खात्यांबाबत पूर्णपणे समाधानी : तवडकर

0
5

दिलेल्या खात्यांबाबत नाराज असल्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम

मंत्रिपदाची इच्छा नव्हती; पक्षाच्या आदेशामुळे मंत्रिपद स्वीकारले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या खात्यांबाबत आपण पूर्णपणे समाधानी आहे. आपणाला मिळालेल्या खात्यांबाबत कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. दिलेल्या खात्यांबाबत आपण नाराज असल्याच्या खोट्या बातम्या पसरविण्यात आल्या, असे स्पष्टीकरण कला, क्रीडा व आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी पर्वरी येथे सचिवालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिले.
डॉ. रमेश तवडकर हे मिळालेल्या खात्यांबाबत नाराज असून, राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच, सेवा पंधरवड्याच्या पणजीतील उद्घाटन सोहळ्याला मंत्री तवडकर हे अनुपस्थित राहिल्याने ते नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर तवडकरांनी वरील खुलासा केला.

माती दिली तरी सोने करण्याची आपली क्षमता आहे. आपण एका बैठकीत खात्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख केला जातो. ती बैठकच झालेली नाही. नाराजीबद्दल खोट्या बातम्या पसरविण्यात आल्या आहेत. सभापतिपदी कार्यरत असताना मुळात आपणाला मंत्री होण्याची इच्छा नव्हती. तथापि, पक्ष संघटनेने मंत्रिपदाची जबाबदारी दिली म्हणून मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली, असेही तवडकर यांनी सांगितले.
मला दिलेल्या खात्यांमध्ये आवश्यक निधीची तरतूद नसल्यास आवश्यक निधीची व्यवस्था करण्याची आपली तयारी आहे. आपण मंत्रिपदाची जबाबदारी यापूर्वी यशस्वीपणे सांभाळलेली आहे, असेही तवडकर यांनी सांगितले.

विधानसभेचे सभापतिपद स्वीकारत असतानाच आपण त्या पदाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचे ठरवले होते. त्याच निर्धाराने आपण सभापतिपदाला पूर्ण न्याय दिला. विधानसभेचे गत पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आपली मंत्रिपदी वर्णी लावली जाणार असल्याचे समजले असता आपण लगेचच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपल्याला मंत्रिपद नको, असे त्यांना सांगितले होते; पण आपल्याला संघटन कौशल्य असल्याने आगामी निवडणुकांत त्याचा फायदा होईल या उद्देशाने पक्षानेच आपल्याला मंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. त्यामुळेच आपण मंत्रिपद स्वीकारल्याचे रमेश तवडकर यांनी सांगितले.

मातीचे सोने करण्याची ताकद आपल्याकडे आहे. त्यामुळे मिळालेल्या खात्यांसाठी आवश्यक तितका निधी आणून त्याद्वारे जनतेची सेवा करण्यात आपण निश्चित यशस्वी होईन.

  • रमेश तवडकर, मंत्री