कोळसा प्रश्‍नावरून गदारोळ

0
78

>> विधानसभेचे कामकाज दीड तास तहकूब

गोव्याला मिळालेल्या कोळशाच्या पट्ट्यासंबंधी विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर न देता तो प्रश्‍न परत एकदा उद्योगमंत्री विश्‍वजित राणे यांनी पुढे ढकलला. त्यामुळे काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला सर्व विरोधी आमदारांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन गदारोळ घातला. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचे सुमारे दीड तास कामकाज तहकूब केले. जीआयडीसीने कोळसा पट्टा एका कंपनीला देताना मोठा घोटाळा केलेला असून हा घोटाळा तब्बल एक हजार कोटी रु.चा असल्याचा आरोप ह्या वेळी आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे आदींनी केला.

या प्रश्‍नाचे उत्तर गेल्या विधानसभा अधिवेशनात मागितले होते. मात्र, उद्योगमंत्री राणे यांनी त्यावेळी उत्तर देण्यास अवधी द्यावा अशी मागणी करीत हा प्रश्‍न पुढील अधिवेशनापर्यंत पुढे ढकलला होता, असे सरदेसाई यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत आता हा प्रश्‍न पुन्हा एकदा पुढे ढकलता येणार नसल्याचे स्पष्ट केले. आज विधानसभा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ह्या प्रश्‍नाचे उत्तर आज देणे बंधनकारक आहे. कारण एखादा प्रश्‍न सतत दोन अधिवेशनात पुढे ढकलता येत नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. हा मोठा घोटाळा असल्याने सरकार उत्तर देणे टाळत असल्याचा दावा विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, रोहन खंवटे यांच्यासह सर्वच विरोधी आमदारांनी केला. यावेळी त्यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन गदारोळ घातला. त्यामुळे सभापती राजेश पाटणेकर यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब केल्याने काल सकाळच्या सत्रात कोणतेही कामकाज झाले नाही.