खाणबंदीप्रकरणी राज्याला खास पॅकेज द्या

0
147

>> मुख्यमंत्र्यांची नवी दिल्लीत केली अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडे मागणी

राज्यातील खाण बंदीमुळे १४०० कोटी रुपयांचा महसूल बुडला आहे. वरील नुकसान भरून काढण्यासाठी राज्याला खास पॅकेज द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे नवी दिल्ली येथे काल केली.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांबरोबर अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील मागणी केली. गोवा राज्याला खाण व पर्यटनातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. खाण व्यवसाय बंद असल्याने सुमारे १४०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अर्थमंत्र्याच्या नजरेस आणून दिले.

पर्यटन क्षेत्रात साधन सुविधा वाढविण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यात लोकसंख्येपेक्षा पर्यटकांची संख्या पाचपट जास्त आहे. हिंटरलॅण्ड पर्यटन प्रकल्पासाठी केंद्र पुरस्कृत योजनातून मदत केली जाऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोवा हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कायमस्वरूपी स्थळ बनले आहे. इफ्फीसाठी आवश्यक साधनसुविधा उभारण्यासाठी निधीची अडचण निर्माण होत आहे. कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी केंद्राकडून खास अनुदान देण्याबाबत विचार विनिमय करावा, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली. गोव्याचा आरोग्य, शिक्षण हब म्हणून विकास केला जाऊ शकतो. गोव्यात न्यू इंडियन इन्स्टिटूट ऑफ मॅनेजमेंट, नॅशनल लॉ कॉलेज, ऑल इंडिया इन्स्टिटूट ऑफ मेडिकल सायन्स सारख्या संस्था सुरू केल्या जाऊ शकतात, असे मुद्दे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मांडले.