खोर्ली-आसगाव पठारावरील श्री देव घाटेश्‍वर व मिलाग्रीचो खुरीस

0
158

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
‘राखणदारा’चं अस्तित्व आहे की नाही हा एक वादाचा विषय ठरू शकेल. परंतु श्रद्धाळू माणसाच्या मनात ‘राखणदारा’चं अस्तित्व चिरंतन आहे. या श्रद्धेपायीच तो ‘राखणदारा’च्या शक्तीचा अनुभव पदोपदी आणि ठायी ठायी घेत असतो.

 

‘राखणदारा’चं अस्तित्व आहे की नाही हा एक वादाचा विषय ठरू शकेल. परंतु श्रद्धाळू माणसाच्या मनात ‘राखणदारा’चं अस्तित्व चिरंतन आहे. या श्रद्धेपायीच तो ‘राखणदारा’च्या शक्तीचा अनुभव पदोपदी आणि ठायी ठायी घेत असतो. ‘रखवालदारा’वरील भक्ती, प्रेम, आदर आणि भीती या भावनांचा पगडा त्याच्या मनावर सतत असतो. मानवी जीवनाच्या अस्तित्वापासून ‘राखणदारा’ची संकल्पना विविध प्रतिमांच्या रूपाने त्याच्या मनात ठाण मांडून बसली आहे. कुलदेवता किंवा कूलदेव, ग्रामदेवता, इष्टदेवता, स्थलदेवता या दैवीशक्ती आपल्या जीवनातील अडीअडचणी, समस्या- नैसर्गिक व मानवनिर्मित- दूर करतात, ही भावना मानवाने आजवर मनात जोपासली आहे. या दैविशक्तीपैकी ‘स्थलदेवता’ म्हणजेच ‘राखणदार’ ही अनामिक, अजाण, सर्वव्यापी अशी असीम शक्ती!
‘राखणदार’ म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते मानवसदृश्य रूप! ‘कटि श्‍वेतांबर, फेटा तव माथी| दंड मशाल शोभती हाती| माथी टिळा, पायी वहाणा| ओठावरी मिश्या, कानी कुंडला|’ असं ज्याचं वर्णन करता येईल असा ‘रक्षणकर्ता!’ आपल्या गोमंतभूमीतील शहरे आणि गाव वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेल्या या राखणदारांच्या जागृत अस्तित्वाने पावन आणि सुरक्षित झाली आहेत. म्हापसानगरीही याला अपवाद नाही. पूर्वेला व उत्तरेला श्री देव राष्ट्रोळी, दक्षिणेला सर्व रखवालदारांचे वडीलबंधू मानलेले श्री देव बोडगेश्‍वर व पश्‍चिमेला श्री देव घाटेश्‍वर हे नगरच्या सीमेवरील रखवालदार म्हापसानगरीचे व नगरातील रहिवाशांचे तथा येणार्‍या-जाणार्‍या व वाट चुकलेल्या वाटसरूंचे रक्षण करीत असतात. या सर्व रखवालदारांबद्दल म्हापसेवासीयांच्या अंतःकरणात असीम श्रद्धा आहे. सोमवार, बुधवार, गुरुवार, रविवार आदी आठवड्यातील एक दिवस रखवालदारांच्या छोट्या-मोठ्या मंदिरांत भजन-आरत्या आळवल्या जातात व रखवालदाराकडे नगराच्या व आपल्या कुटुंबीयांच्या रक्षणाची विनंती करतात.
म्हापसानगरीची ज्या सात वाड्यांमध्ये विभागणी झाली आहे, त्या सात वाड्यांपैकी ‘कासारवाडा’ हा एक वाडा. या वाड्यावर तांब्या-पितळेची भांडी घडवणार्‍या व काचेच्या बांगड्या तयार करून विकणार्‍या त्वष्टा, कासार, ब्राह्मण समाजांतील कारागिरीचा हा वाडा. आज या वाड्याचा आवाका वाढलेला असून इतर समाजाचे हिंदू व ख्रिस्ती कुटुंबीयांचे वास्तव्य या वाड्यावर आहे. या वाड्याच्या पश्‍चिम दिशेला आसगावचे पठार (घाटी) आहे. या पठारावरील ग्रामस्थांची ‘स्थलदेवता’ म्हणजे हा ‘घाटेश्‍वर’ व ‘मिलाग्रीचा खुरीस’ हे या परिसराचे ‘राखणदार’ (रखवालदार) आहेत अशी हिंदू व ख्रिस्ती समाजाची भावना आहे. सर्वश्री पांडुरंग कोरगावकर, भिकारो केरकर, गौरी कोरगावकर, विष्णू च्यारी, नीला मांद्रेकर आदी खोर्ली परिसरातील ग्रामस्थांना या रक्षणकर्त्या रखवालदाराचे अस्तित्व जाणवले आणि त्यांनी भक्तिभावाने या ठिकाणी श्री देव घाटेश्‍वराची घुमटी इ.स. १९६५ च्या दरम्यान उभारली.
