गंजलेल्या तारांमुळे मोरबी पूल दुर्घटना

0
16

>> स्थानिक न्यायालयासमोर पोलिसांनी दिली माहिती

गुजरातमधील मोरबीमध्ये रविवारी पूल कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी स्थानिक न्यायालयासमोर माहिती देताना झुलत्या पुलाच्या तारा गंजल्या होत्या. त्यामुळे हा अपघात घडला. पुलाच्या गंजलेल्या तारांची दुरुस्ती केली असती तर अपघात घडला नसता अशी माहिती तपास अधिकारी आणि मोरबीचे पोलीस उपअधीक्षक पी. ए. जाला यांनी मंगळवारी न्यायालयासमोर दिली.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ओरेवा कंपनीचा व्यवस्थापक दीपक पारेख याने हा अपघात घडला ही ईश्वराची इच्छा असल्याचे म्हटले आहे. मोरबी केबल पूल दुर्घटना रविवारी घडली असून या दुर्घटनेत आतापर्यंत १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या नऊपैकी चार आरोपींसाठी १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली.

पोलिसांनी अटक केलेल्या नऊ जणांपैकी ओरेवा कंपनीचा व्यवस्थापक दीपक पारेख याने मुख्य मॅजिस्ट्रेट आणि अतिरिक्त वरिष्ठ सिव्हिल न्यायाधीश एम. जे. खान यांच्यासमोर आपला जबाब नोंदवला. त्यावेळी पारेख याने हा अपघात ईश्वराची इच्छा होती. त्यामुळे ही दुर्देवी घटना घडली असल्याचे म्हटले.
पोलीस उपअधीक्षक जाला यांनी, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, पुलावर किती लोक असावीत, त्याची क्षमता काय आदी बाबी निश्चित न करता सरकारच्या मंजुरीशिवायच २६ ऑक्टोबर रोजी पूल लोकांसाठी खुला करण्यात आला. त्याशिवाय, कोणतीही जीवरक्षक उपकरणे किंवा जीवरक्षक तैनात करण्यात आले नव्हते. फक्त प्लॅटफॉर्म (डेक) बदलला होता. दुसरे कोणतेही काम केले नाही. हा पूल तारांवर होता. या तारांना ऑईलिंग अथवा ग्रीसिंग करण्यात आले नव्हते. ज्या ठिकाणी तारा तुटल्या त्यांना गंज लागला होता. जर तारांची दुरुस्ती केली असती तर अपघात झाला नसता. पुलाच्या दुरुस्तीचे कोणते काम करण्यात आले, ते काम कसे करण्यात आले, याबाबत माहिती देणारे कोणतेही दस्ताऐवज ठेवण्यात आले नाहीत. पुलाची दुरुस्ती आणि देखभालीसाठी जे साहित्य खरेदी करण्यात आले, त्याची तपासणी करणे अद्याप बाकी असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
पोलिसांनी दीपक पारेख, दिनेशभाई महासुखराय दवे, कंत्राटदार प्रकाशभाई लालजीभाई परमार आणि देवांगभाई प्रकाशभाई परमार यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.