कोलवाळचे एटीएम पळवून १०.६६ लाख लुटले

0
101

>> चोरीमागे ६ अज्ञात बुरखाधारी चोरटे

>> रेवोड्यातील जंगलात सापडले पोलिसांना एटीएम

कोलवाळ येथील श्रीराम मंदिरासमोर असलेल्या एच. डी. एफ्. सी. बँकेचे एटीएम मशिन अज्ञात सहा बुरखाधारी चोरट्यांनी रविवारी पहाटे २.२० च्या दरम्यान पळविले. त्यात अंदाजे १० लाख ६६ हजारांची रक्कम होती. दरम्यान, एटीएम मशिन सुमारे ४ कि. मी. अंतरावर रेवोडा येथील रानात फोडलेल्या अवस्थेत म्हापसा पोलिसांना सापडले आहे.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली असल्याचा अंदाज आहे. काल सकाळी ११.२० वा. म्हापसा पोलिस स्थानकाच्या करासवाडा येथील आऊट पोस्टला एका अज्ञात व्यक्तीने माहिती दिल्यानंतर ही चोरी उजेडात आली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नवलेश देसाई, पोलीस उपनिरीक्षक धिरज देवीदास, पोलीस कॉन्स्टेबल महेश शेटगावकर, भगवान शेटकर, सुशांत चोपडेकर, फ्रॅन्की वाझ, आल्वीयो डिमेलो, राजेश कांदोळकर, अक्षय पाटील, रामेश्‍वर गावस यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. तर पोलीस उपनिरीक्षक धिरज देवीदास यांच्यासह इतर पोलीस कर्मचार्‍यांनी चोरट्यांनी पळविलेल्या एटीएम मशिनचा शोध सुरू केला. काही वेळ शोध घेतल्यानंतर कोलवाळहून सुमारे ४ कि. मी. अंतरावरील करक्याचा व्हाळ, रेवोडा येथील जंगलात एटीएम पोलिसांना मिळाले. ते मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कापून आतील सुमारे १० लाख ६६ हजार १०० रुपये पळविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेज हस्तगत
या एटीएम मशिनची किंमत अंदाजे ५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. हे मशिन फोडण्यासाठी एकूण सहा जण आपल्या तोंडाला मास्क बांधून आले होते. ते पहाटे २.२० वा. च्या दरम्यान आले व २.४६ वा. बाहेर गेल्याचे सी. सी. टीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. या अज्ञात चोरट्यांनी सी. सी. टीव्ही फुटेजही पळविले.
म्हापसा पोलिसांनी नंतर श्‍वान पथक व ठसे तज्ञांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी येऊन पहाणी केली. म्हापसा पोलिसांनी करक्याचा व्हाळ येथे रानात फोडलेल्या अवस्थेत सापडलेले मशिन हस्तगत केले आहे. पुढील तपास म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक धिरज देविदास करीत आहेत.