>> मुख्यमंत्र्यांची माहिती; खासगी संस्थांकडून प्रस्ताव आल्यास स्वागतच
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या खासगी संस्थांकडून आलेल्या कोणत्याही प्रस्तावाचे गोवा सरकार स्वागत करणार असून, त्यांना सर्व प्रकारचे आवश्यक सहकार्य करेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कांपाल-पणजी येथील क्रीडा संकुल परिसरात सुरू असलेल्या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे. जर कोणतीही खासगी संस्था ते उभारण्यासाठी तयार असेल, तर त्यांचे स्वागत केले जाणार आहे. क्रीडा शाखेतील पदवी, पदविका, साहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी अभ्यासक्रम इत्यादींची मागणी केली जाते आणि क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून या मागण्यांची पूर्तता होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य सरकारकडे क्रीडा विद्यापीठ स्थापनेसंदर्भात अनेक खासगी संस्थांनी संपर्क साधला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आम्ही त्यांना योग्य मार्गाने संपर्क साधण्यास सांगितले आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त कांपाल येथे सुंदर क्रीडा नगरी उभारण्यात येत आहे. ही नगरी सर्व गोवेकरांसाठी, लहान मुलांसाठी आणि खेळाडूंसाठी खास आकर्षण ठरणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कांपालमधील क्रीडानगरीमध्ये विविध तंबू उभारण्यात येत असून, पुढील चार ते पाच दिवसांत सर्व काम पूर्ण होणार आहे. क्रीडा नगरीत खेळांसह संध्याकाळी करमणुकीचे कार्यक्रम केले जाणार आहेत. तसेच, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी कँटीनही उभारण्यात येणार आहे. येथील इनडोअर स्टेडियमवर 22 तारखेपासून कबड्डी, टेबल टेनिस यांच्या स्पर्धा होणार आहेत. जलतरण तलावाचेही काम पूर्ण झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमनंतर कांपाल येथेच स्पर्धेतील मुख्य सामने होणार आहेत. या भागात गर्दीही जास्त असणार आहे. या सर्व ठिकाणी ‘बॅकअप’ची सुविधा करण्यात आली आहे. या भागात रहदारीला अडथळा होऊ नये, यासाठी मिरामार रस्त्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार केला जात आहे. अधिकारी वर्ग दिवस-रात्र काम करत असून 20 तारखेपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.