खास कचरा खाते स्थापन करण्याची गरज

0
98

>> लोबो ः मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी

राज्यातील कचरा विल्हेवाटीची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. कचरा विल्हेवाटीची समस्या सोडविण्यासाठी कचरा व्यवस्थापन महामंडळाबरोबरच खास कचरा मंत्रालय स्थापन करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी कचरा मंत्रालय स्थापन करण्याच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गोवा विधानसभेचे उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल केली.

राज्यातील कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न हाताळण्यासाठी वेगळ्या मंत्रालयाची नितांत गरज आहे. कचरा व्यवस्थापन मंडळाच्या माध्यमातून जलद गतीने कामकाज हाताळले जाऊ शकत नाही. वेगळे कचरा मंत्रालय असल्यास कचरा विल्हेवाटीच्या कामाकडे गंभीरपणे लक्ष दिले जाऊ शकते. कचरा मंत्रालयामध्ये कचर्‍याची समस्या हाताळू शकणारे अधिकारी, अभियंत्ते, तांत्रिक कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
कचरा उघड्यावर टाकणार्‍या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. वेगळ्या मंत्रालयाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात, असेही लोबो यांनी सांगितले.

साळगावमधील प्रकल्प अपुरा
राज्यात कचरा व्यवस्थापन महामंडळ स्थापन करण्यात आल्यानंतर साळगाव येथे अत्याधुनिक पद्धतीचा कचरा विल्हेवाट प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. हा कचरा प्रक्रिया प्रकल्प अपुरा आहे. राज्यात आणखी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज आहे, असेही लोबो यांनी सांगितले.

बायंगिणी प्रकल्प १५ वर्षे प्रलंबित
बायंगिणी ओल्ड गोवा येथे कचरा प्रकल्प उभारण्याचे काम गेली पंधरा वर्षे रेंगाळत पडले आहे. तिसवाडीतील कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी बायंगिणी येथे जलदगतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज आहे. सोनसडा कचरा समस्या हाताळणे मोठे आव्हानात्मक आहे, असेही लोबो म्हणाले.