कोरोना रुग्णांच्या संख्येत देशभरात लक्षणीय वाढ

0
92

देशात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला होता पण त्यानंतर बाधितांची संख्या कमी होऊ लागली होती. त्यामुळे दुसरी लाट आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागत आहेत. मात्र काल बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार कोरोना रुग्णसंख्येत गेल्या चोवीस तासांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

मंगळवारी देशभरात ४२ हजार १५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर काल ३६ हजार ९७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. काल देशभरात ३ हजार ९९८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात ४ लाख १८ हजार ४८० जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशभरात सध्या ४ लाख ७ हजार १७० सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान, भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. भारतात ४१ कोटी ५४ लाख ७२ हजार ४५५ नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.

डब्ल्यूएचओचा इशारा
कोरोना लसीकरण जगभरात मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिकांत बिनधास्तपणा आला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने इशारा देताना कोरोनाच्या आता जगभरात दोन साथी तयार झाल्याचे संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी म्हटले आहे. डॉ. टेड्रॉस यांनी कोरोनाची लस इतर देशांना देणे, चाचणी आणि उपचार करणे यामध्ये येणार्‍या अपयशामुळे जगात कोरोनाच्या दोन साथी तयार झाल्याचे सांगितले. एक साथ अशा देशांमध्ये आहे, जिथे लस, औषधे असे उपचार उपलब्ध असून तिथे अनलॉकची प्रक्रिया आहे. तर औषधांचा तुटवडा कमी असल्यामुळे काही देशांत दुसरी साथ आहे. हे देश कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करत आहेत.

डेल्टाचा फैलाव १२४ देशांमध्ये
कोरोनाच्या डेल्टा या प्रकाराचा फैलाव जगभरातील १२४ देशांमध्ये झाला असल्याचे टेड्रॉस यांनी सांगितले. कोरोनाचे डेल्टा प्रकारांव्यतिरिक्त तीन प्रमुख नमुने आढळून आले आहेत. त्यामध्ये अल्फा हा प्रकार आधी ब्रिटनमध्ये सापडला. त्याचा १८० देशांमध्ये फैलाव झाला. त्यानंतर बीटा हा प्रकार दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला. त्याचा जगभरातल्या १३० देशांमध्ये फैलाव झाला असून गामा हा प्रकार ब्राझिलमध्ये आढळला. त्याचा आता ७८ देशांमध्ये फैलाव झाला आहे.