खाप पंचायत आणि सामाजिक दुष्परिणाम

0
158
  • देवेश कु. कडकडे

आशा आणि विश्‍वास ठेवण्यास निश्‍चित जागा अहे की आणखी काही वर्षात अशी कृत्ये बंद होतील. परंतु हे तेव्हाच शक्य आहे. जेव्हा सारा देश सामूहिकरित्या अशा प्रकारांकडे एक कलंक म्हणून पाहील आणि पूर्ण सभ्य समाज एका स्वरात त्याची निर्भर्त्सना करील.

एकविसावे शतक हे प्रत्येक नागरिकाचे हक्काचे रक्षण करणारे आहे असे म्हटले जाते. आपल्या संस्कृतीचा मोठा भाग हा गावात वसलेला आहे, कारण आपल्या देशातील मोठी लोकसंख्या गावात राहते. आपली सभ्यता आणि संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेची साक्ष देणार्‍या गावातील काही परंपरा, रीतिरिवाज विषमतेची जननी बनले आहेत. जिथे गावातील खाप पंचायतीमध्ये तुघलकी न्याय केला जातो आणि त्याचे पालन करण्याचे फर्मान काढले जाते. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे असे स्वप्न होते की, आपल्या देशाचा विकास तेव्हा संभव आहे, जेव्हा पंचायत पातळीवर लोकशाही प्रक्रियेचा संचार होईल, परंतु इथे तर उलट्या रीतीने परंपरागत जखडलेल्या विकृत सामाजिक संरचनेचे आक्राळविक्राळ स्वरूप ‘आ’ वासून समाजाला गिळंकृत करण्यास तत्पर आहे. गावात सवर्णांकडून खालच्या वर्गावर अत्याचार होतात, त्यांची जमीन हडपण्यासाठी त्यांचे खून पाडले जातात. ह्याला खाप पंचायतीची फूस असते. जातीप्रथा तर आपल्या समाजाला पोखरून खात आहे. त्याची चर्चा न केलेलीच बरी. काही गावात भलेही लोकशाहीतून निवडून आलेली पंचायत नामक संस्था आहे, तरीही तेथील खाप पंचायत ही संस्था एक समांतर न्यायव्यवस्थेचे काम करतात. ह्या खाप पंचायतीमध्ये सदैव सवर्ण लोकांचीच वर्णी लागलेली असते. अशा खाप पंचायतीच्या फर्मानाचा सर्वात जास्त फटका महिलांना आणि खालच्या वर्गाला बसतो. त्यांना ह्या पंचायतीच्या प्रमुखांचा हुकूम मानणे भाग पडते. ह्यावर अनेकदा आपल्या कायदा आणि न्याय प्रक्रिया मौन राहतात. जेव्हा लोकशाहीतील मानवतावादी प्रक्रियेला लकवा मारतो, तेव्हा असली विचित्र फर्माने जारी केले जातात. खाप पंचायतींना सध्या काहीच काम शिल्लक नाही. त्यामुळे मनमानी आणि गुंडगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. काही वर्षांपूर्वी हरियाणातील खाप पंचायतीने राज्यातील पंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे ठरविले होते. स्वतःला ते सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचे राखणदार मानतात. देशातील कायदे, न्यायालयीन निर्णय आणि नवी सुधारणा आपल्या संस्कृतीवर एक मोठे संकट असल्याचे मानले जाते. मुलींनी तोकडे कपडे घालणे, मुलगा किंवा मुली ह्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे विवाह करणे, अनैतिक संबंधांत सहभाग असणे, समलैंगिक संबंध प्रस्थापित करणे अशा कृत्यांना खाप पंचायत शिक्षा सुनावते, कारण अशा कृत्यामुळे कुटुंबाची आणि गावाची बदनामी होते. कुठल्याही पंचायतीचे काम हे समाजात सरकारकृत चालवली जाणार्‍या सुधारात्मक प्रक्रिया आणि विकासकार्याला कार्यान्वित करण्यात प्राधान्य देणे. स्वातंत्र्यानंतर देशातील प्रत्येक गावात पंचायतसंस्था विकासकामात मुरलेली आहे असे असूनही काही गावात खाप पंचायतीचे अस्तित्व टिकून आहे आणि ते गावाच्या कारभारात आणि लोकांच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करतात हा लोकशाहीला काळीमा आहे. आपल्या देशातील उत्तर क्षेत्रातील, खास करून हरियाणा, राजस्थान या राज्यात खाप पंचायतीचे वर्चस्व आहे. आपले मुद्दे, नियम, आपले विचार समाजावर लादायचे आणि नव्या सुधारणेला विरोध दर्शवून आपल्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन करायचे. आज समाजावर जाती व्यवस्थेचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. उच्च आणि नीच जातीतील प्रेम संबंधांतून होणारे विवाह आणि आर्थिक असमानता