक्तीचं, कृतज्ञतेचं प्रतीक बनला. त्याला देव्हार्‍यात, गर्भकुडीपेक्षा (गाभार्‍या) माटोळीखाली बसणंच अधिक पसंत पडू लागलं. माटोळीला बागायतीतील सर्व फळं, फळभाज्या बांधल्या जाऊ लागल्या. त्याबरोबरच शेतातील पिकाला आलेली नवी कणसेही लावली जाऊ लागली. असा सजला आपला गणेश! त्याचा उत्सवही अतिशय साधा, सोपा पण भक्तिभावानं ओथंबलेला असा होऊ लागला. पुढे त्यात कालमानाप्रमाणे अधिक भव्यता (खरं तर भपका), सजावट, मूर्तीतली विविधता (अगदी त्याच्या वाहनातसुद्धा बदल घडवले गेले) या गोष्टी येत गेल्या.
सार्वजनिक गणेशउत्सवातला मूळ लोककल्याणकारी उद्देश जाऊन त्यात स्पर्धा, भव्यतेच्या नावाखाली सर्व प्रकारचं प्रदूषण अगदी लोकसंस्कृतीचं पोषण होण्याऐवजी क्रमानं होत गेलेलं भ्रष्टीकरण हा सर्वकाळाचा महिमा समजायचा.

गेल्या काही वर्षांत गणेशमूर्ती (पीओपीऐवजी चिकणमातीच्या), त्यांच्या मिरवणुका, अवतीभवतीची (थर्मोकोल, प्लास्टिकची) सजावट, कर्कश्श ध्वनिक्षेपक (लाउडस्पीकर्स यांना विनोबा ‘रावण’ म्हणत असत), वरच्या आवाजातल्या गोंगाटी आरत्या, मुख्य म्हणजे कर्णछेदक फटाके आणि विक्राळ विसर्जन मिरवणुका यात चांगलं परिवर्तन होऊ लागलंय. विशेष म्हणजे यात महत्त्वाचा वाटा मुलं नि युवावर्ग यांचा आहे. गेली दोन वर्षं तर कोकोसुरानं (कोरोना-कोविड) सार्वजनिक उत्सवांवर जवळजवळ घट्ट झाकण घातलंय. या सर्वातून बुद्धिदाता नि लोकत्राता गणेश निश्चित काहीतरी कायमचं असं परिवर्तन घडवेलच. तशा प्रार्थनाही त्याला करूया. असो.

हे झालं गणेशाबद्दल. अर्थात ‘गण’ म्हणजे गट, समूह काही फक्त लोकांचेच नसतात. अक्षरं, स्वर, रंग, रेषा, मुद्रा (नृत्यातील हालचाली), पंचमहाभूतं, वनस्पती नि प्राणी (फ्लोका अँड फॉना) अशा सर्वांचे ‘गण’ असतात. त्यांचा अधिपतीसुद्धा गणेशच. हा ‘गणाधीश’ जो आरंभी भोळ्याभाबड्या, गरीब पण सात्त्विक जनसामान्यांचा होता तोच पुढे समाजातील सर्व स्तरांतील लोकांचं अधिदैवत बनला. कवी, कलाकार, मूर्तिकार अशा प्रतिभावंतांसाठी स्फूर्तीचं आराध्यदैवत बनला. ही गोष्ट अर्थातच स्वागतार्ह होती. याचा प्रभाव नि परिणाम म्हणून निरनिराळी भाव- अर्थपूर्ण सूक्तं – स्तोत्रं रचली जाऊ लागली.

कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या कल्पक शैली नि योजना लोकांसमोर येत राहिल्या. अलीकडच्या काळात ज्यावेळी सर्वच क्षेत्रांतील नेतृत्वात भ्रष्टाचार हाच सदाचार नि शिष्टाचार बनला तेव्हापासून गणेशोत्सवाची सांस्कृतिक- सामाजिक पातळी घसरू लागली. गेल्या काही वर्षांत तर राजकीय नि आर्थिक धनदांडग्यांनी आणि धनलांडग्यांनी या उत्सवाच्या निमित्तानं कहर माजवला होता.

गणेशदेवतेचं पावित्र्य नि त्याच्या उपासनेतील लालित्य रसातळाला जाऊ लागलं. आता बघूया कोरोनानंतरच्या काळात नि जनतेत (समाजात) यासंदर्भात काही सकारात्मक, भरीव, कल्पक नि विधायक बदल घडतात का?
समर्थ रामदासांसारखे तपस्वी, तेजोमय कवी एकाच श्‍वासात (एकाच काव्यपंक्तीत) फार महान विचार सांगून जातात ः
‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ यात गणेशाची- ज्याला अग्रपूजनाचा नि अग्रनमनाचा मान होता नि अजूनही आहे- अशी दोन रूपं सांगितलीयत.

