क्रिकेट का?

0
102

भारत आणि पाकिस्तान दरम्यानची द्विपक्षीय क्रिकेट मालिका बारगळल्यात जमा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जरी तिला अनुकूल असले, तरी भारत सरकारने ‘दहशतवाद आणि क्रिकेट सोबतीने जाऊ शकत नाहीत’ असे ठणकावून क्रिकेटपेक्षा देश मोठा आहे याची यथार्थ जाणीव बीसीसीआयला करून दिली आहे. ही भूमिका सर्वस्वी योग्य आहे. काश्मीर जळत असताना आणि सीमेवर गोळीबाराविना एकही दिवस जात नसताना पाकिस्तानशी गळाभेटी घेण्याचे वा क्रिकेट खेळण्याचे हे दिवस नव्हेतच नव्हेत. कला, क्रीडा, साहित्याला बंधने घालणे योग्य जरी नसले, तरी घर जळत असताना कला, क्रीडा, साहित्याचे दरबार भरवले जाऊ शकत नाहीत. मैत्री, सौहार्द हे शब्द त्याच्यासाठीच असतात, ज्याला त्याची किंमत कळते. पाकिस्तानचे प्रत्येक पाऊल हे बुद्धिबळाच्या पटावरील उंटासारखे तिरके पडत आले आहे. अशा वेळी त्याच्यासंदर्भात ‘अमन की आशा’ बाळगणे भोळसटपणाचे ठरेल. उरी आणि पठाणकोटचे घाव आपण एवढ्या सहजासहजी विसरायचे काय? भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांच्यात भले आगामी क्रिकेट सामन्यांबाबत करार झालेला असेल, परंतु बीसीसीआय म्हणजे काही सार्वभौम राष्ट्र नव्हे. या देशाचे परराष्ट्र धोरण, त्याची अधिकृत भूमिका यापेक्षा यापेक्षा बीसीसीआय वरचढ नाही. त्यामुळे केवळ व्यावसायिक कारणांसाठी आणि येणार्‍या अफाट पैशावर डोळा ठेवून पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळण्याचा घाट त्यांनी घालू नये. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने बीसीसीआयकडे ४४७ कोटींची भरपाई मागितली आहे, परंतु ज्या कराराचा भंग केल्याचा दावा पीसीबीने केला आहे, तो वस्तुतः कायदेशीर करारच नव्हे. दुबईतील बैठक निष्फळ ठरली. आता बर्मिंगहॅममध्ये चॅम्पियन ट्रॉफीवेळी त्यासंदर्भात चर्चा होईल. मुळात हा जो काही तथाकथित ‘करार’ आहे, तो केला गेला २०१४ साली. तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शिवाय तेव्हा पाकिस्तानसमवेत हे दौरे आखले गेले त्यामागे निव्वळ व्यावसायिक कारणे होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे पुढील काही वर्षांचे नियोजन असते हे ठीक आहे, परंतु पाकिस्तानसारख्या देशाशी आज सौहार्दाचे संबंध नसताना त्याच्याशी अट्टहासाने क्रिकेट खेळणे हा त्या देशाने आपल्या ज्या जवानांचे बळी घेतले, ज्यांच्या देहांची विटंबना केली, त्यांच्या कुटुंबियांच्या जखमांवर मीठ चोळणे नव्हे काय? जेथे अनेक संघ खेळतात त्या चॅम्पियन ट्रॉफीसारख्या स्पर्धेमध्ये भारत – पाकिस्तान सामना झडला तर तो सरकारला चालेल, असे एकूण भूमिकेवरून दिसते, परंतु जो न्याय द्विपक्षीय मालिकेला लागू आहे, तोच खरे तर तेथेही लागू झाला पाहिजे. येथे निष्पापांचे जीव जात असताना कशाला हवे पाकिस्तानशी क्रिकेट? ज्यांना क्रिकेट हवे असेल त्यांनी आधी उभय देशांतील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. मैत्रीचे उमाळे ज्यांना येत आहेत, त्यांनी पाकिस्तानकडून सीमेवर हरघडी होत असलेले युद्धबंदीचे उल्लंघन, सीमेपलीकडून काश्मीरमध्ये केली जाणारी घुसखोरी, दहशतवाद्यांचे सतत चाललेले समर्थन, मुंबईवरील हल्ल्यातील आरोपींची चालवलेली पाठराखण, उरी – पठाणकोटसारख्या कटकारस्थानांची दिली जाणारी साथ यासंदर्भात आधी बोलावे. मैत्रिपर्वाची भारतालाही आस आहे. वेळोवेळी तसे प्रयत्नही झाले, परंतु त्याला पलीकडून एकदाही प्रामाणिक साथ दिली गेलेली नाही या वस्तुस्थितीकडे डोळेझाक कशी करायची?हे ढोंगी उमाळे आता पुरे झाले. क्रिकेटपेक्षा देश मोठा आहे, देशाचा स्वाभिमान मोठा आहे. तो गहाण ठेवून केवळ आर्थिक, व्यावसायिक कारणांसाठी देशाशी प्रतारणा करण्याचे पाप बीसीसीआयने कदापि करू नये.