श्री देव घाटेश्‍वर
आसगाव- हणजूणहून म्हापशाला येताना आसगाव पठाराच्या उजव्या बाजूला एक घुमटी आहे. या बाजूने येणारे-जाणारे वाटसरू व प्रवासी या घुमटीसमोर उभे राहून प्रार्थना करतात. तेलाची पणती, उदबत्त्या पेटवून किंवा श्रीफळ (नारळ) वाढवून (फोडून), केळी व साखर ठेवून रखवालदाराकडे आशीर्वाद मागतात. आपलं व आपल्या कुटुंबीयांच्या रक्षणाचं मागणं करतात.
आज या परिसरात लोकवस्ती वाढली आहे. आजूबाजूच्या घरांतील तथा खोर्ली विभागातील हिंदू समाज म्हापसा-आसगाव सीमेवरील या रखवालदाराची वर्षातून एकदा जत्रा भरवतात. यानिमित्ताने महाप्रसादाचं व करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आसगाव पठारावरील (घाटीवरील) रखवालदार म्हणून त्यास ‘घाटेश्‍वर’ या नावाने संबोधतात. आज या घुमटीच्या सभोवती श्री देव घाटेश्‍वराचे भव्य, सुंदर आणि सुबक असे मंदिर उभे आहे. इ.स. १९८९ पासून जत्रोत्सवास सुरुवात झाली. दर रविवारी रात्री ८ वाजता आरत्या होतात. मंदिराच्या उजव्या बाजूला नव्याने इमारती उभ्या राहत असून नवीन वसतिस्थान आकाराला येत आहे.
खोर्लीतील काही जुन्या-जाणत्या माहीतगारांकडून या देवस्थानासंबंधात काही आख्यायिकाही ऐकायला मिळतात. एकदा आसगाव येथील दामू नावाच्या वीज खात्याच्या लाईनमेनने वीज बिलाचे पैसे भरले नसल्याचे कारण देत मंदिराच्या विजेची जोडणी तोडून टाकली. तो एक दिवस रात्रीच्या वेळी सायकलने घरी जात असता कोणा अज्ञात शक्तीने त्याला बरीच मारहाण केली. ही श्री देव घाटेश्‍वराने आपल्याला घडवलेली अद्दल आहे असे म्हणत त्याने विजेची परत जोडणी करून दिली.
दुसरा एक असाच प्रसंग म्हणजे, सीताराम कारेकर नावाचा मोटरसायकल पायलट एका प्रवाशाला हणजुण येथे पोचवून परत येत असताना मोटरसायकलवरील ताबा गेल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत कोसळणार इतक्यात कुठल्यातरी अज्ञात शक्तीने त्याला मोटरसायकलवरून उचलून जवळच असलेल्या कै. रामा तेली यांच्या घराच्या पडवीत झोपवले व मोटरसायकल कुंपणाच्या बाहेर ठेवली. दुसर्‍या दिवशी कै. रामा तेली यांनी तो आपल्या पडवीत कसा पोचला याबाबत चौकशी केली असता तुम्हीच मला आपल्या पडवीत आणून झोपवलं असं कारेकर सांगू लागला. श्री देव घाटेश्‍वराने चक्क रामा तेली यांच्या रूपाने येऊन त्याला वाचवले अशी मग सर्वांचीच भावना झाली.
मिलाग्रीचो खुरीस
आसगाव पठारावरील श्री देव घाटेश्‍वर मंदिराच्या बाजूनं जाणार्‍या रस्त्याचं वळण आपण पार केलं की पुढे शंभरएक मीटरच्या अंतरावर इंग्रजी ‘यू’ अक्षराचा आकार असलेल्या दुसर्‍या एका धोकादायक वळणावर पोचतो. म्हापशाकडे येताना या वळणाच्या डाव्या बाजूला पठाराच्या कडेवरील उतरणीवर पूर्वेकडे तोंड करून उभे असलेले छोटे ‘कपेल’ (चॅपल) आहे. पूर्वी या ठिकाणी क्रॉस असलेला स्तंभ होता. पुढे याच जागेवर छोटेसे चॅपल बांधण्यात आले. या क्रॉसला ‘खोर्ले घाटावयलो मिलाग्राचो खुरीस’ म्हणून ओळखले जात असे (मिरेक्युलस क्रॉस ऑफ खोर्ली हिलोक). खोर्ली भागातील ग्रामस्थांच्या सहकार्याने हे चॅपल उभारण्यात आले आहे. या कामी खोर्ली येथील पाव-बिस्किटे विकणारे प्रसिद्ध ‘पदेर’ ख्रि. जुझे ब्रागांझा यांचा फार मोठा सहभाग होता. आज या चॅपलचे नूतनीकरण करण्यात आले असून ‘चॅपल’ व ‘क्रॉस’कडे जाणार्‍या-येणार्‍या दगडाच्या सुबक पायर्‍या बांधण्यात आल्या आहेत.