एक- गणांचा ईश गणेश तर दुसरा गुणांचा ईश- गुणेश!
गणेशानंतर आता थोडं गुणेशावर सहचिंतन करूया.
साध्या शब्दात ‘गुणेश’ म्हणजे गुणांचा स्वामी. आपल्या देशाचं नाव जे ‘भारत’ आहे, त्याचा एक अर्थ आहे ‘भा’ म्हणजे प्रकाश (भास्कर म्हणजे प्रकाश देणारा सूर्य). प्रकाशाचा संबंध सर्वत्र ज्ञान, तेज, गुण, पराक्रम अशा गोष्टींशी जडलेला दिसून येतो. आणि ‘रत’ म्हणजे गुंतलेले, तन्मय झालेले (जसे कार्यरत) असे लोक. म्हणजे गुणाच्या, तेजाच्या पूजेत गुंतलेल्या किंवा रमलेल्या लोकांचा देश.

अथर्वशीर्ष स्तोत्रात ‘त्वं गुणत्रयातीतः’ असं म्हटलंय. याचा अर्थ सत्त्व-रज-तम अशा त्रिगुणांचा स्वामी, जो या तिन्ही गुणांच्या पलीकडे असतो. ऋषिमुनींसारखी प्रज्ञावंत मंडळी असे त्रिगुणातीत असतात. ‘अत्रि’ ऋषी हे त्यांचे प्रतिनिधी आहेत. एका अर्थानं गणेशाच्या वरदहस्तामुळे अत्रि नि अत्यंत निर्मत्सर असलेली अनसूया यांच्यामुळे दत्तात्रेयांचा जन्म झाला व मानवजातीला विविध उपासनापंथातून एकात्म ऐक्यभावनेवर आधारित असलेल्या उपास्य दैवताचा आदर्श लाभला.

आजही विविध क्षेत्रांतील गुणीजनांना प्रेरणा, प्रतिसाद, पारितोषिकं हे गणेश- शारदा यांचा प्रसाद म्हणूनच दिली नि स्वीकारली जातात. ‘शारदा’ नावाचा संबंध शरद ऋतूशी असतो. पण ‘सरसवती’ असल्यानं नाट्य-काव्य-साहित्य-कला क्षेत्रातील प्रवाही नवरसांची स्फूर्तिदायी शक्ती असते. गणेश ज्ञानाचा देव तर सरस्वती तंत्र, कला तसेच मंत्रांचीसुद्धा देवी मानली जाते. म्हणून कलावंतांचे मेळावे, नाट्य किंवा साहित्यसंमेलने हे एका अर्थानं ‘गुणेशोत्सव’च असतात- असायला हवेत.

पूर्वी गणेशोत्सवात ‘मेळे’ नावाचा प्रकार सादर केला जाई. त्यात पदं, नृत्यं, नाटुकली, जादू, विनोद असे मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले जात. त्यातून लोकहिताचे संदेश दिले जात. उदा. ‘देशबंधूंनो विचार करा, चहापेक्षा (उसाचा) रस बरा’ किंवा ‘आहार चौरस हवा, त्यासाठी दूध या पूर्णान्नाचा मेवा’ अशा अर्थाचे वरून बटबटीत वाटले तरी त्या काळाच्या दृष्टीनं नि आतल्या कळकळीनं- तळमळीनं दिलेले असल्याने हे संदेश जनमानसावर परिणामकारक ठरत. हेही एका अर्थी ‘गुणेश’पूजनच असे.

विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक विषयांवर स्पर्धा, चर्चा, भाषणं, परिसंवाद अशा कार्यक्रमांची रेलचेल असे. विशेष म्हणजे लोकही अशा कार्यक्रमांना गर्दी करत. याच्या जोडीला नाटकं, गायन-वादन असे कार्यक्रमही असत. आजच्यासारखे फिल्मी गदारोळ करणारे ऑर्केस्ट्रा त्या काळात नव्हते. दूरदर्शन, इतर समाजमाध्यमं नव्हतीच. साक्षरता अल्प असल्याने वृत्तपत्रांचा प्रभावही मर्यादित होता. पण समाजाच्या प्रबोधनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव नि गुणेशोत्सव ही खास पर्वणी असायची.
पारंपरिक गणेशपूजा, गणेशोत्सव यांच्यापेक्षा काहीसा वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

शेवटी एक पौराणिक प्रसंग आणि एक अगदी अलीकडे घडलेली सत्यघटना.