असलेल्यांच्या विवाहांमुळे अशा हत्या होत असतात, तसेच गावात अनेक कुटुंबे समान गोत्राची असतात, त्यामुळे त्यांच्यातील विवाह संबंधांना मान्यता मिळत नाही. अशा वेळी मुले-मुली पळून जाऊन लग्न करतात. तेव्हा प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना शोधून काढून निर्घृण हत्या केली जाते. कधी कधी आंतरजातीय विवाह केल्याने मुलाला गाव सोडण्यास प्रवृत्त केले जाते. कोणा महिलेला चेटकीण जाहीर करून विवस्र करून मारणे, दलित व्यक्ती घोड्यावर बसली तर तिला मारहाण केली जाते, अशा तर्‍हेच्या बातम्या वर्तमानपत्रातून आपण वाचतो. काही ठिकाणी अशा घटना समोर घडूनही पोलीस मूक दर्शक बनतात. जेव्हा मीडियावर मोठ्या प्रमाणात बोभाटा होतो तेव्हा काही हालचाल सुरू होते. अशा प्रकारच्या हत्यांना इंग्रजीत ‘ऑनर किलींग’ ह्या नावाने संबोधले जाते. हा प्रकार कुठल्याही एका धर्माशी निगडीत नसून काही गावांत परंपरेने चालत आला आहे. समाजात पुरातन काळापासून पुरूष कारभार चालवत, आर्थिक नाड्या स्वत:च्या हातात सांभाळत शिक्षण आणि न्याय व्यवस्थेचा अधिकार ठेवणे जुन्या, कालबाह्य, मानवतेला काळीमा फासणार्‍या परंपरांना चालना देणे, अशा समाजात महिलांना सदैव दुय्यम नागरिक मानले जाते. महिलांनी शिक्षण घेणे, नोकरी करणे निषिद्ध मानले जाते. जर ह्याचे उल्लंघन झाले तर संपूर्ण कुटुंबाला गावात बहिष्कृत केले जाते. हरियाणा, राजस्थान या राज्यात सर्वांत जास्त खाप पंचायतींचे वर्चस्व आहे. तिथे कन्या भ्रुणहत्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे कन्या जन्मदर सतत खाली घसरत आहे. एका गावात तर कन्या कधीच जन्माला येत नव्हती, आणि ही बाब गावात भूषणावह मानली जात असे. ह्याचे कारण कन्या जन्माला आली की कोणालाही थांगपत्ता लागू न देता दाई परंपरेनुसार कन्या भ्रूणहत्या करीत असे. कोणत्या सभ्य देशाचा कायदा ह्याला परवानगी देत नाही. परंतु पंथ, काही जाती जमाती तसेच कुटुंबे आपले स्वत:चे असे कायदे प्रस्थापित करतात.
मुगल शासनकाळात खाप पंचायतींचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. साधन आणि जागरूकतेचा अभाव ह्यामुळे शासनाच्या अधिकार्‍याना प्रत्येक गावातील तंटे सोडवण्यास वेळ नव्हता, त्यासाठी खाप पंचायतींना अधिकार बहाल केले गेले. इंग्रज काळातही ह्यात काही विशेष फरक पडला नाही, कारण दोघेही एकमेकांशी जमवून घेत असत आणि खाप पंचायती इंग्रज सरकारच्या समर्थक बनल्या, त्यामुळे त्यांना झुकते माप देण्यात आले. काहींच्या मते अशा घटना मागासलेल्या आणि अशिक्षित समाजाकडून होतात, कारण तिथे सरकारच्या विविध नवीन योजना आणि सुधारणांचे वारे अजूनही कोसो दूर आहे. सध्याच्या काळात मतांच्या राजकारणामुळे काही भागात खाप पंचायतीच्या मनमानी कारभाराकडे सतत दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ह्यात बदल घडणे शक्य नसल्याचे जाणकारांचे मत आहे. हल्लीच एका गावात नववधूची पहिल्या रात्री कौर्माय चाचणी घेण्याची अघोरी प्रथा समोर आली होती. मानवी हक्क आयोगाच्या मते अशा घटना महिला अत्याचाराचा प्रमुख प्रश्‍न मानला जावा. आजच्या इंटरनेट आणि जागतिकीकरणाच्या बळावर पुढे जाणार्‍या पिढीला खाप पंचायतीची न्यायव्यवस्था आणि मध्ययुगीन काळातील निर्णय नामंजूर आहे. कायदा एकटा कधी समाज बदलू शकत नाही. त्यासाठी समाजाने विचार करण्याची प्रक्रिया बदलली पाहिजे. तेव्हाच काही सकारात्मक बदल संभव आहे. १९५० ते २०१९ च्या तुलनेत शिक्षण आणि आर्थिक स्तरावर आज आपला समाज इतका समर्थ बनला आहे की अनेक रीतीरिवाज आता हळुहळु समाप्त होत आहे. तेव्हा आशा आणि विश्‍वास ठेवण्यास निश्‍चित जागा अहे की आणखी काही वर्षात अशी कृत्ये बंद होतील. परंतु हे तेव्हाच शक्य आहे. जेव्हा सारा देश सामूहिकरित्या अशा प्रकारांकडे एक कलंक म्हणून पाहील आणि पूर्ण सभ्य समाज एका स्वरात त्याची निर्भर्त्सना करील.