खासदार साहूंच्या व्यवसायांशी काँग्रेसचा संबंध नाही ः रमेश

0
3

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायांशी काँग्रेस पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे काल काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. जयराम रमेश यांनी ट्वीट करत हे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्यांच्याकडे एवढे पैसे कसे सापडले हे फक्त तेच सांगू शकतील अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली. आयकर अधिकाऱ्यांकडून एवढी मोठी रोकड त्यांच्याकडून एवढी रक्कम कशी जप्त केली जात आहे याचे स्पष्टीकरणदेखील त्यांनी द्यावे अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे.

घरी नोटांची बंडले
सध्या धीरज साहू यांच्या घरी सापडलेल्या रकमेच्या वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यमध्ये कपाट नोटांच्या बंडलांनी भरलेले दिसत असून खाली ठेवलेल्या पिशव्याही नोटांनी भरलेल्या दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू चर्चेत आले आहेत. आयकर विभागाने साहू यांच्या झारखंडमधील घरावर छापा टाकून तब्बल 300 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. हा आकडा अजून वाढू शकतो, असा दावा केला जात आहे.

आकडा चारशे कोटींवर?
जप्त केलेल्या पैशांची मोजणी लवकर पूर्ण करण्यासाठी आयकर विभागाने रविवारी (10 डिसेंबर) नोट मोजणाऱ्या मशीनची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. धीरज साहूंकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 300 कोटी रुपयांची रोकड मोजली गेली आहे. अजून बरीच रक्कम मोजणे बाकी आहे, त्यामुळे हा आकडा चारशे कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. नोटा मोजण्यासाठी आणखी मशीन्स मागवल्या जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी सुरुवातीला बँक कर्मचाऱ्यांसह 30 हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. पण, आता मोजणी त्वरित पूर्ण करण्यासाठी आयकर विभागाने सुमारे 40 लहान-मोठ्या मशीन्स तसेच आणखी कर्मचारी मागवले आहेत.
सध्या काँग्रेस पक्षही त्यांच्यापासून दूर झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणी काँग्रेसवर टीका केल्यानंतर रमेश यांनी, काँग्रेसचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.