आज या ‘चॅपल’च्या आजूबाजूचा परिसर पूर्वीसारखा राहिलेला नाही. चॅपलच्या पाठीमागे पश्‍चिम दिशेकडील सपाट पठारावर ‘ज्ञानप्रसारक मंडळ’ या म्हापशातील अत्यंत जुन्या व प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेचे उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण देणार्‍या तथा पदव्युत्तर व संशोधन केंद्राच्या भव्य व सुंदर इमारती उभ्या असून म्हापसा व आजूबाजूच्या परिसरातील अंदाजे चार-साडेचार हजार विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. या उलट उत्तरेकडील दिशेच्या भागात लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने बेकायदा बांधकामे उभी राहिली असून या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
फार पूर्वीपासून या बाजूने जाणारे वाटसरू, वाहनचालक व स्थानिक ख्रिस्ती समाज दरवर्षी मे महिन्यात ‘लादाईन’ (सामूहिक प्रार्थना- छोट्या प्रमाणातील फेस्त) साजरे करीत व आजही करतात. दररोज या ठिकाणी श्रद्धाळू वाटसरूंकडून मेणबत्त्याही पेटवल्या जातात. गेली काही वर्षे ख्रि. जुझे ब्रागांझा (पदेर) या चॅपलची देखभाल करीत असत.
युवा अवस्थेत असताना या भागात येणं झालंच तर आठवतं ते डोंगराचं पठार आणि पठारावर वाढलेली झुडपं आणि काट्यांनी भरलेली चुर्ना, कांटा, जांभळा, भिण्णा (कोकम) आदी रानमेव्याची झाडी व मोठाली झाडे. डोंगरपठाराच्या पल्याड असलेल्या आसगाव-हणजूण आदी भागातील नागरिक म्हापशात यायचं झालं की या पठारावरील दगडधोंड्यातील काट्याकुट्यांनी भरलेल्या पायवाटेचा वापर करीत. डोंगर उतरून खाली शहरात यायचे व म्हापशाच्या प्रसिद्ध बाजारपेठेकडे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वळायचे. डोंगरपठारावरून खाली तळाशी नजर फिरवली की म्हापसा शहराचं विहंगम दृश्य नजरेत भरायचं. आज या पायवाटेचे डांंंंबरी रस्त्यात रुपांतर झाले आहे. परंतु आसगावच्या बाजूने चढण किंवा उतरण धोकादायक असल्याने व रस्ता अरुंद असल्याने दुचाकी किंवा चारचाकी वाहने या रस्त्याचा क्वचितच उपयोग करताना दिसत असत. परंतु हणजूण-वाघातोर-शापोरा आदी समुद्रकिनार्‍यांवर म्हापशाहून जाण्या-येण्यासाठी देशी व विदेशी पर्यटक आज याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करताना दिसतात.
वास्तविक पाहता बसेस व इतर चारचाकी अवजड वाहनांसाठी तर हा रस्ता अत्यंत धोकादायक बनलेला आहे. रस्त्याच्या या धोकादायक वळणावर दुचाकी वाहनेही ताबा गेल्यामुळे दरीत कोसळली आहेत. परंतु सुदैवाने घडलेले हे अपघात किरकोळ स्वरूपाचे होते. वाहनचालक जाणकार असल्यास या वळणावर गाडीचा वेग कमी करून सावकाशीनं रस्त्याच्या उतरंडीवरून वाहन उतरवतात. किनारी भागामुळे अनेक देशी-परदेशी पर्यटक या बांकदार वळणाचा अंदाज न आल्यामुळे आपले वाहन रस्त्याच्या खोल घळीत घालतात व अपघाताला निमंत्रण देतात. आता याच खोलगट घळीत बहुमजली इमारत व एक बंगला उभा राहिला आहे. रस्त्याच्या कडेला पत्र्याचे कुंपणही घातले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे.
या ठिकाणी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. इ.स. १९७० च्या दशकात शापोरा-म्हापसा वाहतूक करणारी एक प्रवासी बस सदर धोकादायक वळणावर बसच्या ड्रायव्हरचा गाडीच्या स्टिअरिंगवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या पश्‍चिमेकडील खोलगट भागात कलंडली. परंतु सुदैवाने आणि श्री देव घाटेश्‍वर व क्रॉसच्या कृपेने बस दरीतील एका दगडाला अडकून राहिल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. हा एक प्रसंग वगळता या वळणावर आजपर्यंत कधीही अपघात घडलेला नाही हे एक आश्‍चर्यच म्हणावे लागेल. हिंदू समाज डोंगरपठारावरील रस्त्याच्या दक्षिणेकडे असलेल्या श्री देव घाटेश्‍वराची ही कृपा मानतात, तर ख्रिस्ती समाज या परिसरावर मिलाग्रीच्या खुर्साचा (मिलाग्रीच्या क्रॉसचा) ‘बेसांव’ (कृपा) आहे असे म्हणतात.
‘चमत्कार’ आणि ‘दैवीकृपा’ यामुळेच या भागात धोकादायक वळणे असलेले रस्ते असूनही अपघात घडत नाहीत असे सारेचजण मानतात.