गणेश दैवताचं नि त्याच्या उपासनेचं स्वरूप लक्षात येण्यासाठी गणेश नि शिवपार्वती यांच्यात घडलेला हा प्रसंग.
नारदांकडून गणेशाला कळलं की प्रत्येक देवकार्यात, धार्मिक उत्सवात सर्वांत आधी गणेशपूजन केलं जातं. आनंदानं मन फुलून गेलेला गणेश आईकडे जाऊन विचारतो, ‘लग्नासारख्या प्रसंगीही गणेशाची अग्रपूजा करायची असते. खरं ना?’ पार्वतीनं होकार देताच बुद्धिमान गणेश पुढे विचारतो, ‘मी तुमचा पुत्र ना? मग तुमच्या विवाहाचे वेळी कोणाची पूजा केली होती?’ यावर पार्वती उद्गारली, ‘असल्या प्रश्‍नांची उत्तरं मला नाही सुचत. पिताश्रींनाच जाऊन विचार.’ लगेच गणेश शंकराकडे आला नि तोच प्रश्‍न विचारला, ‘अतिशय कौतुकानं गणेशाला जवळ घेत शिवशंकर सांगू लागले, ‘या विश्‍वात, सृष्टीत निरनिराळ्या वस्तूंचे, पदार्थांचे गट आहेत. तसेच मानव समाजातही अनेक गट, समूह, समूदाय आहेत. त्यांना ‘गण’ असं म्हणतात. त्या गणांचा जो स्वामी, जो ईश तो गणेश! समजलं?’ यावर गणेशानं होकारार्थी मान हलवली. नंतर महादेव आपल्या मेधावी पुत्राला गणेशाला उद्देशून म्हणाले, ‘तुझ्या जन्मापूर्वी हा गणेश शक्तिरूपात, तत्त्वरूपात, चैतन्यरूपात अस्तित्वात होताच. तो मूळ गणेश आम्ही त्याचंच नाव तुला ठेवलं. कळलं?’
‘म्हणजे मी नावाचाच गणेश आहे तर!’ या गणेशाच्या उद्गारांवर शिवशंकर जे म्हणाले ते महत्त्वाचं आहे. ‘आज जरी तुझं नाव ‘गणेश’ असलं तरी तुझ्या कार्यानं, कर्तृत्वानं, पराक्रमानं तू आपलं नाव सिद्ध करशील. ‘गणेश’ म्हणूनच नावारूपाला येशील.’ हा वडिलांचा आशीर्वाद समजून गणेश आपलं कार्य करण्यास सिद्ध झाला.

दुसरा प्रसंग अगदी अलीकडचा. विज्ञान क्षेत्रातला. अजूनही जिचा अंतराळात सर्वाधिक काळ चालण्याचा (स्पेस वॉक्) विश्‍वविक्रम आहे त्या सुनिता पंड्या विल्यम्स या अंतरिक्ष वीरांगनानं तिच्या मातृभूमीतील म्हणजेच भारतातील एका युवावर्गासमोरील व्याख्यानानंतरच्या प्रश्‍नोत्तरांच्या वेळी जे एक उत्तर दिलं त्यांनी अन्य वैज्ञानिक, उद्याचे वैज्ञानिक काहीसे चक्रावले.
प्रश्‍न अगदी साधा होता- ‘अवकाशात कसलाही आधार नसताना भयाण काळोखात चालताना भीती नाही वाटली?’
यावर सुनिताचं उत्तरही साधंच होतं. पण भावपूर्ण होतं. अत्यंत उत्स्फूर्त तसंच प्रामाणिक होतं. ती म्हणाली, ‘त्या अनंत अवकाशात मी एकटी कुठं होते? संपूर्ण वेळ गणेश माझ्याकडे पाहत होता.’ म्हणजे ज्याच्या आराधनेचे श्रद्धापूर्ण संस्कार माझ्या मनात खोल कोरले गेलेयत त्या गणेशदेवतेची- गणेशशक्तीची कृपादृष्टी माझ्यावर सारा वेळ होती. हा तिचा स्वतःचा, सच्चा अनुभव होता.
गणेश ही अशी केवळ मूर्तीत बद्ध झालेली शक्ती नाही. मूर्ती हे त्या अमूर्त चैतन्याचं मूर्त प्रतीक आहे. त्याचा भावार्थ लक्षात घेऊन उपासना करायची असते.

या गणेश प्रतीकाचे निरनिराळे अर्थ ज्ञानेश्‍वरादी संतांनी जसे लावले तसे अनेक विचारवंतांनीही लावले. गणेशचरित्रापेक्षा त्याच्या रूपास्वरूपावर, कार्यकर्तृत्वावर रचलेली स्तोत्रं या दृष्टीनं अधिक चिंतनीय आहेत.

सर्व वाचक बंधूभगिनींना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभकामना देत असताना सहज कानोसा घेतला तेव्हा नातवाला अतीव प्रेमाने स्तोत्रं शिकवणारे आजोबा ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ या ओळीपासून म्हणजे ‘मनाचे श्‍लोक’पासून अथर्वशीर्षापर्यंत पोचले होते. ते सांगत होते नि नातू म्हणत होता –
‘त्वं वाङ्‌मयः त्वं चिन्मयः त्वं आनंदमयः त्वं ब्रह्ममयः..’
हेच खरं स्वरूप आहे गणेशाचं नि गुणेशाचं! बघा विचार करून.