गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १६ जवान शहीद

0
168
Gadchiroli: Mangled remains of a police vehicle, carrying 16 security personnel that was allegedly blasted by Maoists using IED, in Gadchiroli, Wednesday, May 1, 2019. (PTI Photo) (PTI5_1_2019_000083B)

गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी काल बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले. या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या नक्षली हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलींचा हिंसाचार खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना वंदन करतो. त्यांचे बलिदान विसरता येणार नाही, असेही मोदींनी म्हटले आहे.

मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथे नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शीघ्र कृती दलाच्या पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.

मध्यरात्री जाळली ३६ वाहने
पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरू असून, हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. तेथे अनेक वाहने होती. मंगळवारी रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली होती.